प्रा. प्रतिभा सराफ

मी दचकून जागी झाले. माझ्या लक्षात आले की, मी एक स्वप्न पाहिले आहे. ते स्वप्न मला जसेच्या तसे आठवत आहे. खरंतर याचीही मला गंमत वाटली.

ते स्वप्न असे आहे की, एक ठाण्याचा कार्यक्रम करून साधारण नऊ-साडेनऊ वाजता मी हॉलमधून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. रहदारीचा रस्ता होता. मला उगाचच असा संशय आला की, आपण रस्त्यावर उभे आहोत त्याच्या विरुद्ध दिशेकडे जायचे आहे. म्हणजे मला चेंबूरला जायचे आहे आणि मी कल्याणकडे जायच्या रस्त्यावर उभी आहे. समोरच्या कोपऱ्यावर मला दोन तरुण मुले दिसली आणि मी त्यांना विचारले, “अरे मुलांनो मला सांगा की, मला चेंबूरला जायचे आहे, तर हायवेला जाण्यासाठी मला इथे उभं राहायचं आहे की, रस्ता ओलांडून उभं राहायचं आहे?” तर त्यातला एक म्हणाला, “तुम्ही तुमच्या मागची एक छोटीशी गल्ली पार केलीत, तर डायरेक्ट हायवेवर जाल, इथून टॅक्सी-रिक्षाने तुम्हाला पंधरा मिनिटं ठाण्यातच फिरावं लागेल.”

मी काही बोलायच्या आत एकजण म्हणाला, “आम्ही गल्लीतूनच जाणार आहोत. तुम्हीपण आमच्या सोबत या.” मी सहजपणे त्या मुलांच्या मागोमाग गेले. साधारण गल्लीचा अर्धा भाग ओलांडल्यावर लक्षात आलं की, उजव्या बाजूला काही बिल्डिंगची मागची बाजू येतेय, तर डाव्या बाजूला छोटेसे जंगल आहे, ज्याच्यात संपूर्ण काळोख पसरलेला आहे. एका मुलाला फोन आला म्हणून तो हळूहळू बोलत चालला आहे. त्या मुलाच्या मागे मी आणि पहिला मुलगा मध्येच जंगलाकडे वळलो. त्या क्षणाला मला प्रचंड भीती वाटली आणि मी मागे फिरले आणि जीव तोडून पळू लागले. माझं पळणं पाहून त्यातला मोबाइलवर बोलणारा मुलगा ओरडला, “मॅडम… मॅडम…” मी कुठेही न थांबता पळत राहिली. रस्त्यावर जी पहिली रिक्षा उभा होती, त्या रिक्षात चढले. रिक्षावाल्याला म्हणाले, “भैया… चलो.” त्यानेही रिक्षा चालू केली आणि एका मिनिटानंतर मी त्याला सांगितले की, मला चेंबूरला जायचे आहे म्हणून!

आता या घटनेचा मी विचार करतेय की, नेमकी कोणती भीती मला वाटली? आता माझी पन्नाशी ओलांडली आहे. तरीही मनामध्ये ‘स्त्री’ म्हणून एक भीती आहे. ही भीती स्त्रीचा कायम पाठलाग करते. मग मी विचार करू लागले. अलीकडे एकतर कोणत्याही कार्यक्रमानंतर तिथूनच मी ओला-उबर करून निघते किंवा कोणीतरी आयोजक-संयोजक कमीत कमी मी कुठल्या तरी वाहनात चढेपर्यंत सोबत येतात. या पार्श्वभूमीवर स्वप्नातल्या त्या प्रसंगात मी नेमके एकटी का निघाले? मुलांच्या मागोमाग का गेले? त्या मुलांच्या मनात खरोखरी काही पाप होते का? मग मी माझ्या मेंदूवर आणखी जोर दिला आणि लक्षात आले की, गेले तीन दिवस मी वर्तमानपत्र वाचले, टीव्ही पाहिला, मोबाइलवर व्हाॅट्सअॅप-फेसबुक-ट्विटर सगळीकडे केवळ आणि केवळ बलात्काराच्या बातम्याच झळकत होत्या. या बातम्या किती मनावर खोल परिणाम करतात. दिवस-रात्र आणि स्वप्नातसुद्धा आपल्याला असंच काहीतरी दिसू लागते. म्हणूनच म्हणतात ना,

“बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो!”

कोणीही नेहमीच सतर्क राहून स्वतःची काळजी घेतली पाहिजे. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवायला नको. हे मात्र जरी खरे असले तरी, जर गेले दोन-तीन दिवस मी कोणती तरी चांगली बातमी पाहिली असती, चांगला विचार केला असता, तर कदाचित मला असे स्वप्नच पडले नसते!