Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडास्वप्नील-आशीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक

स्वप्नील-आशीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या स्वप्नील कुसळे आणि आशी चौकसी यांनी अझरबैजान, बाकू येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

स्वप्नील आणि आशी जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि दारिआ तिकोव्हा जोडीला सुवर्णपदकाच्या लढतीत १६-१२ अशा फरकाने नमविले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी इलाव्हेनिल व्हलारिव्हान, श्रेया अग्रवाल आणि रमिता यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते. महाराष्ट्राच्या स्वप्निलचे विश्वचषक स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले. त्याने पुरुषांच्या रायफल थ्री-पोझिशन वैयक्तिक आणि सांघिक गटात रौप्यपदक मिळवले होते.

५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या मिश्र सांघिक गटाच्या पात्रता फेरीमध्ये स्वप्निल-आशी जोडीने ९०० पैकी ८८१ गुणांची कमाई करत चौथ्या स्थानासह मानांकन फेरीसाठी पात्रता मिळवली. मानांकन फेरीत भारतीय जोडीने ६०० पैकी ५८३ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. युक्रेनची गुणसंख्याही इतकीच होती, मात्र फेरचाचणीत भारतीय जोडीला अव्वल स्थान मिळाले.

भारत दुसऱ्या स्थानी

भारतीय नेमबाजांनी या विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण पाच पदके जिंकली. त्यामुळे स्पर्धेअंती भारत पदकतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला. अग्रस्थानावरील कोरियाच्या खात्यावर तीन सुवर्ण आणि तीन कांस्य अशी एकूण सहा पदके होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -