Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभाजपच्या वाढलेल्या ताकदीचा फायदा मुंबईला

भाजपच्या वाढलेल्या ताकदीचा फायदा मुंबईला

सीमा दाते

मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत असताना भाजप जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप यशस्वी होईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच काय तर नुकत्याच ५ पैकी ४ राज्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे भाजपची ताकद वाढली आहे, त्याचा फायदा भाजपला आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये होणार हे नक्की.

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला १३४ हून अधिक यश मिळणार, अशी घोषणा आधीच भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली आहे, त्यामुळे भाजपचे मिशन १३४ प्लस सुरू झाले आहे. त्यातच गेले कित्येक वर्षं मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसमोर जिंकण्याचे आव्हान भाजपकडे असणार आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र भाजप एकटाच स्वबळावर लढून १३४ हून अधिक नगरसेवक जिंकवून आणेल असा विश्वास भाजपला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मैदानात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, सपा आणि शिवसेना उतरणार असली तरी ही निवडणूक शिवसेना आणि भाजप आमने-सामने होईल असे दिसते. त्यामुळे भाजप हवी तितकी ताकद लावून मुंबई महापालिका जिंकण्याची आणि शिवसेनाच्या हातून सत्तेची चावी खेचून घेण्याच्या तयारी करत आहे.

२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप केवळ काहीच संख्येने महापालिकेतील सत्तेपासून दूर राहिली होती. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच मतांमध्ये फरक होता मात्र शिवसेनेने आपली एकहाती सत्ता महापालिकेवर स्थापन केली. भाजपला कोणती ही समिती देखील देण्यात आली नव्हती, त्यामुळे भाजपकडे संख्याबळ असतानाही भाजपने मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांची भूमिका बजावली आणि याच भूमिकेतून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणावे लागेल. ४ राज्यांच्या यशानंतर भाजपची ताकद आणखी वाढली असल्याचे बोलले जाते, त्यातच या निवडणुका जिंकल्यानंतर मुंबईत भाजपने केलेले शक्तिप्रदर्शन, मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेले आंदोलन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसनंतर भाजपचे ठिकठिकाणी आंदोलन हेच दाखवून देते की, भाजपची ताकद किती वाढली आहे. यामुळे भाजप आता मुंबइं महापालिकेवर सत्ता स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.

मुंबई महापालिकेची सर्व धुरा देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेच. पण आमदार आशीष शेलार हेही नेतृत्व करणार आहेत. त्यानंतर आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, आमदार अतुल भातखळकर अशा अनेक मोठ्या चेहऱ्यांवर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आहे, तर महापालिकेतून विधान पारिषदेवर आमदार म्हणून गेलेले राजहंस सिंह हे देखील आहेत, तर गेली पाच वर्षे महापालिकेत बसून सत्ताधारी शिवसेनेवर लक्ष ठेवलेले भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांच्यावर देखील तितकीच जबाबदारी आहे त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सगळी ताकद पणाला लावून आधीच मैदानात उतरली आहे. एकीकडे शिवसेनेतील मोठ्या नेत्यांवर केलेल्या धडींमुळे शिवसेनेची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहेच. पण भाजप मुंबईत मराठी कट्ट्याच्या या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी मनात घुसू पाहत आहे, तर गेले कित्येक वर्षे ज्या मराठीच्या नावावर मतं मिळवली त्याच शिवसेनेने सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर काही जण शिवसेनेवर आधीच नाराज झाले आहेत. त्यात वरळीसारख्या उच्चभ्रू भागात गुजराती कार्डचा वापर केला जातोय. त्यामुळे शिवसेना मराठी मतांपासून दूर राहते की काय असा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय, तर दुसरीकडे मराठी कट्ट्याच्या मध्यानातून आणि आधीच हिंदुत्ववादी भूमिका असल्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेत फायदा होणार असे दिसत आहे.

सध्याचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ पाहता शिवसेनेची सत्ता असली तरी भाजप काहीच अंतराने शिवसेनेच्या मागे आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुंबई महापालिकेत भाजप नंबर एकचा पक्ष होण्याची शक्यता आहे. २०१७ मधील ८३ संख्याबळ आणि गेल्या पाच वर्षांत केलेली तयारी यामुळे संख्याबळ वाढणार आहे, त्यामुळे विद्यमान ८३ नगरसेवक आणि नव्याने जिंकून आलेले नगरसेवक असे करून भाजप जास्त संख्याबळाच्या जोरावर मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करेल. एकीकडे शिवसेना ही आपल्या विकासकामांतून आपली तयारी करत आहे, मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक झाली असली तरी शिवसेनेच्या अर्थसंकल्पातील विकासकामांचे भूमिपूजन सुरूच आहे तर स्वत: पालक मंत्री जाऊन भूमिपूजन करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांना समोर ठेवून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात शिवसेनेने विकासकामांना जास्त प्राधान्य दिले होते, त्यामुळे निवडणुकाआधी या विकासकामांना पूर्ण करणे किंवा त्याची सुरुवात करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांचा कार्यकाळ जरी संपला असून महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली असली तरी प्रशासकांच्या माध्यमातून कामांचे लोकार्पण होताना पाहायला मिळत आहे. मात्र भाजपच्या या पहारेकाऱ्यांकडून प्रशासनावर देखील करडी नजर ठेवली जात आहे. एकीकडे भाजपची वाढलेली ताकद आणि दुसरीकडे भ्रष्टाचारावर भाजप लक्ष ठेवून असल्याने मुंबई महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे.

seemadatte@@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -