Wednesday, June 26, 2024
Homeमहत्वाची बातमी“शेअर बाजारात वाढेल साखरेचा गोडवा”

“शेअर बाजारात वाढेल साखरेचा गोडवा”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराच्या मागील आठवड्यात निर्देशांकात घसरण पाहावयास मिळाली. या आठवड्यात देखील सोने या मौल्यवान धातूने पुन्हा एकदा विक्रमी वाढ दर्शविली. या आठवड्यात सोन्यामध्ये जवळपास २००० रुपयांची मोठी वाढ झाली. तांत्रिक विश्लेषणानुसार चार्टचा विचार करता अल्पमुदतीसाठी सोन्यामध्ये मोठ्या तेजीनंतरची तात्पुरती मंदी येऊ शकते हे आपण आपल्या मागील लेखातच सांगितलेले होते. त्यानुसार मागील आठवड्यात सोन्यामध्ये करेक्शन अर्थात तेजीनंतरची तात्पुरती मंदीला सुरुवात झालेली आहे. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार सोन्याने तेजी सांगणारे संकेत दिलेले आहेत त्यामुळे सोन्यामध्ये होणारे करेक्शन ही खरेदीची संधी असेल.

सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा अजूनही मंदीची असून टेक्निकल अॅनालिसीसनुसार मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक, ज्युबिलीएंट फूड यांसारख्या अनेक दिग्गज शेअर्सची दिशा मंदीची झालेली आहे. आपण आपल्या मागील लेखातच “आरती इंडस्ट्रीज लिमिटेड” या शेअरने ८४० ही पातळी तोडत मंदी सांगणारी रचना तयार केलेली असून आज ८३० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी ७ ते १० टक्क्यांची घसरण होणे अपेक्षित आहे, असे सांगितलेले होते. त्यानंतर या एकाच आठवड्यात आरती इंडस्ट्रीज लिमिटेड या शेअरने ७८२ हा नीच्चांक नोंदविला. टक्केवारीत पाहायचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर एकाच आठवड्यात या शेअरमध्ये जवळपास ५.५० टक्क्यांची घसरण झाली. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५२२६० आणि निफ्टीची १६६७० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकामध्ये मोठी घसरण होणार नाही. निर्देशांक जरी मंदीत असले तरी अनेक शुगर कंपन्यांचे शेअर्स हे तेजीचे संकेत देत आहेत. ज्यामध्ये बलरामपूर चिनी, राणा शुगर, उगार शेअर, धामपूर शुगर हे शेअर्स तेजीमध्ये आहेत. त्यामुळे शेअर बाजारच्या घसरणीत अल्पमुदतीसाठी शुगर सेक्टरकडे लक्ष हवे. सध्या चालू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यानंतर शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर पुढील आठवड्यासाठी शेअर बाजारात जर तेजी आलीच, तर या बाऊन्स बॅकमध्ये निफ्टी १६८५० पर्यंत उसळी घेऊ शकते. शेअर बाजारात पुढील काळात होणारी वाढ कितपत टिकेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या शेअर बाजारात येणारा प्रत्येक बाऊन्स हा विक्रीची उत्तम संधी असेल. मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीमध्ये मंदीचा “हेड अँड शोल्डर” तयार झालेला आहे. हेड शोल्डर फोर्मेशन तयार होणे हे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार मोठ्या घसरणीचे संकेत देत आहे. त्यामुळे सावधानतापूर्वक व्यवहार करणे अपेक्षित आहे. निफ्टीमध्ये पुढील काळात मध्यम मुदतीत आणखी २००० अंकांची घसरण होणे अपेक्षित आहे. बँकनिफ्टीमध्ये देखील मंदीची रचना तयार झालेली आहे. या रचनेनुसार बँकनिफ्टी पुढील काळात मध्यम मुदतीत जवळपास ३००० अंकांची मोठी घसरण पाहावयास मिळू शकते. त्यामुळे पुढील काळात निफ्टी १४०००, तर बँकनिफ्टी ३२००० या पातळीपर्यंत येणे अपेक्षित आहे. आपण मागील लेखातच कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७१०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते हे सांगितलेले होते. त्यानंतर एकाच आठवड्यात कच्च्या तेलात आणखी विक्रमी वाढ होत कच्च्या तेलाने ९९९६ हा नवीन उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्यासाठी मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ७८०० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल ७४०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील.

अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५२५०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्याच्या आपल्या लेखात दीर्घमुदतीसाठी कोणत्या शेअर्सकडे लक्ष हवे आणि त्यामध्ये साम्राज्याच्या दृष्टीने योग्य वाटणारा शेअर कोणता हे सांगितले जाईल.

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -