Monday, May 20, 2024
Homeक्रीडाअफगाणिस्तानसमोर आज नामिबियाचे आव्हान

अफगाणिस्तानसमोर आज नामिबियाचे आव्हान

शारजा (वृत्तसंस्था): टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीतील ग्रुप २ मधील ‘संडे स्पेशल’ लढतीतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर नामिबियाचे आव्हान आहे.

अफगाणिस्तानने दोन सामन्यांत एका विजयासह दोन गुण मिळवले आहेत. त्यांनी स्कॉटलंडला हरवले, तरी पाकिस्तानविरुद्ध काहीच चालले नाही. नामिबियाने स्कॉटलंडवर मात करताना गुणांचे खाते उघडले. अफगाणिस्तान संघ विजयपथावर परतण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे, विजयी सलामीनंतर नामिबिया संघ सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि न्यूझीलंडमध्ये ग्रुप २ मधून दुसऱ्या स्थानासाठी चुरस असली तरी त्यांच्यापैकी एकाने कच खाल्ल्यास अफगाणिस्तान किंवा नामिबियाची आगेकूच करण्याची संधी वाढेल. या स्थितीत रविवारची लढत दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

अफगाणिस्तानची फलंदाजी बहरलेली नाही. दोन सामन्यांत केवळ नजीबुल्लाह झाड्रनला अर्धशतक झळकावता आले आहे. कर्णधार मोहम्मद नबीसह रहमतुल्ला गुरबज, गुलबदीन नैब आणि हझरतमुल्ला झाझाईने छाप पाडली आहे, मात्र असघर अफगाण, मोहम्मद शहझाद आणि करिम जानत यांना सूर गवसल्यास अफगाण संघाची फलंदाजी उंचावेल. मुजीब रहमान आणि रशीद खानने अचूक मारा केला आहे, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्यांना अपेक्षित साथ मिळालेली नाही.

गेरहार्ड इरॅस्मसच्या नेतृत्वाखालील नामिबियाच्या स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात डावखुरा मध्यमगती रूबेन ट्रम्पलमॅनसह जॅन फ्रीलिंक, जेजे स्मिट, डेव्हिड विस हे गोलंदाज चमकले. आव्हान फार कमी असूनही सहा विकेट पडल्या. अष्टपैलू स्मिटमुळे त्यांना विजय मिळवता आला. अफगाणिस्तानविरुद्ध नामिबियाच्या आघाडीच्या फलंदाजांना जास्तीत जास्त योगदान द्यावे लागेल, तसेच गोलंदाजांना सातत्य राखावे लागेल.

वेळ : दु. ३.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -