Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : गोवरची साथ अन् मुंबईकरांना चिंता!

अग्रलेख : गोवरची साथ अन् मुंबईकरांना चिंता!

कोरोनाचा काळ आठवला की, अंगावर शहारे येतात. कोरोनाच्या लाटेतून मुंबईकर नव्हे तर देश आता सावरायला लागला आहे. आर्थिक चक्रामुळे कुटुंबाची विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न मुंबईकर करत आहे. त्यात आता लहान मुलांच्या आजाराची साथ मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. घरातील लहान मूल आजारी असेल, तर कुटुंबाचे स्वास्थ बिघडते, हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे या साथीची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. जन्मत: बाळाला ट्रिपल डोस दिले जातात. हा डोस या बालकांना मिळाला नाही का? यावर आता चर्चा होऊ लागली आहे; परंतु लहान मुलांचे लसीकरण हे काटेकोरपणे होत आहे का? ते लसीकरण शंभर टक्के लहानग्या मुलांना देण्याची मोहीम या आधी यशस्वी झाली होती का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबईतल्या काही भागांमध्ये लहान मुलांमध्ये गोवर पसरल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई परिसरात गोवर या आजाराचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आतापर्यंत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला असून सध्या गोवरचे शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, तर ६१७ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. या आजाराची केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून, केंद्रीय आरोग्य पथकाची सध्या विविध रुग्णालयांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाहणी सुरू आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत मुंबईत गोवरचे (Measles) सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन महिन्यांत गोवरच्या ८४ रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने आणि बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या नोव्हेंबर महिन्यात शंभरीच्या पुढे गेली आहे. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ९ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण केले आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांची आरोग्य तपासणी करत आहेत.

गोवर हा रोग एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर आपल्यासारख्या उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही. पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळ्यात हा आजार जास्त आढळतो. गोवराचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणू प्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवराची लक्षणे दिसू लागतात. गोवराचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. ते आधी रसग्रंथी, पांथरी, टॉन्सिल, तोंडाचा अंतर्भाग, श्वासनलिकांचे आतले आवरण, इत्यादी जागी पसरतात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकांच्या आतल्या भागात होतात. म्हणूनच गोवरामध्ये खोकला येतो. बऱ्याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणाऱ्या सुजेमुळे उठतात. कुपोषित मुलांमध्ये या सर्व दुष्परिणामांची तीव्रता वाढते. बालकाला आधीचा क्षयरोग असेल, तर तो जोर धरतो. या आजाराने कुपोषणाची तीव्रता वाढते. कधी कधी विषाणूंमुळे मेंदूला सूज येते. त्यामुळे, गोवर किंवा रुबेलाची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

या आजाराबाबत काही अंधश्रद्धा आहेत. गावठी पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मुलांना अपायकारक होऊ शकतो. “काही जण गोवरच्या आजारावर उपचार म्हणून लिंबाचा पाला वापरतात किंवा लिंबाच्या पाल्यावर मुलांना झोपवले जाते. अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. नागरिकांनी घरच्या घरी असे कोणतेही उपचार करू नयेत. गोवरची कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करावेत”, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच “गोवरमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. तसेच यात बालकाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा किंवा टाळाटाळ न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत,” असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

मुंबईत गोवरच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता, महापालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, ही चांगली बाब आहे. तसेच ठिकठिकाणी शिबिरे, लसीकरण केंद्र उघडण्यात आली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जात असून, स्वच्छता राखण्याचे आणि लहान मुलांसाठी लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

गोवर हा आजार विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक पाहिला जातो, तर काही वेळा मोठ्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. पोलियोमुक्त भारत ही मोहीम देशभर राबविण्यात आली. पोलियोचा डोस घ्यावा, यासाठी सरकारकडून अमिताभसारख्या अभिनेत्यांला सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्या आहेत. गोबरसारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य सेविकांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. बदलते तापमान, वातावरणामुळे लहान मुलांना होणारे आजार टाळण्यासाठी आता सतर्क राहण्याची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -