Wednesday, June 26, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससंघर्षातून यशप्राप्ती

संघर्षातून यशप्राप्ती

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

‘रावरंभा’ या आगामी अनुप जगदाळे दिग्दर्शित व शशिकांत पवार निर्मित मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशेष भूमिकेत आपल्याला एक कलाकार पाहायला मिळणार आहे, ज्याने अगोदर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरलेला कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय श्रीकांत मोघे यांचे सुपुत्र अभिनेता शंतनू मोघे होय. ‘रावरंभा’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका मावळ्याची प्रेम कथा आहे. या चित्रपटाचे लेखक प्रताप गंगावणे असून छायांकन संजय जाधव यांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे आव्हानात्मक असल्याचे शंतनूला वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत इतके पैलू आहेत की, एकही पैलू आपल्या हातून निसटू नये, असे देखील त्याला वाटते. महाराजांच्या पुस्तकांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व लक्षात येत जाते. त्यानंतर महाराजांची भूमिका साकारणे सोपे जाते.

शंतनू मोघे मुळात मेकॅनिकल इंजिनीअर. पुण्यातील भारती विद्यापीठ, सिंहगड कॉलेजमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली. कॉलेज जीवनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला, अभिनयाची गोडी लागली. वडील श्रीकांत मोघे अभिनेते असेल तरी ते आर्किटेक्ट होते. आई एमबीबीएस डॉक्टर होती. बांद्राला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये दवाखाना होता. मामा, आत्या उच्चशिक्षित होते. घरातील वातावरण शैक्षणिक होते. आयुष्यात पुढे कोणताही व्यवसाय करण्यास मुभा असली तरी, कमीत कमी बेसिक शिक्षण घेणे गरजेचे होते.

मुंबईत आल्यावर शंतनूने अडीच वर्षे नोकरी केली. पैसे साचवले. त्या पैशावर त्याचा अभिनयासाठी संघर्ष सुरू होता. सर्वात पहिला टर्निंग पॉइंट म्हणजे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या ‘या सुखानो या’ व ‘वाहिनी साहेब’ या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. ‘या सुखांनो या’ मालिकेतील जयदीप बांदल ही निगेटिव्ह भूमिका खूप गाजली. झी मराठी वाहिनीच्या बेस्ट ॲक्टरचे नामांकन मिळाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. ‘रात्र वणव्याची’ या नीला सत्यनारायण लिखित पुस्तकावर मालिका निघाली. त्याचे लिखाण व दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले होते.

शंतनू मोघेंना पुढच्या टर्निंग पॉइंटविषयी विचारले असता शंतनू म्हणाले की, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका माझी टर्निंग पॉइंट ठरली. डॉ. अमोल कोल्हे यांच्यामुळे मला ही मालिका मिळाली. त्यांच्यासोबत या अगोदर मी ‘रणभूमी’ या चित्रपटात काम केले होते. त्यांच्या ‘बंध मुक्त’ या नाटकात देखील मी काम केले होते. त्यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यमध्ये मी तीन वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तेथील टीमचे क्रिएटिव्ह काम मला खूप आवडलं होतं. माझा ट्रॅक जवळ जवळ १५ ते १६ महिने चालला होता.

शंतनू मोघेने रणभूमी, मिशन पॉसिबल, कॅरी ऑन मराठा, तृषा हे चित्रपट केले; परंतु बॉक्स ऑफिसवर ते हिट ठरले नाहीत. विवेक आपटे लिखित ‘बंध मुक्त’ हे नाटक शंतनूच्या कायम लक्षात राहिले. कारण, या नाटकाचे दोन शेवट होते. एक नैसर्गिक मृत्यू व दुसरा खून. ह्या नाटकात डॉक्टरांवर मीडिया ट्रायल होते. इच्छा मरण यावर हे नाटक आधारित होते. प्रेक्षक तिकिटावर लिहून द्यायचे की, मृत्यू नैसर्गिक आहे की खून आहे. प्रेक्षकांच्या मतानुसार त्या नाटकाचा शेवट केला जायचा. मध्यंतरापर्यंत कलाकारांना माहीत नसायचे की कोणता शेवट होणार आहे.

सध्याचा शंतनूचा टर्निंग पॉइंट म्हणजे तो एका ७० वर्षीय काश्मिरी म्हाताऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत साकारत असलेले नाटक आणि त्या नाटकाचे नाव आहे ‘सफरचंद’ काश्मीर प्रश्नावर असणारे सामाजिक संदेश देणारे हे नाटक आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस देखील ते उतरलेले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अविनाश या दीराची साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. सध्या शंतनू चित्रपटाच्या बाबतीत येणाऱ्या टर्निंग पॉइंटच्या प्रतीक्षेत आहे. एका हिट चित्रपटाच्या शोधात आहे. ‘राव रंभा’ हा आगामी चित्रपट हिट ठरेल का? तो चित्रपट शंतनूचा टर्निंग पॉइंट ठरेल का? हे काळच ठरवेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -