Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीMargashirsha : मार्गशीर्ष गुरुवार चार की पाच?

Margashirsha : मार्गशीर्ष गुरुवार चार की पाच?

मार्गशीर्षात अमावास्यायुक्त गुरुवारी महालक्ष्मी उद्यापन करावे का?

मुंबई : मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यात हिंदू महिला दर गुरूवारी महालक्ष्मी मातेचं व्रत करतात. या महिन्यात प्रत्येक गुरूवारी महिला व्रत करत संपूर्ण दिवस उपास धरतात. शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते. ही पद्धत दरवर्षी परंपरेनुसार केली जाते. यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात ५ गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरूवारी अमावास्या असल्याने अनेक महिलांमध्ये या व्रताचे उद्यापन कधी करावे, असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर आम्ही अनेक धर्म अभ्यासक आणि पंडितांशी याबाबत सखोल चर्चा केल्यानंतर तुमच्यासाठी त्याची उत्तरं घेऊन आलो आहोत.

Mahalaxmi Puja

मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरात मांस मच्छी टाळली जाते. तसेच दर गुरूवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा केली जाते. या निमित्ताने घराघरात नवचैतन्य निर्माण होते आणि एक सात्वीक वातावरण तयार होते.

कुटुंबात सुख- शांती नांदावी, दुःख, रोगांचा नाश व्हावा अन् धन- धान्याची संपन्नता लाभावी, मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

यंदा मार्गशीर्ष महिन्यात ५ गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की ४ गुरुवार करावे की ५ गुरूवार करावे? यासह दि. २२/१२/२०२२ रोजी शेवटचा गुरुवार अमावास्यायुक्त असल्याने या दिवशी व्रत करावे का? असा अनेक महिलांना प्रश्न पडला आहे.

२२ डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार आहे परंतु त्या दिवशी अमावस्या चालू होत असल्यामुळे बऱ्याच सुवासिनी चौथ्या गुरुवारी म्हणजे आजच्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत. परंतु पंचांगकर्ते आणि शास्त्रपुराण जाणणारे हेच सांगत आहेत की, या महिन्यात पाचवा गुरुवार शेवटचा आहे आणि त्या दिवशी अमावास्या जरी चालू होत असली तरी महालक्ष्मी मातेचे शेवटचे उद्यापन हे २२ तारखेलाच करायचे आहे. त्यात कुठलीही अडचण नाही.

धर्मसिंधू आणि निर्णयसिंधु ग्रंथानुसार अमावास्यायुक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो. हे महालक्ष्मी मातेचं व्रत आहे आणि आपण दिपावलीत लक्ष्मीपुजन सुद्धा अमावस्येलाच करतो. त्यामुळे यावर्षी महिलांना अमावस्येला लक्ष्मीपुजन करण्याचा चांगला अगदी दुग्धशर्करा योग लाभला आहे.

त्यामुळे गुरूवार, २२ डिसेंबर या दिवशी उपवास करावे. यासह नित्य नियमानुसार व्रत पुर्ण करावे. यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही. याउलट मार्गशीर्षात देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने भक्तीभावाने पुजन करावे.

हिंदू धर्मात विविध व्रत वैकल्य केले जातात. जसे की, सोळा सोमवार, संकष्टी चतुर्थी, एकादशी, गुरूवार आदी प्रत्येक व्रत हे तिथी, वार यानुसार विशेष मानून केले जाते. ज्या व्रताला जे महत्त्वाचे त्यानुसार त्याचा निर्णय केला जातो.

अडीअडचणीत त्यात जननाशौच (सोयर) मृत अशौच (सुतक ), मासिकधर्म अशा कारणांमुळे कालावधी कमी अधिक करावा लागतो. किंवा प्रासंगिक बदल करावे लागतात. अशावेळी जाणकारांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते.

दरवर्षी असंख्य भाविक मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी व्रत करतात. हे व्रत देखील उपरोक्त विधी नियमास धरूनच आहे. हे व्रत करताना प्रामुख्याने महिना आणि वार हे दोन्हीही विशेष मानले गेले आहे.

यावर्षी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते अमावास्या या काळात पाच गुरुवार येत आहेत. जरी पाचव्या गुरुवारी अमावास्या येत असली तरी ती मार्गशीर्ष अमावास्या आहे. अशा स्थितीत पाचवा गुरुवार देखील मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्याने या वर्षी अमावास्येच्या दिवशी येत असलेल्या गुरुवारी व्रत उद्यापन करावे. यासाठी अमावास्या वर्ज्य नाही, असे काही गुरूजींनी सांगितले.

महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक बाजारात आणि पीडीएफ फाईल ऑनलाईन सुद्धा मोफत उपलब्ध आहे. 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -