Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीVinayak Mete : विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Vinayak Mete : विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूची (Vinayak Mete Car Accident) सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते. मेटे यांच्या अपघात प्रकरणी सीआयडीने चौकशी केली आहे. त्यानुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात सीआयडीकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तपासानंतर सीआयडीने कलम ३०४ (२) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ज्या मार्गावरून विनायक मेटे (Vinayak Mete) यांची कार अपघात स्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आले होते.

सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १२० ते १४० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम याने राइट घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाजूला जागा नव्हती कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आले होते, पण तरीही त्याने कार तिथे घातली आणि त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात हे समोर आले आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मेटेंचा चालक एकनाथ कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता त्याला अटक होणार हे निश्चित आहे. आज किंवा उद्या त्याला पोलीस ताब्यात घेतील. ३०४ (अ) या कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यास त्यामध्ये फक्त दोन वर्षांपर्यंत शिक्षा होते. पण सीआयडीकडून ३०४ (२) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याला मोठी शिक्षा होऊ शकते. कारण अशा प्रकारे कार चालवून अपघात होऊ शकतो आणि यामुळे कारमधील सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्याने वेगात कार चालवली आणि नंतर अपघात झाला. यामुळेच त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येईल.

विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. यानंतर मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सांगितले होते. या अपघात आणि मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले होते.

संबंधित बातम्या…

मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार सीआयडी चौकशी : मुख्यमंत्री

विनायक मेटे यांचे अपघाती निधन; मराठा चळवळीचा नेता हरपला

विनायक मेटेंच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान; नारायण राणेंनी व्यक्त केलं दु:ख

ओव्हरटेक करण्याच्या नादात विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -