Thursday, May 9, 2024
Homeमहामुंबईसुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदावर आज शिक्कामोर्तब होणार!

सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदावर आज शिक्कामोर्तब होणार!

शरद पवार होणार राष्ट्रवादीचे एकमेव सल्लागार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जागी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे जाणे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यानुसार आज म्हणजे शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या राष्ट्रवादीच्या संबंधित कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. याच बैठकीत शरद पवार यांची पक्षाचे एकमेव सल्लागार व मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली जाण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

दोन दिवसांपूर्वी, म्हणजे मंगळवारी शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’, या आपल्या सुधारित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी पवार यांनी त्याचवेळेला एक कमिटी घोषित केली होती. या कमिटीची बैठक शनिवारी होणार होती. परंतु ती आता शुक्रवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीत शरद पवार यांची जागा कोण चालवणार हे निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याचवेळेला शरद पवार यांना पक्षाचे एकमेव सल्लागार म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात शरद पवार यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निर्णय घेईल, असे चित्र उभे केले जाईल. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसे वाटेल आणि नव्या नेतृत्त्वालाही संधी मिळेल, असे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे स्वतंत्र पाठीराखे कार्यरत आहेत. त्यामुळेच या दोघांचे गट तेथे प्रकर्षाने जाणवतात. सुप्रिया सुळे यांना जर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले तर अजितदादा नाराज होतील आणि पक्षाच्या भूमिकेविरुद्ध लगेच नसले तरी टोकाचे पाऊल ते उचलू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी अजित पवार यांची नेमणूक होण्याची दाट शक्यता आहे. पक्षाध्यक्ष या नात्याने सूत्रे स्वीकारल्यानंतर सुप्रिया सुळे तसा निर्णय घेऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

जयंत पाटील यांचेही सुप्रियांकडे बोट…

गुरूवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांकडे सविस्तर मत व्यक्त केले. ‘शरद पवार यांचा निर्णय आम्हाला कोणालाही माहीत नव्हता. तो धक्कादायकच होता आणि आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ साली होणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीपर्यंत पवारांनी आपले पद सोडायला नको, अशाच आमच्या भावना आहेत आणि त्यादृष्टीने आम्ही पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. काल रात्री आपण पवारांशी बराच वेळ चर्चा केली. मात्र पवार राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत३, असे त्यांनी सांगितले.

जनतेमध्ये विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांच्या भावनाही आम्ही पवार साहेबांचा कानावर घातल्या. परंतु कमिटी जो निर्णय घेईल तो आपण मान्य करू असे सांगत त्यांनी विषय संपवला. तरीही आम्ही आमचा प्रयत्न करतच राहणार आहोत. मात्र पवारही आपल्या निर्णयावर ठाम आहेत, हेही तितकेच खरे आहे असे ते म्हणाले.

‘राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करण्यात आपल्याला अजिबात स्वारस्य नाही आणि ते पद आपण सांभाळू शकत नाही. महाराष्ट्रात पक्षाचे काम करणे मला शक्य आहे. माझा सर्व संपर्क महाराष्ट्रातच आहे. इतर राज्यांमधल्या कार्यकर्त्यांबरोबर माझा संबंध नाही, संपर्क नाही. इतर पक्षांच्या नेत्यांबरोबरही तसा संपर्क नाही. त्यामुळे ही जबाबदारी मला पेलता येणार नाही. याउलट त्या ठिकाणी अशी व्यक्ती असावी की जी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असू शकेल, जसे शरद पवार साहेब आहेत, असे सांगत जयंत पाटील यांनी शरद पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे फर्स्ट असल्याचे सूचित केले.

शरद पवार आजही यशवंतराव चव्हाण केंद्रात

शरद पवार गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाण केंद्रात जाऊन बसले. अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे – पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे अशा अनेक नेत्यांनी तेथे शरद पवारांशी चर्चा केली. यावेळी बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. शरद पवार यांनी आपला राजीनामा परत घ्यावा याकरीता काही कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहिलेले पत्रही पवारांकडे सोपवले. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आदींनी या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

अखेर शरद पवार स्वतः कार्यकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, पक्षामध्ये नव्या नेतृत्त्वाला वाव मिळावा, पक्ष मजबुतीने पुढे कार्यरत राहावा यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना तुम्हाला मी विश्वासात घेतले नाही याची मला खंत आहे. मात्र तसा प्रयत्न मी केला असता तर तुम्ही मला राजीनामा देऊ नका असाच आग्रह केला असता. मग मी तसा निर्णय घेऊ शकलो नसतो. त्यामुळेच मी तुमच्याशी यावर कोणतीही चर्चा न करता निर्णय घेतला, असेही पवार यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. उद्या कमिटीची मिटींग होईल. त्या मीटिंगमध्ये जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -