Wednesday, June 26, 2024
Homeमहत्वाची बातमीUdayanraje Bhosale : देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे

Udayanraje Bhosale : देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे

धर्मांध राजकारणावर उदयनराजे भोसले यांचा कडाडून प्रहार

सातारा : देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत आणि आपण म्हणतो २१व्या शतकात आपण प्रगती करतो आहोत. ही प्रगती आहे का? जर प्रगती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराने जावे लागेल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या २७३व्या स्मृतिदिनानिमित्त साता-यात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांचे शिल्प देऊन उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला.

उदयनराजे म्हणाले की, थोर पुरुष होते म्हणून आपण लोकशाहीत वावरतो आहे. ते नसते, तर आपण गुलामगिरीत असतो. परंतु, त्यांची बदनामी केली जाते त्याचे वाईट वाटते. थोर पुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विकृतीत वाढ झाली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर होत चाललेला आहे. स्वार्थापोटी तेढ निर्माण केली जात आहे.

ते पुढे म्हणाले, घराणेशाहीमुळे विकेंद्रीकरण लांबच राहिले, फक्त भाषणात विकेंद्रीकरण असते. बाकी सगळीकडे केंद्रीकरण आहे. जर हे केंद्रीकरण असेच सुरू राहिले, तर देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.

सर्वधर्मसमभावाची राज्यकर्त्यांनी व्याख्या बदलून टाकली, हे घातक आहे. जेव्हा तुकडे होतील तेव्हा प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल. जशी देशाची वाताहत होईल तशी आपल्या कुटुंबाची देखील वाताहत होणार असल्याचे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवले पाहिजे. ही आताची गरज आहे. थोर पुरुषांचे विचार फक्त एका दिवशी न घेता कायम घेतले पाहिजेत. देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे. त्यांचा विचार हाणून पाडू, आज जगात सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. त्यांचा विचार घेऊन अनेक चळवळी उभा राहिल्या. देशाची प्रगती म्हणजे काय? प्रत्येकाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. राज्याची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची ‘काशी’ होईल, अशी संतप्त भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -