Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेफळेगावात नवरात्रीत घुमतो टाळ मृदूंगांचा नाद

फळेगावात नवरात्रीत घुमतो टाळ मृदूंगांचा नाद

२८ वर्षापासून फळेगाव जरिमरी मित्रमंडळाची अविरत परंपरा

कुणाल म्हात्रे

कल्याण : नवरात्र उत्सव म्हटला की, सर्वत्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावलं. दांडियाच्या रासक्रीडेत रममान होऊन तल्लीन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवात गेल्या २८ वर्षांपासून घुमतोय फक्त टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष.

नुकतीच घटस्थापना झाली असून, नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम सर्व भारतभर सुरू रहाणार आहे. डीजेच्या तालावर ठेका धरून नाचणाऱ्या तरुणाईसह, लहानांपासून अबाल वृद्धांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचताना दिसून येतात; परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात मात्र गेल्या २८ वर्षांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळते. येथील जरिमरी मित्रमंडळात नवरात्र उत्सवात मात्र दांडिया ऐवजी टाळ मृदंगाचा आवाज घुमत असून हरिनामाचा जयघोष येथे सुरू आहे.

येथे रोज भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा देखील त्याच उत्साहात हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व व्याख्यानकारांचे कार्यक्रम नऊ दिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. रोज अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. कल्याण तालुक्यातील नवरात्र उत्सवात हरिनामाचा जयघोष करणारे जरीमरी मित्र मंडळ, फळेगाव म्हणून जिल्हात ओळखले जात आहे.

या मंडळाची एक विशेष बाब प्रकर्षाने दिसून येते की, यांचे सर्व कार्यकर्ते हे तरुण आहेत. असे असून देखील या ठिकाणी दांडियाऐवजी धार्मिक कार्यक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नामांवत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत असतात. यंदा देखील फळेगावातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदंगाचा नाद घुमणार असून हरिनामाचा जयघोष सुरू आहे.

आम्हाला आमच्या तरुण मुलांचा अभिमान आहे. गेल्या २८ वर्षांपासून आमची मुलं हा कार्यक्रम अविरतपणे राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत राहणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -