Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसोनियामातेच्या चरणी संजय राऊतांचे लोटांगण!

सोनियामातेच्या चरणी संजय राऊतांचे लोटांगण!

अरुण बेतकेकर

शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे संपादक बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर उद्धव – रश्मी – उद्धव. वृत्तपत्रात अग्रलेख हे असतातच. तसेच अन्य सदर, स्तंभ प्रसिद्ध होत असतात. अग्रलेखाची संपूर्ण जबाबदारी ही संपादकांची असते. त्यातील विषय हा संपादकांचे विचार असे गृहीत धरले जाते. त्याचप्रमाणे अन्य सदर हे कार्यकारी संपादक वा अन्य स्तंभलेखकांचे असतात. सामना या दैनिकातून त्यांचे कार्यकारी संपादक संजय राऊत आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी ‘सच्चाई’ व प्रत्येक रविवारी ‘रोखठोक’ अशा शीर्षकाखाली आपले विचार मांडत असतात. हे स्तंभ ही संपूर्णतः राऊतांची विचारसरणी व त्याची जबाबदेही ही त्यांची स्वतःची. राऊत सामन्यात येण्याआधी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात लिखाण करत. त्यात त्यांचा रोख प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असे. ते शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर जहरी टीका करत. त्यावर पुराव्यासह मी बरेच लिखाण करत राऊतांचा पर्दाफाश केला आहे. सामन्यात रुजू होताच रोखठोक व सच्चाई या माध्यमातून राऊतांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी जहरी मतप्रदर्शन केलेले आहे. राऊत आज जे त्यांच्याविषयी सकारात्मक लिहितात ते अनाकलनीय आणि हेतुपुरस्सर वाटते. नवनिर्मित I.N.D.I.A. आघाडीतील पक्षांची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित केली गेलेली आहे. यजमान म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडे या बैठकीच्या यशस्वितेची जबाबदारी आलेली आहे. लगीनघाई सुरू आहे. या बैठकीस सोनियामाता स्वयं प्रकटणार असल्याने यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनाही त्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत उतावळी झालेली आहे. संजय राऊत तर नाच्याची भूमिका अदा करीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पूर्वी इटालियन बाप्तिस्मा सोनिया असे संबोधत समान्यात लिहिलेल्या विखारी लेखातील काही भाग शब्दशः जशाच्या तसा खाली देत आहे.

सामना, रोखठोक रविवार दि. २३ मे १९९९ स्वदेशीची हाक ! आगे बढोचा नारा !! स्वाभिमान, प्रतिष्ठा-अस्मितेचा लढा ! – संजय राऊत
१) सोनियांना काँग्रेस भावी पंतप्रधान म्हणून पुढे करत असेल तर ते गंभीरच आहे. ८० कोटींच्या देशात या मातीत जन्मलेला एकही नागरिक पंतप्रधान होऊ शकत नाही. ही शरमेची गोष्ट आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेला काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न पवारांनी त्यांच्या पत्रात विचारला. पक्ष हादरविणारा आणि चिरफळ्या करणारा हा प्रश्न आहे. सोनियापुढे लोटांगण घालणाऱ्या काँग्रेसपाशी याचे उत्तर नाही. एक साधा सरळ मुद्दा असा आहे की, सोनियांना राजकीय, सामाजिक जीवनाचा अनुभव तो किती? फक्त १३ महिन्यांचा. फक्त १३ महिन्यांत इटालियन सोनियाला काँग्रेसवाले देशाची सर्वोच्च सूत्रे देण्याची भाषा करतात. त्यांना जोड्याने मारायला हवे.

२) संरक्षण दलातील सामान्य सैनिकालाही काही नियम पाळावे लागतात. लष्करातील खालच्या केडरमधील सनिकांसही परदेशी महिलेशी विवाह करता येत नाही. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने हे नियम काटेकोरपणे पाळले जातात. परदेशी महिलांचा भूलभुलैया संरक्षण दलातील अधिकाऱ्यांवर पडू नये म्हणून गुप्तचरांची सावध नजर भिरभिरत असते. मग परदेशी बायको असलेली व्यक्ती या देशाच्या पंतप्रधानपदी येऊ शकलीच कशी? आता तर ही परदेशी महिला देशाच्या पंतप्रधानपदी बसण्याचे स्वप्न पाहात आहे. सोनियाचा आगापिछा माहित नाही असे आता पक्षाचे नेतेच सांगत आहे.

३) काँग्रेसमध्ये इंदिराजींच्या काळात बरेच बंड झाले. ते त्यांनी मोडून काढले. इंदिराजींची ती ताकद होती. सोनिया म्हणजे इंदिरा नव्हेत. विदेशी सोनियांना देश, समाज, राजकारण आणि मातीचा गंध नाही. राजकारणात प्रवेश करणार नाही, असे सांगत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. सत्तापदाची अभिलाषा नाही, पक्ष बळकट करायचा आहे. असे वातावरण तयार करून त्यांनी पंतप्रधानपदावरच दावा सांगितला. वाजपेयींचे सरकार पाडले, पण स्वतः पंतप्रधान बनू शकल्या नाहीत. या मातीवर सांडलेल्या क्रांतिकारकांच्या रक्तानेच इटालियन सोनियाविरुद्ध बंड केले. सोनिया पंतप्रधानपदावर दावा सांगण्यासाठी एकटीच गेली. पवार, मनमोहन सिंग, संगमाना राष्ट्रपती भवनाच्या पायरीवर ठेवले. तेव्हाच तिरंगा खाली झुकला. धरणी फाटली. विदेशी सोनियासह इटालियन काँग्रेसला तिने पोटात घेतले. हा देश इतका वांझ नाही. काँग्रेसवाले असतील, पण जनता मुर्दाड नाही. राजकीय अस्तित्वासाठी, पण स्वाभिमानाचा झेंडा घेऊन काँग्रेसचे तीन नेते इटालीच्या आक्रमणाविरुद्ध लढायला उभे ठाकले आहे. या तीनही नेत्यांनी आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे. विदेशी पंतप्रधान चालणार नाही, सहन करणार नाही. क्रांतिकारकांचा तो अपमान ठरेल. असा नारा या देशात सर्वप्रथम शिवसेनाप्रमुखांनी दिला. सोनियाविरुद्ध नारा देताच शिवसेनाप्रमुखांवर जहरी टीका करणारे शरद पवारच होते.

४) स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर देशाचे राजकारण विदेशी महिलेभोवती घुटमळत आहे. विदेशी पंतप्रधान नको असे सांगत स्वदेशीचा नारा द्यावा लागतो. याचा अर्थ एकच, काँग्रेस राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य विकून खाल्ले! आता देश इटलीच्या चरणाशी गहाण ठेवायला निघाले आहेत. वाजपेयी सरकार कोसळले तेव्हा सोनियांना पंतप्रधानपदी येण्यापासून रोखणाऱ्या मुलायमसिंह यादवांचे ऋण मान्य करायलाच हवे.

सामना, रोखठोक रविवार दि. ०४ जुलै १९९९ काँग्रेस नेत्यांचा इटालियन बाप्तिस्मा. सोनिया खऱ्या कोण आहेत ? – संजय राऊत

१) ठळक : काँग्रेस पक्षावर ख्रिश्चन लॉबीचा प्रभाव वाढला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ख्रिश्चन लॉबीचा शब्द प्रमाण मानतात. वरिष्ठ नेत्यांना काहीही किंमत देत नाहीत. ओरिसाचे मुख्यमंत्री गिरीधर गोमांग आणि गोव्याचे मुख्यमंत्री फालेरो हे दोघेही ख्रिश्चन असल्यामुळेच मुख्यमंत्री झाले. इटलीचे राज्य काँग्रेस पक्षात आधीच आले असून सोनियांची धर्मांधता ही मुस्लीम धर्मांधतेपेक्षा धोकादायक आहे. हे आता तरी काँग्रेसमधील नेत्यांनी ओळखावे. अन्यथा त्यांना रोममध्ये जाऊन बाप्तिस्मा घ्यावा लागेल.

२) सोनियाची इटालियन काँग्रेस नेस्तनाबूत व्हायलाच पाहिजे याविषयी सगळ्यांचेच एकमत आहे. दिल्लीच्या तख्तावर कधीकाळी मोगलांनी राज्य केले, त्यानंतर ब्रिटिशांनी राज्य केले आणि फक्त पन्नास वर्षे हिंदुस्थानी वंशाने राज्य केल्यावर दिल्लीवर इटलीचे राज्य येणार असेल तर कारगीलची लढाई लढायची कशासाठी, जवानांनी शहीद व्हायचे कशासाठी, याचाही विचार आताच व्हायला हवा.

३) सबकुछ इटली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देशातील प्रश्नांची कोणतीही जाण नाही. त्यांचे सल्लागार जवळ नसताना त्यांना कोणी विचारले की ‘कारगील कोठे आहे?’ त्याचे उत्तर त्या ‘कॅनडात आहे’ असेही देतील. मुळात या मातीशी, भावनांशी त्यांची नाळ कधीच जुळली नाही. काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. वाफ खदखदत आहे. स्फोट होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात आमदारांच्या मोठ्या गटाने बंडाची सुरुवात केली आहे. हा असंतोष जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांनी अत्यंत योजनापूर्वक सुरू केलेली ही मोहीम वाटते. काँग्रेस पक्षावर ख्रिश्चन लॉबीचा प्रभाव वाढला असून भविष्यात देशावरही याच ख्रिश्चन लॉबीचे वर्चस्व वाढेल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच ख्रिश्चन लॉबीचा शब्द प्रमाण मानतात. वरिष्ठ नेत्यांना काहीच किंमत उरलेली नाही. असा प्रचारही सुरू आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री गिरीधर गोमांग आणि गोव्याचे मुख्यमंत्री फालेरो ही त्याच ख्रिश्चन लॉबीच्या वर्चस्वाची फळे असल्याचेही या नेत्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला फायदा होणार नाही. या दोघांपेक्षाही योग्य उमेदवार असतानाही फालेरो, गोमांग यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली ती त्यांच्या ख्रिश्चन धर्मामुळेच.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील सर्वच ख्रिश्चनांना वेचून दिल्लीत आणले व आपल्या भोवती कडे निर्माण केले.

४) प्रियंका गांधींची सासूही इटलीची असल्याचा या मंडळींचा दावा आहे. काय सांगावे असेल सुद्धा. सोनियाविषयी ठामपणे काहीच सांगता येत नाही. त्यांच्याविषयी पूर्ण माहिती कुणालाच नाही. १९८० साली दिल्लीतील एक वजनदार काँग्रेस नेता राजीव गांधींच्या फारच जवळ होता. दोन्ही कुटुंबाचा चांगला घरोबा निर्माण झाला. या नेत्यांच्या मुलाशी प्रियंकाची दोस्ती झाली. दोघे लग्नही करणार होते. सोनिया गांधींच्या कानावर हे जाताच त्यांनी या नेत्याचे पंखच छाटले नाहीत तर काँग्रेसच्या राजकारणातूनच नेस्तनाबूत केले. या नेत्याचे नाव के. सी. पंत. आता ते भारतीय जनता पक्षात आहेत. आपल्या परिवारात कुणी बाहेरची व्यक्ती येऊ नये याची काळजी सोनियांनी सतत घेतली. त्याचमुळे तिने इटलीत जन्मलेल्या आपल्या मैत्रिणीचा मुलगा रॉबर्ट यांच्याशी प्रियंकाचे नाते जुळवले. सतीश शर्माची पत्नीही मूळ इटलीचीच आहे. या दाम्पत्याचा मुलगा प्रियंकापेक्षा खूपच लहान असल्यामुळे सोनियाची पंचायत झाली. पण मुरादाबादच्या या व्यापाऱ्याने इटालियन युवतीशी लग्न केले होते. इटलीत सोनिया गांधींचा जन्म ज्या शहरात झाला त्याच शहरातील ही युवती असल्याने सोनियास मातृभूमीच्या उकळ्या फुटल्या. रॉबर्ट ख्रिश्चन. त्यात त्याची आई इटालियन. त्यांचे आडनाव वाड्र की वढेरा तेही कळत नाही. वाड्र हे नाव इटालियन आहे. सोनीयाचे जावई स्वतःला फक्त रॉबर्ट म्हणवून घेण्यातच धन्यता मानतात. इटलीचे राज्य काँग्रेस पक्षात आधीच आले आहे.

५) इटलीचे रक्त : काँग्रेस पक्षाचे ख्रिस्तीकरण पूर्ण होत आले आहे. जे ख्रिश्चन नाहीत किंवा ज्यांनी ख्रिश्चन बायकांशी लग्न केलेले नाही त्यांच्यावर सोनियाची कुऱ्हाड चालणार. ही धर्मांधता असून मुसलमानी धर्मांधतेपेक्षा गंभीर आहे. हिंदुस्तानातील ख्रिश्चन धर्मवेडे होते, पण धर्मांध कधीच नव्हते. धर्माचे राजकारण त्यांनी कधीच केले नाही. सोनियांनी ख्रिश्चनांच्या मनातील धर्म जागा केला. त्यामुळेच मुस्लिमांबरोबरच ख्रिश्चन धर्मांधतेचा धोका या देशात निर्माण झाला आहे. सोनियाच्या भोवती आज कोण आहेत? काँग्रेस पक्ष आज कोण चालवीत आहेत? ऑस्कर फर्नांडिस, पी. जे. कुरियन, अजित जोगी, ए. के. अँटोनी, फालेरो, गोमांक, मार्गारेट अल्वा, व्हिन्सेंट, जॉर्ज हे सोनीयाचे सल्लागार. त्यात राम प्रधान आणि सलमान खुर्शीदही आहेत. कारण या दोघांच्या पत्नी रोमन कॅथलिक आहेत. खुर्शीद यांची पत्नी लुईस फर्नांडिस आणि सचिव जॉन ख्रिश्चन असल्यामुळेच त्यांना उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे प्रमुख केले. विश्वजित सिंह आणि जगदीश टाइटलरच्या बाबतीतही तेच. जे नोकरशहा अधून मधून सल्ला देत असतात ते देखील ख्रिश्चन. काँग्रेसच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष शाहिद सिद्दिकी यांची पत्नी हिंदू असल्यामुळेच त्यांना पदावरून हटवण्यात आले. ओरिसात ख्रिश्चन मिशनऱ्याची हत्या होताच जे. बी. पटनाईक यांना मुख्यमंत्री पदावरून बडतर्फ केले, पण केरळातील काँग्रेस नेते पी. जे. कुरियन यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कार झालेल्या मुलीनेही कुरियन यांना ओळखले. तेच कुरियन पक्षात त्यांच्या पदावर कायम. पुन्हा त्यांच्यावर महाराष्ट्राचा भारही सोपवून बढती दिली. पटनाईक हे ख्रिश्चन असते तर त्यांनाही कुरियन यांच्याप्रमाणेच अभय मिळाले असते. काँग्रेस खऱ्या अर्थाने इटालियन नॅशनल काँग्रेस होत आहे. सोनिया इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा कधीच होऊ शकणार नाही. त्यांचे मन इटलीतच रुळले आहे. तीस वर्षे येथे राहूनही त्यांनी नाईलाजाने पंधरा वर्षे हिंदुस्तानचे नागरिकत्व घेतले. प्रियंकाचा नवरा आवर्जून रॉबर्ट सारखा ख्रिश्चन निवडला आणि आता पुत्र राहुलही एका अर्जेंटियन ख्रिस्ती तरुणीशी लग्न करणार आहे.

६) देशात कारगीलची लढाई सुरू आहे. जवान सीमेवर कुर्बानी देत आहेत आणि सोनियाचे दिवटे पुत्र श्रीमान राहुल आपल्या ख्रिस्ती प्रेयसीबरोबर लंडनच्या वर्ल्डकपमध्ये मौजमस्तीत रमले होते. इटलीचे रक्त त्यांच्या धमन्यात वाहते. हिंदुस्तानातील लढाईने त्यांना जोश येणार नाही. त्यांची मनगटे चेतविणार नाहीत. आमच्या सैनिकांच्या बलिदानाने त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावणार नाहीत. ही माती त्यांची नाही. हा धर्म त्यांचा नाही. सोनिया गांधी व त्यांच्या कुटुंबीयांचे राजकारण ख्रिश्चनांचे आहे. ते यशस्वी होऊ नये. जनता सुज्ञ आहे. उरल्या-सुरल्या काँग्रेस नेत्यांनी बाप्तिस्मा घेऊन आल्याशिवाय सोनियाची कृपा त्यांच्यावर होणार नाही. सोनिया कोण हे जनतेसमोर आधीच प्रखरपणे मांडायला हवे.

सामना, रोखठोक रविवार दि. ०९ जानेवारी २०११ देश सोनियामुक्त होवो! – संजय राऊत
१) ठळक : बोफोर्स तोफांच्या सौद्यात क्वात्रोचीला १५०० कोटींची दलाली मिळाली हे आता सिद्ध झाले आहे. सोनिया गांधींचा हा भाऊ. पैसे घेतले व इटालीत पळाला. हिंदुस्तानच्या सीबीआयने व कायदा खात्याने त्याला ‘क्लीनचिट’ दिली. हा देशद्रोहच आहे. सोनिया गांधी यांच्यासाठीच हे सर्व घडले. देश भ्रष्टाचारमुक्त कसा होणार ? त्यासाठी आधी तो सोनियामुक्त करा.

२) सोनिया गांधी यांच्या आदेशाने आज देश चालतो. त्या सोनिया गांधी यांच्या राजकीय घसरगुंडीची सुरुवात झाली आहे. काँग्रेसवाल्यांना जर लाज असेल तर वर्किंग कमिटीत एक ठराव करून ते ‘गॉड मदर’ सोनियास घरी पाठवतील
व काँग्रेसची उरलेली लाज वाचवतील.
बोफोर्स तोफांच्या सौद्यात इटलीचा उद्योगपती ऑटोव्हीवो क्वात्रोची आणि विन छ्ड्डा यांना १५०० कोटी रुपयांची दलाली मिळाली होती हे आता उघड झाले आहे. हिंदुस्तानच्या आयकर विभागानेच हा खुलासा केल्यावर काँग्रेसवाले कोणत्या तोंडाने भ्रष्टाचार विरोधात बोंब मारणार? क्वात्रोची हा सोनिया गांधींचा भाऊ आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफार्स तोफांचा वादग्रस्त सौदा झाला. याच बोफार्स तोफांच्या गडगडाटामुळे देशात राजकीय भूकंप आला. राजीव गांधी यांना सत्ता गमवावी लागली. त्याच बोफर्स तोफात सोनिया गांधी व त्यांच्या इटालियन कुटुंबाचा हात नसल्याचे वारंवार सांगण्यात आले. ते सर्व खोटे ठरले. क्वात्रोचीला कोट्यवधी रुपये मिळाले. ते पैसे घेऊन तो पसार झाला. क्वात्रोचीला हिंदुस्तानात अटकाव करता आला असता. त्यास आधी सीबीआयने क्लीनचिट दिली व हिंदुस्थानातून पळून जाण्यास मदत केली. हे सर्व सोनिया गांधींच्या हस्तक्षेपाने शक्य झाले हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

३) देशाची लूट : सोनिया गांधी व त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने देशाची कशी लूट केली याचे बोफर्स तोफांचा सौदा हे ज्वलंत उदाहरण आहे. बोफर्स प्रकरणात दरोडा पडूनही क्वात्रोची याला निर्दोष ठरवून देशातून पळवून लावले. ही देशाशी गद्दारी आहे. विश्वासघात आहे. एका विदेशी वंशाच्या व्यक्तीसाठी देशाचे प्रशासन व सीबीआय राबते व काँग्रेसचे कौरव त्यास अनुमोदन देतात. क्वात्रोची यास सीबीआयने क्लीनचिट दिली. संसदेत यावर हंगामा झाला. ‘सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे. सरकारचा या विषयाशी काही संबंध नाही.’ सीबीआयने जाणीवपूर्वक चुकीचा तपास केला तेव्हा सीबीआयच्या तेव्हाच्या संचालकावर आता खटले दाखल करणार काय? हाच प्रश्न आहे.

४) स्विस बँकेत पैसे : बोफर्स तोफांच्या भ्रष्टाचारामुळे विरोधकांनी ४२ दिवस संसदेचे अधिवेशन तेव्हा बंद पाडले. त्यावर आजही टीका सुरू आहे. या ४२ दिवसांपेक्षा क्वात्रोचीचा १५०० कोटींचा दरोडा लहान वाटतो काय? आधी ब्रिटिशांनी लुटले, आता इटलीवाले लुटत आहेत व काँग्रेसवाले म्हणतात, काहीच घडले नसताना विरोधक उगाच बोंब मारतात. स्वीडिश रेडिओने बोफर्स कंपनीने लाच दिल्याच्या आरोपाचा वारंवार पुनरुच्चार केला. बोफर्स कंपनीने एकूण तीन हप्त्यांत दलालीचे पैसे दिले. स्विस बँकेतील चार खात्यांत ते टाकले. नोव्हेंबर १९८६ मध्ये तीन हप्ते दिले गेले. चौथा हप्ता डिसेंबरमध्ये दिला गेला. ही चार खाती कोणाची? हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. त्यातले एक खाते क्वात्रोचीचे व त्याने कुणाच्या वतीने पैसे स्वीकारले ह्याचा खुलासा खुद्द सोनिया गांधी यांनीच करायला हवा.

५) कोणी वाचविले? : प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री असल्यामुळेच आयकर खात्याच्या माध्यमातून क्वात्रोचींचे बोफोर्स पाप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले व सोनिया गांधींचा बुरखा फाटला. स्पेक्ट्रम घोटाळ्यात सोनियांच्या दोन बहिणींची नावे समोर आली आहेत आणि आता बोफोर्सचे प्रकरण क्वात्रोची महाशयांसह सोनिया गांधींच्या मानेवर बसवले आहे.

६) शाब्बास प्रणवबाबू ! : काँग्रेस पक्षाचे पुरते वस्त्रहरण यात झाले. सोनिया गांधी व त्यांच्या इटलीतील परिवार हा देश आणखी किती लुबाडणार? हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. बोफोर्स प्रकरणात सगळेच खोटे बोलले. ज्यांनी क्वात्रोचीला सोडले, पळून जाण्यास मदत केली त्यांच्यावर देशद्रोहाचे खटलेच आता दाखल करा. हा देश सोनिया गांधीमुक्त होवो, त्यातच सगळ्यांचे भले आहे. तेच भ्रष्टाचाराविरुद्धचे खरे रणशिंग आहे.

पहिले प्रेम आणि पहिली विचारसरणी ही अजरामर असते. मग संजय राऊत यांचा सोनिया यांच्याबाबतच्या विचारसरणीत परिवर्तन होण्याचे कारण काय ? राऊतांच्या उक्ती अन् कृतीत कधीच ताळमेळ नसतो. त्यांची मते तकलादू, अस्थिर, विचल असतात. एका मताशी ते कधीच ठाम राहिलेले नाहीत. मग ते बाळासाहेब ठाकरे असतील, सानिया गांधी असतील वा शरद पवार. आज राऊतांसाठी सोनिया गांधी या भारतमाता ठरल्यात. अशी दुहेरी भूमिका अत्यंत सहजतेने ते स्वीकारतात, मांडतात. जसे की स्वयं भारतमाता त्यांना प्रसन्न झाल्या. म्हणाल्या, अरे वेड्या कुठे माझ्या चरणी नतमस्तक होतोस खरीभारतमाता तर दहा जनपथ येथे सोनियारूपात विराजमान आहेत. जा तेथे, अन् त्यांच्या पायी लोटांगण घे, शरण घे. आणि त्याचे तंतोतंत अनुकरण राऊत करीत आहे असे भासते.

एक मूर्ख काँग्रेसी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतो अन् सर्व काँग्रेसी हे प्रमाण मानतात, अनुकरण करतात, वक्तव्येही तशीच करू लागतात. अशांसाठी सोनिया गांधीबाबतचे राऊतांनी मांडलेले वरील विचार वाचून शांत राहणे शोभेल का ? माजी – आजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह गुडघ्याला बाशिंग बांधलेले नाना पाटोळे यांचे याबाबत काय मत आहे? दिल्लीतील आपल्या शीर्षस्थ नेतृत्वांची थुंकी झेलण्याची यांच्यात स्पर्धा असते. त्यांच्यासाठी हाच मार्ग प्रगतीचा. जर यापैकी कोणी वा या सर्वांनी मिळून संजय राऊतांना टिळक भवनात पाचारण करत शंभर हाणावेत आणि एक मोजावे हेच उचित ठरेल. संजय राऊत हे भस्मासुर आहेत. यांची संगत कराल तर राख रांगोळी अटळ. आपल्यासमोर त्यांनी केलेली शिवसेनेची अवस्था उदाहरणादाखल आहेच. आम्हीही राऊतांना आवाहन करतो, आपण राजारामपुत्र संजय राऊत असाल तर आपल्या सोनिया गांधीबाबतच्या वरील लिखाणावर खुलासा करून सत्य काय, आधीचे लिखाण की आताचे मतपरिवर्तन हे स्पष्ट करावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -