Friday, May 10, 2024
Homeक्रीडाIPL 2024मुंबईचा रॉयल विजय

मुंबईचा रॉयल विजय

राजस्थानवर ६ विकेट राखून बाजी

मुंबई (वृत्तसंस्था) : कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव यांचा झंझावात आणि निर्णायक षटकांत टीम डेव्हीडच्या वादळी खेळीने अटीतटीच्या सामन्यात मुंबईने तगड्या राजस्थानला अस्मान दाखवले. मुंबईच्या फलंदाजीचा तडाखा इतका प्रखर होता की राजस्थानने उभारलेला २१३ धावांचा डोंगर टीम डेव्हीडने होल्डरला षटकारांची हॅटट्रीक लगावत सर केला. टीम मुंबईने विजय मिळवून कर्णधार रोहितला वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट दिले. विशेष म्हणजे आयपीएलचा हा १०००वा सामना होता. राजस्थानच्या पराभवामुळे यशस्वी जयस्वालची शतकी खेळी व्यर्थ गेली.

राजस्थानने दिलेल्या मोठ्या लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीला आलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दबावाचा शिकार ठरला. अवघ्या ३ धावा करून बर्थडे बॉय रोहितने निराश केले. त्यामुळे मोठ्या अपेक्षा असलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. इशन किशन आणि कॅमेरॉन ग्रीन या जोडीने मैदानात तळ ठोकला. दोघांनीही धावांची बरसात करत मुंबईला अपेक्षित सुरुवात करून दिली. ही सेट झालेली जोडी अनुभवी रविचंद्रन अश्विनने फोडली आणि या दोन्ही फलंदाजांना त्यानेच माघारी धाडले. किशनने २८, तर ग्रीनने ४४ धावा जोडल्या. यंदाच्या हंगामात निराश केलेल्या सूर्यकुमारचे देखणे दर्शन त्याच्या चाहत्यांना रविवारी झाले. सूर्याने ८ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत ५५ धावा तडकावल्या. सूर्याने मुंबईला विजयाच्या वाटेवर आणून ठेवले. त्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हीडने अप्रतिम फलंदाजी करत विजय खेचून आणला. रोमहर्षक सामन्यात मुंबईने ६ विकेट आणि ३ चेंडू राखून विजय मिळवला. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकांत पहिल्या तिन्ही चेंडूंवर चेसन होल्डरला षटकार लगावत सामना आपल्या बाजूने वळवला. डेव्हीडने नाबाद ४५, तर तिलकने नाबाद २९ धावा करत विजयी खेळी खेळली. मुंबईने १९.३ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. राजस्थानच्या रविचंद्रन अश्विनने दमदार गोलंदाजी केली.

यशस्वी जयस्वालच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात २१२ धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वालने ६२ चेंडूंत १२४ धावांची स्वप्नवत खेळी केली. पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वालने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि व्यंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जयस्वालने यंदाच्या हंगामात शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने ८ खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय १६ चौकारही मारले आहेत. यशस्वी वगळता राजस्थानचा एकही फलंदाज २० पेक्षा अधिक धावा करून शकला नाही. तरीही राजस्थानने २१२ धावांचा डोंगर उभारला. मुंबईच्या गोलंदाजांनी २५ अतिरिक्त धावा दिल्या. पीयुष चावला मुंबईकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३४ धावा देत २ बळी मिळवले. अर्शद खानने ३ विकेट मिळवले असले तरी तो धावा देण्यात महागडा ठरला. जोफ्रा आर्चरने ४ षटकांत ३५ धावा देत एक विकेट मिळवली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -