Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedSanjay Raut scam : महाराष्ट्रात एक हजार कोटींचा वाईन स्कॅम!

Sanjay Raut scam : महाराष्ट्रात एक हजार कोटींचा वाईन स्कॅम!

पुराव्यानिशी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवर खळबळजनक आरोप

मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अनेक आरोप आहेत. पत्राचाळ प्रकरण, डॉ. स्वप्ना पाटकर प्रकरण, कोविड काळातील खिचडी घोटाळा अशा घोटाळ्यांमध्ये संजय राऊतांचं नाव आलेलं असतानाच आता भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊतांवर आणखी एक खळबळजनक आरोप लगावला आहे. संजय राऊतांनी महाराष्ट्रात एक हजार कोटींचा वाईन स्कॅम (Wine scam) केला आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. सोबतच त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर या वाईन स्कॅमशी संबंधित पुरावेही जोडले आहेत. या पुराव्यांमध्ये संजय राऊतांची मुलगी पूर्वशी संजय राऊत यांचंही नाव आहे.

संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वीच पत्रा चाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर, ईडीकडून त्यांना अटकही करण्यात आली. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबासोबत केल्याने भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन महाराष्ट्रात १ हजार कोटींचा वाईन स्कॅम झाल्याचा आरोप संजय राऊतांवर केला आहे.

दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून दिल्ली मद्य धोरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी, ईडीने यापूर्वीच दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यामुळे, एकीकडे दिल्ली मद्य धोरण देशभरात गाजत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र वाईन धोरण राबवून १००० कोटींचा स्कॅम करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय राऊत यांची कन्या वाईन कंपनीच्या संचालकपदी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

१६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांची मुलगी वाइन किंग अशोक गर्ग मॅग्पी DFS Pvt Ltd या कंपनीच्या संचालक झाल्या. तर, २६ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील वाइन धोरणात सुधारणा करून वाइनला मद्यविरहित मानून आणि किरकोळ दुकाने, सुपर मार्केटमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली होती. हा तब्बल १००० कोटींचा वाईन घोटाळा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील काही कागदपत्रेही शेअर केली आहेत. त्यामध्ये, राऊत यांची कन्या पूर्वशी संजय राऊत यांचं नाव आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना किरीट सोमय्या यांनी केलेल्या या आरोपामुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊत यावर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -