Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखबुद्ध जयंतीच्या निमित्ताने...

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने…

जगाला युद्ध नव्हे, बुद्ध हवा, असे एका बुद्धगीतातून एका कवीच्या ओळी गायकाने गायिल्या आहेत. याचाच अर्थ जगाला बुद्धाच्या शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याची वेळ जगभरात सध्या निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. संपूर्ण मानवाला शांततेचा संदेश देणाऱ्या महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज २५६७वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतातच नव्हे, तर जगभरात साजरी झाली. अशा या तेजोमय व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या जयंतीनिमित्त प्रणाम केलाच पाहिजे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहिल्यावर प्रत्येकालाच आपला राग, क्रोध, द्वेष, मत्सर बाजूला ठेवण्याची ईर्ष्या झाली नाही, तर नवलच!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित देशातील प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणाऱ्या भारत गौरव पर्यटक रेल्वे यात्रेला दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून १५ एप्रिल रोजी प्रारंभ झाला. देशाचे पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्येकडील राज्ये विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी आणि सामाजिक न्याय तसेच अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी या गाडीला झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची संघर्षमय कहानी अथवा झलक सर्व प्रवाशांना दाखवणे हा या भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा उद्देश असल्याने देशांतर्गत ‘पर्यटन’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला चालना देण्याच्या भूमिकेतून केंद्र सरकारने ही गाडी सुरू केली. एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांचा हा गौरवच म्हटले पाहिजे. त्याचबरोबर सन्मानही आहे. देशात कोणत्याही पक्षाचे, विचाराचे सरकार आले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी आणि देशातील जनतेसाठी जे कार्य केले ते अवर्णनीय, अविस्मरणीय आहे, हे विसरू शकत नाही.

बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ साताऱ्याचे म्हणजे महाराष्ट्र हे त्यांचे मूळ राज्य; परंतु रामजी सकपाळ सैन्यात असल्यामुळे त्यांना कामाच्या निमित्ताने कुठेही जावे लागत असे. त्यामुळे मध्य प्रदेशातील महू येथे रामजी सकपाळ आपल्या कामाच्या निमित्ताने असताना बाबासाहेबांचा जन्मही तेथेच झाला. आज महू या शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आणि त्या राज्याचेही भाग्य उजळले की, एका महापुरुषाचा जन्म या राज्यात झाला. मध्य प्रदेश सरकारनेही महू या बाबासाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या शहराचा विकास केला. आज देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक बाबासाहेबांचे जन्मस्थळ म्हणून महू शहरात येतात आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी नतमस्तक होतात. नुसतेच नतमस्तक होत नाहीत, तर त्यांचा विचार घेऊन जातात, असे मोठे भाग्य त्यांना लाभते. बाबासाहेबांचे शिक्षण महाराष्ट्र आणि विदेशातच जास्त झाले. तत्कालीन परिस्थितीत पिण्याचे पाणी सार्वजनिक पाणवठ्यावर जाऊन सुद्धा समाजातील लोकांना दिले जात नव्हते. अस्पृश्यता पाळली जात होती. प्रचंड जातिभेद होता. या जातिभेदाचे चटके बाबासाहेब आंबेडकरांनाही बसले. माणसासारख्या माणसाला पाणी मिळू नये, ही कोणती निती आहे, त्यातूनच १९२७ साली महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी घडवून आणला.

धर्मबदलाचा विचार अशाच मानसिकतेतून बाबासाहेबांच्या मनात आला म्हणून त्यांनी नागपूर येथे १४ आक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांच्या या नागपुरातील धम्मदीक्षेमुळे नागपूर हे शहर नावारूपाला आले. आज ऐतिहासिक असे महत्त्व या शहराला प्राप्त झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून बाबासाहेबप्रेमी दीक्षाभूमी या स्थळाला भेट देतात. मुंबई ही तर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहेच. त्यांचे महानिर्वाण दिल्लीत झाले असले तरी त्यांना मुंबईत अग्नी देण्यात आला. त्या मुंबईतील चैत्यभूमीला येऊन लाखो लोक नतमस्तक होतात. एवढेच काय कुणीही राष्ट्रीय नेता, मंत्री वा मान्यवर मुंबईत आल्यावर बाबासाहेबांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ज्या राज्यघटनेमुळे देशाचा कारभार चालतो, जेथे लोकशाही गुण्यागोविंदाने नांदते त्या भारतमातेच्या सुपुत्राच्या जीवनाशी निगडित प्रमुख स्थळांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न या पर्यटन गाडीच्या माध्यमातून केला जात आहे. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला. त्यांनी समता, बंधुता आणि करुणा निर्माण करण्यासाठी कार्य केले. ही रेल्वे त्या समतेची प्रतिनिधी असून, त्यातून प्रवास करणारे प्रवासी बाबासाहेबांच्या तत्त्वांबद्दलच्या अनेक आठवणी आणि ज्ञान घेऊन परत येतील, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे होणार नाही. देशांतर्गत पर्यटनात विशेष रुची असलेल्या सर्किटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ या उपक्रमांतर्गत ही गाडी सुरू करण्यात आली आहे. देशातील नागरिकांनी या गाडीच्या माध्यमातून प्रवास करीत असताना बाबासाहेब आंबेडकर यांची प्रसिद्ध स्थळे पाहण्याची संधी आली, तर त्याचा अवश्य लाभ घेऊन बाबासाहेब समजून घ्यावे आणि त्यांचे विचार आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करावे.

बाबासाहेबांचे जसे तेजपुंज व्यक्तिमत्त्व होते तसेच तेजपुंज व्यक्तिमत्त्व म्हणून गौतम बुद्ध यांचे होते. संपूर्ण जगामध्ये सध्याच्या परिस्थितीत खून, हाणामाऱ्या, दरोडे, गोळीबार, लुटालूट, बॉम्बस्फोट केले जात आहेत. थोडक्यात जगभरात अशांतता निर्माण झाली आहे. शांततेच्या मार्गाने निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तथागतांच्या विचारातूनच त्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. एवढा संदेश जरी ध्यानात घेतला तरी मानवाचे आणि जगाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांची ठिकाणे पाहण्यासाठी जशी पर्यटन गाडी भारत सरकारने सोडली तशीच गौतम बुद्ध यांची लुम्बिनी, सारनाथ, बुद्धगया, कुशीनारा, सांची, अजिंठा अशी जन्मापासूनची त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, धम्मोपदेश आणि महानिर्वाण अशा वरील प्रसिद्ध ठिकाणासाठी भारत सरकारने एखादी रेल्वे गाडी सुरू केली, तर समाजातील सर्व लोकांना त्याचा लाभ घेता येईल. ‘बुद्धांचा भारत’ अशीच आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख आहे, याला आणि पर्यटनाला चालना मिळून त्यातून देशाला मोठा महसूलही मिळेल. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तसा विचार झाल्यास उत्तमच होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -