Wednesday, May 8, 2024

‘तीर्थरूप’

कथा : डॉ. विजया वाड

टपटप टपटप टप्प टप्पाटप

पाऊस पडतो जोरात, थेंब टपकती तालात…

अरुंधती, रंगात येऊन गात होती नि मुले टाळ्या वाजवून गात दाद देत होती. वर्गभर आनंद उधाणवारा झाला होता. निरीक्षक वर्गाबाहेर आडोशाला उभे राहून रंगले होते. हेडमास्तर येताच चेहरा गंभीर करून म्हणाले, “काय चाललंय काय?” हेडमास्तर बावरले. “अस्सा गोंधळ घालतात बघा! कितीदा सांगितलं! गाऊ नका! गाऊ नका! पण ऐकायचं म्हणून नाव नाही.” “अहो, हेडमास्तर हे फार छान चाललंय. मी प्रसन्न आहे.” निरीक्षक म्हणाले. हेडमास्तर गडबडले. “असं का? मला आपलं वाटलं! की……” “काय? मी रागावलो?” “हो.” हेडमास्तर धीर करून बोलले. “शिक्षण ही आनंददायी अनुभवांची मालिका व्हावी, असं मला फार वर्षांपासून वाटत आलंय. ते ‘आज’ पूर्ण झालं.” “असं का? वा वा! चला आपण अरुंधतीचं कौतुक करूया.” “कोण? त्या टीचर? अरुंधती?”

“फार छान! गाणी सुरेख म्हणते. आवाजात मधुरता आहे.” हेडमास्तर शब्द जुळवीत कौतुकले. दुक्कल वर्गात शिरली. हेडमास्तर नि निरीक्षक. अरू गोंधळली. “सॉरी सर. पुन्हा नाई गाणार.” हेडमास्तरांना म्हणाली. “अहो, अरूबाई गा… गा… गा तुम्ही.” निरीक्षकांना आवडले, म्हणजे अरू ‘विशेष’ शिक्षकच झाली. हेडमास्तर मनात म्हणाले. “काय चाललंय!” वर्ग स्तब्ध झाला. “समजदार!” झाला. “नमस्ते, मोठे सर” वर्ग अभिवादन करीत म्हणाला….

“नमस्ते.” “अरुंधती मॅम, तुमचा आवाज ‘पद्मश्री’ दर्जाचा आहे.” “थँक्यू सर.” अरू मोठ्या नम्रपणे म्हणाली. “बाई गाण्याच्या कोविद आहेत, मोठे सर.” “बाई खूप छान गातात!” स्तुतिसुमनांचा वर्षाव होऊ लागला. “बरं” हेडमास्तर गरम झाले. वर्ग चिडीचूप! “अहो, रागवू नका हेडमास्तर, दॅट डज हाऊ टीचिंग शुड बी!” “टाळ्या!” मॉनिटरने आज्ञा केली. “टाळ्या!” कोरसचा गज्जर झाला. “ही कविता कशी वाटली?” “जन्मात नाही विसरणार! पाऊस पडला मनभर.” एक बोलकी प्रतिक्रिया आली. “निरीक्षक, पण खूश आहेत अरूबाईंवर.” निरीक्षक मोकळेपणाने म्हणाले.

हेडमास्तर उजळपणे म्हणाले…, “माझंही अगदी तेच मत आहे.” “गा बघू. अरूमॅमनी शिकवलेलं गाणं!” “देश हा देव असे माझा!” मॉनिटरने सुरुवात केली. वर्गाने सुरेल साथ दिली. “निरीक्षक खूश! ९वीच्या मुलांनो, अरूबाई ब्राव्हो!”

“क्लास कंट्रोलचा जरा प्रॉब्लेम आहे.” हेडमास्तर मिठाचा खडा टाकीत म्हणाले. “सर्वात मोठा कोण?” “देश, भारत.” जोरात कोरस. “क्लास कंट्रोल इज अ प्रॉब्लेम.”

हेडमास्तर म्हणाले, जवळजवळ कुरकुरलेच! पण निरीक्षकांनी त्याकडे बिलकूल लक्ष दिले नाही. अरुंधतीला शाळेच्या बुकात ‘उत्कृष्ट’ असा विशेष शेराही दिला. ‘देशभक्त निर्माण करणारी शिक्षिका!’ कौतुक झाले. लेखी शेरा. आता अरूला कसे काढणार? इंटरनॅशनलचे ध्येय होते… मुले ‘ग्लोबल’ करणे. पालकांचा जोर वाढला होता. त्यांना आपली मुले यू. एस्. ला पाठवायची होती. अरूला ‘गावठी’ म्हणून काढा! असाही रेटा होता.

हेडमास्तर मनाशी म्हणाले, ‘निरीक्षक जाऊ देत.’ … ‘मग आपलेच राज्य.’ पण, अरूचे शोधनिबंध लक लागून किंवा कस लागून पेपरात गाजले, वाजले. ‘‘जे देशासाठी करता येईल, ते ते करा. परदेशात शिका; पण ती कला भारतात आणून, भारताचे ‘नाव’ मोठे करा.’’ साक्षात् पंतप्रधानांकडून शाबासकी. वा! वाहवा! तोंड दाबून बुक्क्यांचा मार. राज्यपुरस्कार चक्क…! क्या कमाल! है ना? अरुंधतीचा सरकारी पुरस्कार भरपूर गाजला, वाजला आणि ही ‘गावठी’ मुलगी त्या शाळेत ‘पक्की’ सीट झाली. इंटरनॅशनल शाळा! पण भारतातच होती ना? कोण बोलणार हो?! उघड उघड ‘मदर इंडिया’ असंच म्हणावं लागतं ना! ‘आता विश्वात्मके देवे’ प्रार्थना असली तरी ओठावर, पोटातून नाहीच! “कोण म्हणतं? भारत खराब…! कोण म्हणतं? भारत भिकार…! माझा देश संपन्न आहे.

जगात सुसंस्कृत! उभ्या विश्वात वंदनीय आहे… “मी भारतीय आहे. मज सार्थ गर्व आहे. माझ्याच भारताचे मी एक बीज आहे.” “काळीच आई माझी… मजला, अतिव प्यारी तव प्राण रक्षिण्याला, मम् जीव हा करारी…” मुले म्हणत होती…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -