LATEST ARTICLES

हात बरबटलेले तरीही ईडीवर खापर

लोकसभा निवडणुकीत आपल्या संभाव्य पराभवाच्या धास्तीने इंडिया आघाडी हताश झाली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपावर असभ्य भाषेत टीका सुरू केली आहे. पण इंडिया आघाडीत सामील असलेल्या आणि नसलेल्याही पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आकाशपाताळ एक का करत आहेत, याचे उत्तर शोधू गेले असता असे दिसते की, या सर्वच पक्षांना आपल्या नातेवाइकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ द्यायची नाहीत. इतक्या हेतूनेच ते आता इंडिया आघाडीत सामील झाले आहेत. कम्युनिस्ट पक्ष तर साधनशुचितेच्या गप्पा मारत असतो. त्या पक्षाचे नेते उजव्या गटांना म्हणजे भाजपा वगैरेंना नेहमीच तत्त्वज्ञान शिकवत असतात. पण कम्युनिस्ट मार्क्सिस्ट लेनिनवादी पक्षाचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कन्या वीणा यांच्यावर प्रवर्तन निदेशालयाने म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

वीणा विजयन यांची एक एक्झॅलाजिक सोल्युशन या नावाची कंपनी आहे. या कंपनीला कोची मिनरल्स अँड रूटाईल लिमिटेडने १ कोटी ७२ लाख रुपयांचे पेमेंट केले आणि त्या बदल्यात वीणा यांच्या कंपनीने कसलीही सेवा कोची मिनरल्सला दिली नाही. आता हे प्रकरण ईडीने आपल्या हातात घेतले आहे. विजयन यांच्या कन्येचा हा एक प्रकारे भ्रष्टाचारच आहे आणि करण्यासाठी विजयन यांच्या पदाचा गैरवापर केला गेला, हे उघड आहे. विजयन ज्या कम्युनिस्ट मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे नेते आहेत. त्या पक्षाचा तत्वज्ञ लेनिन तर कामगारांचा घाम गाळण्याअगोदरच त्यांना मजुरीचे पैसे मिळाले पाहिजेत, असे सांगायचा. पण त्याच पक्षाच्या नेत्याची कन्या एका कंपनीला पैसे घेऊन सेवा देत नाही, हा विरोधाभास आहे. नुसते इतकेच नव्हे तर सीएमआरएलचे राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंध उघड झाले आहेत. सीएमआरएलचे अनेक व्यवहार संशयास्पद आहेत, असा दावा सरकारी वकिलांनीच केला होता. याच सीएमआरएलमध्ये केरळच्या स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची १४ टक्के भागीदारी आहे. याचा अर्थ या प्रकाराचे मूळ सरकारपर्यंत जाते आणि मुख्यमंत्री विजयन यांच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे जातात.

कम्युनिस्ट पक्षाचे नेते स्वतःला स्वच्छ समजतात. पण तसे ते नाहीत, हे या प्रकरणाने उघड झाले आहे. तिकडे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे तर तुरुंगात आहेत. याचा अर्थ इतकाच आहे की, इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात आणि प्रत्यक्षात यांचाच त्यात हात असतो. पंतप्रधान मोदी यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. त्यांचा मूळ हेतू लपून राहिलेला नाही. प्रत्येक नेता कोणत्या न कोणत्या प्रकरणात अडकलेला आहे. मोदी यांच्याविरोधात एकत्र येण्याचे नक्की कारण हे आहे की, आपल्या नातेवाइकांना वाचवायचे आहे. विजयन यांचे पायही मातीचेच आहेत हे यामुळे सिद्ध झाले आहे. २०१६-१७ या कालावधीत एकूण दहा कंपन्यांनी वीणा यांच्या कंपनीशी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. वीणा यांच्या कंपनीत इतका रस दाखवण्याचे कारण त्यांच्या वडिलांचे मुख्यमंत्रीपद हेच असणार, हे उघड आहे.

कम्युनिस्टही धुतल्या तांदळासारखे नसतात आणि हेच नेते भाजपावर आरोप करत असतात. यामुळे डाव्या पक्षांचा खरा चेहरा उघड झाला आहे. या प्रकरणी प्राप्तीकर खात्यातर्फेही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गंभीर गुन्हा आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे, असा केरळच्या सरकारी वकिलांचा दावा आहे. केरळमधील लोकांचे पैसे लुबाडून वीणा यांच्या कंपनीने सरकारची फसवणूक केली, असाही याचा अर्थ होतो. तिकडे अरविंद केजरीवाल हे सर्वाधिक भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गोत्यात आले आहेत. मद्य घोटाळ्यात त्यांचे नाव आहे आणि त्यांच्या या घोटाळ्यात आणखी एक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांचाही समावेश आहे. याचा अर्थ इतकाच की, हे सारे नेते आपल्या भ्रष्टाचार प्रकरणामधून सुटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची जी मोदी यांची हुकूमशाहीविरोधात ओरड सुरू आहे, ती निव्वळ आपल्या नातेवाइकांना भ्रष्टाराचाराच्या गुन्ह्यांमधून बाहेर काढण्यासाठी आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही काळी बाजू आता समोर आली आहे. त्यामुळे मोदी विरोधी त्यांच्या प्रचारातील हवा गेली आहे. ईडी सूडबुद्धीने कारवाई करत आहे, हा त्यांचा आरोप निखालस खोटा आणि स्वतःच्या नातेवाइकांना खटल्यापासून वाचवण्यासाठीच आहे. इंडिया आघाडीत एकही नेता असा नाही की ज्याचे सार्वजनिक चारित्र्य भ्रष्टाचारापासून अलिप्त आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आणि ज्यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी करण्यात आली आहे, ते लालू यादव हे मोदी यांना परिवार नाही, अशी नस्ती उठाठेव करतात. मोदी यांचे कुठल्याही प्रकरणात नाव नाही, त्यामुळे इंडिया आघाडीचा जळफळाट होत आहे.

इतके दिवस राजकारणात साधनशुचितेच्या गप्पा मारणारे कम्युनिस्ट नेतेही या भ्रष्टाचाराच्या दलदलीत आहेत. त्यांनाही कन्याप्रेम भोवले आहे. या नेत्यांनी आपल्या नातेवाइकांना वाचवण्यासाठी आघ़ाडी तयार केली आहे. मोदी आणि शहा यांच्याविरोधात गरळ ओकण्यास आताच का सुरुवात केली आहे हे यावरून समजते. इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता स्वतःच्या किंवा नातेवाइकाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतला आहे. त्यामुळे त्यांना मोदी यांना हटवायचे आहे. खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी या नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर आहेत. इतर अनेक नेत्यांबाबत हेच सांगता येईल. येत्या निवडणुकीत म्हणूनच ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे.

स्वामी स्मरणानंद यांचे अनंतात प्रस्थान

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसभा निवडणुकीच्या या महापर्वात एक अशी बातमी कानी आली, ज्यामुळे मन आणि विचार काही क्षणांसाठी ठप्प झाले. भारताच्या आध्यात्मिक श्रद्धेचे एक प्रखर व्यक्तिमत्त्व श्रीमत स्वामी स्मरणानंदजी महाराज यांचे समाधिस्थ होणे, ही एक वैयक्तिक पातळीवरील क्लेशदायक गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी स्वामी आत्मास्थानंदजी यांचे महाप्रयाण आणि आता स्वामी स्मरणानंद यांचा अनंताचा प्रवास ही घटना कित्येकांना शोकसागरात बुडवणारी आहे. मी देखील त्यांचे कोट्यवधी भक्त, संतजन आणि रामकृष्ण मठ आणि मिशनच्या अनुयायांइतकाच दुःखी झालो आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या बंगालच्या दौऱ्यावेळी मी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. स्वामी आत्मास्थानंद यांच्याप्रमाणेच स्वामी स्मरणानंदजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य, आचार्य रामकृष्ण परमहंस, माता शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी समर्पित केले होते. हा लेख लिहिताना माझ्या मनात, त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी केलेली चर्चा आणि त्या अनेक स्मृती जिवंत होत आहेत.

जानेवारी २०२० मध्ये ज्यावेळी मी बेलूर मठाला भेट दिली, त्यावेळी मी स्वामी विवेकानंद यांच्या कक्षात बसून ध्यानधारणा केली होती. त्या दौऱ्याच्या वेळी मी स्वामी स्मरणानंद यांच्याशी स्वामी आत्मास्थानंदजी यांच्याबद्दल खूप वेळ बोललो होतो.
रामकृष्ण मिशन आणि बेलूर मठ यांच्याशी माझे किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते तर तुम्ही जाणताच. आध्यात्मिक क्षेत्रात जिज्ञासा असल्याने मी पाच दशकांच्या कालखंडात वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि विविध ठिकाणी वास्तव्य देखील केले आहे. रामकृष्ण मठात देखील मला आध्यात्मासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक संतांचा परिचय झाला, ज्यामध्ये स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. त्यांचे पवित्र विचार आणि ज्ञानाने मला नेहमीच एक समाधान लाभले आहे. जीवनातील या सर्वात महत्त्वाच्या कालखंडात अशाच संतांनी मला जन सेवा हीच ईश्वर सेवा असल्याची शिकवण दिली.  स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांचे आयुष्य, रामकृष्ण मिशनच्या ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धितायच’ या तत्त्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

शिक्षण प्रसार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत रामकृष्ण मिशन करत असलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. रामकृष्ण मिशन, भारताची आध्यात्मिक जाणीव, शिक्षणाचे सक्षमीकरण आणि मानवतेची सेवा या संकल्पानुसार कार्य करत आहे. बंगालमध्ये १९७८ मध्ये जेव्हा पुराने थैमान घातले होते, तेव्हा रामकृष्ण मिशनने आपल्या निःस्वार्थ सेवेने सर्वांची मने जिंकली होती. माझ्या स्मरणात आहे की, ज्यावेळी २००१ ला कच्छमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी मला सर्वात आधी दूरध्वनी करणाऱ्यांमध्ये स्वामी आत्मास्थानंदजी एक होते. त्यांनी मला सांगितले की, या संकट काळात आपत्ती व्यवस्थापन कार्यात रामकृष्ण मिशन आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहेत. त्यांच्या निर्देशांप्रमाणे रामकृष्ण मिशनने भूकंपाच्या त्या संकटात लोकांची खूप मदत केली.

गेल्या काही वर्षांत, स्वामी आत्मास्थानंद जी आणि स्वामी स्मरणानंद जी यांनी विविध पदे भूषवताना सामाजिक सक्षमीकरणावर मोठा भर दिला. ज्यांना या महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनासंदर्भात माहिती आहे, त्यांच्या नक्कीच स्मरणात असेल की यांच्यासारखे संत आधुनिक शिक्षण, कौशल्य आणि महिला सक्षमीकरणासाठी किती गंभीर असत.

स्वामी आत्मास्थानंद जी यांच्या महान व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्याने मला सर्वाधिक प्रभावित केले ते म्हणजे, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक परंपरेबद्दल त्यांना असणारे प्रेम आणि आदर हे आहे. याचे कारण असे की, त्यांनी भारताच्या विविध भागांत बराच काळ व्यतीत केला आणि ते सतत प्रवास करत असत. गुजरातमध्ये राहून ते गुजराती बोलायला शिकले. माझ्याशी देखील ते केवळ गुजरातीमध्येच बोलत असत. मला त्यांची गुजराती पण खूप आवडत असे.

भारताच्या विकासाच्या प्रवासात अनेक टप्प्यांवर, आपल्या मातृभूमीला स्वामी आत्मास्थानंद जी, स्वामी स्मरणानंद जी यांसारख्या अनेक साधुसंतांचा आशीर्वाद लाभला असून याने आपल्याला सामाजिक परिवर्तनाची नवी चेतना दिली आहे. या संतांनी आपल्याला समाजहितासाठी एकत्र काम करण्याची दीक्षा दिली आहे. ही तत्त्वे आजपर्यंत शाश्वत आहेत आणि येणाऱ्या काळात हेच विचार विकसित भारताची आणि अमृतकाळाची संकल्पशक्ती बनतील. पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या वतीने मी या महान संतांना श्रद्धांजली अर्पण करतो. मला विश्वास आहे की, रामकृष्ण मिशनशी संबंधित सर्व लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे वाटचाल करतील आणि हा मार्ग अधिक प्रशस्त करतील. ओम शांती!

कर नियोजनाची धावपळ

उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

आर्थिक वर्ष संपायला आता केवळ थोडेच दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी कराचे नियोजन करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उपयोग व्हावा या हेतूने हा लेख लिहिलेला आहे.

शेवटच्या क्षणी बेसावधपणे केली जाणारी चुकीची गुंतवणूक : अनेकदा ८० C खाली सवलत मिळवण्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक ही इन्शुरन्स कंपन्यांच्या गुंतवणूक योजनांत किंवा युलीप सारख्या साधनात केली जाते. गुंतवणूक
म्हणून त्यातून मिळणारा लाभ अन्य ठिकाणाहून मिळणाऱ्या लाभापेक्षा कमी असतो. यावर मोफत (?) देण्यात येणारे विमा संरक्षण अपुरे असते. मधेच पैसे काढून घेतल्यास पहिल्या वर्षी भरलेला बराचसा हप्ता परत मिळत नाही. त्यामुळे पैसे मिळाले तरी त्यावरील निव्वळ परतावा मामुली असतो. जीवनविमा हवा असेल तर टर्म इन्शुरन्स हा योग्य पर्याय राहील. कर वाचवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या करबचत योजना आहेत. त्यात केवळ तीन वर्षे गुंतवणूक अडकून राहू शकते. याशिवाय पीपीएफ, एनएससी, इपीएफ यांसारखे अन्य सुरक्षित पर्यायही उपलब्ध आहेत. करबचत करण्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक किंवा खर्च हे ३१ तारखेपर्यंत करावेत.

आरोग्य विम्याचा हप्ता : स्वतःसाठी, कुटुंबासाठी तसेच आपल्या पालकांचा आरोग्यविमा असल्यास त्यावर ८० DDB नुसार आयकरात सूट मिळू शकते. जोखीम व्यवस्थापन म्हणून या योजना घ्याव्यात. वेळेवर त्याचे हप्ते भरावेत.

एनपीएसमधील गुंतवणूक : यातील पन्नास हजारांच्या गुंतवणुकीस ८० CCD 1 B नुसार अधिकची करसवलत आहे.

अग्रीम कर न भरणे : मुळातून करकपात होणं आणि आपल्याला कर द्यावा लागणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्याचे उत्पन्न खरोखरच कर मर्यादेच्या आत आहे ते मुळातून कर कापू नये यासाठी १५ G / H फॉर्म भरून सूचना देऊ शकतात; परंतु ज्याचे उत्पन्न निश्चित करपात्र आहे हे माहिती असूनही असा फॉर्म भरून देणे चुकीचे आहे. उत्पन्न अधिक असल्यास नियमानुसार अग्रीम कर वेळोवेळी भरावा लागतो. तो न भरल्यास त्या तारखेपासून दंड विनाकारण भरावा लागतो. तेव्हा आपल्या उत्पन्नाची कच्ची नोंद ठेवून एकूण उत्पन्नाचा अंदाज घेऊन वेळोवेळी करभरणा करावा. १५ मार्चपर्यंत अंदाजित उत्पन्नाचा अपेक्षित करभरणा पूर्ण करावा असा नियम आहे, नाहीतर त्यावर दंड बसेल. या वर्षी शेअर बाजाराने अनेकांना मालामाल केल्याने उत्पन्नात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. मिळणाऱ्या रकमेतून मुळातून करकपात केली जात नाही. त्यामुळे भरावा लागणारा कर आणि त्यावरील दंडव्याज अधिक होऊ शकते. याचा अंदाज घेऊन अग्रीम कराचा भरणा व्याजासह ताबडतोब करावा. काही फरक निघत असल्यास विवरणपत्र भरताना त्याचे समायोजन करता येईल.

टॅक्स लॉस हार्वेस्टिंग : शेअर बाजारातील झालेल्या भांडवली नफ्यामध्ये भांडवली तोटा समायोजित करून आपले करदायित्व कमी करता येते. आपल्या गुंतवणूक संचात असलेले तोट्यातील शेअर्स विकून तोटा होईल. हा तोटा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या फायद्यात मिळवला असता निव्वळ फायदा कमी म्हणजेच करदेयता कमी होते. तोट्यात विकलेले शेअर्स आपल्याला ठेवायचे असल्यास विकलेल्या किंवा त्याच्या आसपासच्या भावात खरेदी केल्यास आपल्या गुंतवणूक संचात काहीच बदल होणार नाही आणि अधिक करबचत होईल. हे पूर्णपणे कायदेशीर असून त्यास टॅक्स लॉस्ट हार्वेस्टिंग म्हणतात.

करविषयक बऱ्याच सवलती या जुन्या पद्धतीने करमोजणी केल्यासच मिळतात. तेथे कराचा दर अधिक आहे तर नवीन पद्धतीने केलेल्या करमोजणीस बहुतेक ठिकाणी त्या मिळत नाहीत. पण तेथे करदर कमी आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीचा स्वीकार करत असलात तरी त्यामुळे करात फरक पडू शकतो. तेव्हा कोणत्या पद्धतीने कर मोजणी करावी ते दोन्ही पद्धतीने करमोजणी करून ठरवावे. नवीन पद्धतीने करमोजणी करायचे स्वीकारले तरीही गुंतवणूक करण्याचे थांबवू नये. कारण हीच गुंतवणूक तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारी आहे.

आपल्याला मिळणाऱ्या एकूण मिळकतीचा, त्यातून झालेल्या करकपातीचा सर्वसाधारण फायदा घ्यावा, यासाठी आयकर विभागाने AIS या नावाचे एक ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षांसह चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्न आणि करकपातीची माहिती आहे. त्यात या आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंतचे उत्पन्न, त्यातून आपला किंवा आपण दुसऱ्याचा मुळातून कापलेला कर, विशिष्ट आर्थिक व्यवहार, आपण स्वतंत्ररित्या भरणा केलेला अग्रीम कर, विभागाकडून करण्यात आलेली मागणी किंवा दिलेला रिफंड याशिवाय अन्य माहिती सहज मिळू शकते. बहुतेक ही माहिती अचूक असते तरीही मला आलेले अनुभव असे –

दोन कंपन्यांनी मला दिलेला डिव्हिडंड (रक्कम किरकोळ आहे) याची त्यात नोंद नव्हती. प्रधानमंत्री वयवंदन योजनेतील एलआयसीने दिलेले मासिक व्याज, पोस्टाच्या योजनेतील व्याज, सहकारी बँकेतील ठेवींवरील व्याजाचा त्यात समावेश नाही.
विशेष आर्थिक व्यवहारामध्ये – मी लार्सनचे सर्व शेअर्स पुनर्खरेदीस दिले होते. त्यातील काही शेअर्स स्वीकारून उरलेले शेअर्स परत आले असले तरी सर्वच शेअर्स ३२००ने विकल्याची चुकीची नोंद आहे.

वरील व्यवहारातील नफा १० (३४A) नुसार करमुक्त असला तरी प्रत्यक्षात या ठिकाणी कदाचित चुकीची नोंद किंवा नोंदच नाही असेही असू शकते. तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच उत्पन्नाची मोजणी करावी. तसेच व्यवहारांच्या नोंदींसमोर सबमिट फीडबॅक असा पर्याय असेल तर आपले म्हणणे थोडक्यात पण नेमकेपणाने सांगावे.

या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या उत्पन्न आणि कराच्या नोंदी प्रत्यक्ष कराचा भरणा झाल्यावर म्हणजे १५ मे किंवा त्यानंतरच्या ७ दिवसांत तेथे अद्ययावत होतात त्या तपासून खात्री करून घ्याव्यात. आपल्याकडून उत्पन्नाची मोजणी करून त्यावरील कर योग्यच दिला जाईल ते पाहावे. तरीही त्यात त्रुटी राहिली तर विवरणपत्र भरले आहे ते मंजूरही झाले आहे तरीही सुधारीत विवरणपत्र ३१ डिसेंबरपूर्वी भरून द्यावे. अधिक भरलेला कर हा मागणी न केल्यास परत मिळत नाही आणि कोणत्याही कारणाने कमी कर भरला असेल तरीही खात्याकडून मागणी नोटीस येऊ शकते.
mgpshikshan@gmail.com

आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी, स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला आर्थिक देणगी!

नवी मुंबई(प्रतिनिधी)– मरावे परी कर्तिरूपी जगावे या प्रमाणे करावे गावातील. दयानंद भास्कर तांडेल यांनी आपले वडील कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात देऊन, आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या वसा पुढे सुरू ठेवला आहे. बेलापुर पट्टीतील करावे या गावाची धार्मिक, वारकरी संप्रदाय व संस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातच तांडेल कुटुंब धार्मिक, सामजिक शैक्षणिक कार्यासाठी परिचित आहे.

कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या सामजिक कामाचा वसा हा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा दयानंद तांडेल यांनी पुढे चालू ठेवला आहे. आपल्या वडिलांच्या पाचव्या स्मृतिदिन निमित्त त्यांना अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळयांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात दिली.

यावेळी स्व. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव श्री. विनय सिंधुताई सपकाळ, स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे, सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल, समाजसेवक सुभाष म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जाहीर केली पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने आठ लोकसभा जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. दक्षिण मध्य येथून राहुल शेवाळे, कोल्हापूर येथून धैर्यशील माने, शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे, बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, हिंगोली येथून हेमंत पाटील, रामटेक येथून राजू पारवे,हातकणंगले येथून संजय मांडलिक आणि मावळ श्रीरंग आप्पा बारणे यांना तिकीट देण्यात आले आहे.

महायुतीदरम्यान महाराष्ट्रातील जागावाटपावर सहमती बनली आहे. दरम्यान, अधिकृत विधान होणे बाकी आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. याठिकाणी महायुतीमध्ये २८ जागांवर भाजप निवडणूक लढवत आहेत. याशिवाय १४ जागांवर शिंदे गटाची शिवसेना १४ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर ५ जागा एनसीपीच्या अजित पवार गटाला मिळणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षालाही एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण मध्य – राहुल शेवाळे

कोल्हापूर – धैर्यशील माने

शिर्डी – सदाशिव लोखंडे

बुलढाणा – प्रतापराव जाधव

हिंगोली – हेमंत पाटील

रामटेक – राजू पारवे

हातकणंगले – संजय मांडलिक

मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

गोविंदाला मिळणार तिकीट?

अभिनेता गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा चर्चा जोरदार सुरू आहेत. गुरूवारी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांना शिवसेनेचे सदस्यत्व दिले. यानंतर आता चर्चा आहे की आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. शिंदे यांचा पक्ष मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदाला तिकीट देऊ शकतात. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटातून अमोल किर्तीकर यांना उमेदवार बनवण्यात आले आहे.

शिवसेनेच्या संभाव्य जागा

रामटेक
बुलढाणा
यवतमाल-वाशिम
हिंगोली
कोल्हापुर
हटकनंगले
छत्रपति संभाजीनगर
मावल
शिर्डी
पालघर
कल्याण
ठाणे
मुंबई दक्षिण मध्य
उत्तर पश्चिम मुंबई

Narendra Modi : दुसऱ्यांना भीती घालणे आणि धमकावणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती!

६०० वकिलांच्या ‘त्या’ पत्रावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

नवी दिल्ली : काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करणारे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (Harish Salve) यांच्यासह देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्याकडे सोपवले. यात उल्लेख केलेल्या समूहावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस पक्षाला (Congress Party) लक्ष्य केलं आहे.

‘हा गट एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि नंतर त्याचाच बचाव करतो. हा गट न्यायालयाच्या चांगल्या भूतकाळाच्या आणि सुवर्णकाळाच्या खोट्या कथा रचतो आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांशी तुलना करतो. त्यांच्या टिप्पण्यांचा उद्देश न्यायालयांवर प्रभाव पाडणे आणि राजकीय फायद्यासाठी त्यांना अस्वस्थ करणे हा आहे. निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही, तर न्यायालयावर टीका केली जाते’ असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, ‘दुसऱ्यांना भीती घालणे आणि धमकावणे, ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. ५ दशकांपूर्वी त्यांनी प्रतिबद्ध न्यायपालिकेची मागणी केली होती. ते निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांकडून वचनबद्धता घेतात, देशाप्रती कोणतीही वचनबद्धता ठेवत नाहीत. १४० कोटी भारतीय त्यांना नाकारत आहेत, यात काहीच आश्चर्य नाही,’ अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

Maherchi Sadi: सुपरहिट माहेरची साडी चित्रपटाच्या दिग्दर्शकांची मोठी घोषणा

तब्बल ३४ वर्षांनी दिसणार ‘या’ भूमिकेत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील माहेरची साडी हा सर्वात गाजलेला चित्रपट अजूनही लोकांच्या मनात घर करुन बसला आहे. यातील गाणी आजही मराठी रसिकांच्या ओठांवर आहेत. मराठी सिनेमांत सर्वात उच्चांक स्थानवर असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते नवाकोरा चित्रपट घेऊन येणार आहेत. माहेरची साडी नंतर तब्बल ३४ वर्षांनी विजय कोंडके पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला सर्वांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली विजय कोंडके जाणून आहेत. त्याच धर्तीवर ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विजय कोंडके काय म्हणाले?

निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचललं. या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी २६ एप्रिलला घेऊन येतोय, असं विजय कोंडके यांनी म्हटलं. त्यामुळे हा नवा चित्रपट काय धमाल आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत; रुग्णालयात केलं दाखल

राहत्या घरातच झाला अपघात…नेमकं काय घडलं?

पुणे : राज्याचे सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. त्यांना पुण्यातील (Pune) औध येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुढील १२ ते ५ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. राहत्या घरातच त्यांना ही दुखापत झाल्याचे समजत आहे.

दिलीप वळसे पाटील अंधारात लाईट सुरु करायला जात होते, त्यावेळी त्यांचा पाय घसरला, ते पडले आणि त्यांना दुखापत झाली. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात काहीसं चिंतेचं वातावरण आहे.

काय आहे दिलीप वळसे पाटील यांची पोस्ट?

दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः एक्स पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन’, अशी पोस्ट दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

Arvind Kejriwal: अखेर मुदत वाढलीच! अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी

नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरुवारी रात्री अटक केली होती. गुरुवार २१ मार्च रोजी रात्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी (ED) कोठडी देण्यात आली होती. सहा दिवसीय ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतरही ईडीने आणखी सात दिवसांची कोठडी मागितली. ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला. काल दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना कोणताही अंतरिम दिलासा नाकारला होता आणि अटक व रिमांडला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर नोटीस बजावली होती.

विद्यमान मुख्यमंत्री चौकशीदरम्यान चुकीची उत्तरे देत आहेत आणि एजन्सीला गोव्यातून बोलावलेल्या काही व्यक्तींशी त्यांचा सामना करणे आवश्यक आहे. त्यामुळे ईडीने आणखी सात दिवसांची कोठडी मागितली. मुख्यमंत्री असेल तर त्याची निर्दोष मुक्तता होत नाही. मुख्यमंत्र्यांसाठी वेगळे मानक नाहीत. मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा अधिकार सामान्य माणसापेक्षा वेगळा नाही, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले.

रिमांडची मागणी करताना ईडीने सांगितले की, मोबाईल फोनमधून डेटा काढण्यात आला असून त्याचे विश्लेषण केले जात आहे. मात्र, २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांच्या परिसरात झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या अन्य चार डिजिटल उपकरणांचा डेटा अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

अभिनेता गोविंदाचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश…

अभिनेता गोविंदा अहुजा यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वयाच्या कारणास्तव शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा असल्याने एकनाथ शिंदे या वायव्य मुंबईसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्यासाठी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांनी राजकारणात यायला नकार दिला होता. पण आता गोविंदाच्या रुपात त्यांना उमेदवार मिळाला आहे.