Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकदिंडोरी मतदार संघात भाजपच्या उमेदवारासमोर आव्हानांची मालिका सुरूच

दिंडोरी मतदार संघात भाजपच्या उमेदवारासमोर आव्हानांची मालिका सुरूच

स्वीय सहाय्यकावरील फाजील विश्वास नडला, सामान्य मतदारासोबत स्वपक्षीय नाराज

नाशिक : दिंडोरी मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर रोज नवी आव्हाने उभी ठाकत असून कांदा प्रश्ना पाठोपाठ भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला सर्व संपन्न यंत्रणेच्या जोरावर डॉ. पवार सर्व मतदार संघ पिंजून काढत असतांना ठिकठिकाणी कांदा निर्यात बंदी पासून कांदयाचे कोसळणारे भाव, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, मतदार संघातील अन्य पायाभूत सुविधा याबद्दल प्रश्न विचारून मतदारांनी त्यांना हैराण केले आहे. अनेक गावात त्यांना शेतकऱ्यांच्या घेरावालाही सामोरे जावे लागले आहे हे कमी झाले म्हणून की काय आता भारतीय जनता पक्षात असलेली त्यांच्याविषयीची नाराजीही समोर येऊ लागली आहे. परिणामी डॉ. भारती पवार यांना विविध अडचणींमुळे अद्याप अधिकृतपणे प्रचाराची सुरुवात करता आलेली नाही.

मतदारसंघात विरोधकांनी त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कांदा निर्यातबंदी यावरून घेरले आहे. विरोधकांशी दोन हात करताना पक्षातील नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचाही सामना त्यांना करावा लागत आहे. या नाराजीचा फटका पक्षाला बसला असून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे यांनी उमेदवार डॉ. पवार यांच्या निषेधार्थ पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्र त्यांनी जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी मांडली आहे.

राजीनामा पत्रात बोर्डे यांनी भारती पवार यांच्या मनमानी कारभारला कंटाळून राजीनामा देण्याबाबत असाच आपल्या पत्राची सुरुवात केली आहे. राजीनामा देण्याचे कारण सांगताना त्यांनी उमेदवारावर विविध आरोप केले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागण्याची शक्यता आहे.

भाजपच्या खासदार डॉक्टर पवार २०१९ मध्ये निवडून गेल्या. तेव्हापासून त्यांचा मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांची संपर्क नाही. त्यांना दूरध्वनी केल्यावर तो डायव्हर्ट केलेला असतो. कोणताही प्रश्न समस्या घेऊन गेल्यास त्या पीएकडे पाठवतात. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणींवर त्या कार्यालयात फोन करीत नाहीत. डॉक्टर पवार यांना भेटायचे असल्यास आधी पीएकडे पाठविले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांशी कोणताही समन्वय राहिलेला नाही, असे गंभीर आरोप बर्डे यांनी आपल्या पत्रात केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी प्रचाराच्या नियोजनासाठीची बैठकीत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना आम्ही प्रचार करायला तयार आहोत. मात्र, आमच्या समस्या आणि तक्रारी ऐकण्यासाठी उमेदवाराला बैठकीत बोलवावे, असा आग्रह धरला. त्यानंतर रात्री तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवार डॉ. पवार यांनी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत बर्डे यांनी आपल्याशी उमेदवार बावीस मिनिटे फोनवर बोलत होते, असे बर्डे यांनी सांगितले.

‘तुम्हाला माझ्याशी शत्रुत्व घ्यायचे आहे का?. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे माझी तक्रार करा. हवे तर माझी उमेदवारी रद्द करून दाखवा. तुम्हाला प्रचारात सहभागी व्हायचं नसेल तर घरी बसा’, या शब्दांत आपल्याला सुनावले. या अपमानामुळे आपण पक्षाच्या सर्व पदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे बर्डे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -