Thursday, May 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकोणतेच वाचन निरर्थक नसते

कोणतेच वाचन निरर्थक नसते

माधवी घारपुरे

वाचनाने माणसाची भाग्यरेषा बदलते, हे विधान मी वाचलं आणि खऱ्या अर्थांने बुचकळ्यात पडले. वाचनाचा आणि विधिलिखित बदलण्याचा संबंधच काय? दिवसभर हे वाक्य माझा पिच्छा सोडत नव्हते. अशा वेळी उपयोगाला आले ते आपुले जुने-पुराणे वाक्य. ‘वाचाल तर वाचाल.’ भाषणात, निबंधात वापरून वापरून रया गेलेले सुवचन म्हणा हवंतर, पण खरंय! वाचन जितके अधिक, तितके चिंतन अधिक. मनन अधिक आणि व्यक्तीपासून ‘माणूस’ घडण्याची प्रक्रिया अधिक. उत्तम लेखक, उत्तम वक्ता दोन्ही उत्तम वाचनात आहे.

काहीही वाचा, कुठेही वाचा, कसेही वाचा, पण वाचा. केतकर १ भजं खाऊन १६ पानं वाचायचे. पु. भा. भावे पांघरुणात पुस्तक घेऊन वाचायचे, तर सिंधुताई सपकाळ वाण्याचे कागद बिळात कोंबून ठेवून नंतर वाचायच्या. अर्थात नुसती पृष्ठांची संख्या वाढवणे हे वाचन नाही. लोक सांगतात, आम्ही तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेवही वाचला. गीतेची टीकाही वाचली, पण चिंतन झाले का? आचरणात काही आले का?

त्यावर विचार न करता वाचणे म्हणजे अन्न न चावता गिळणे, म्हटलं तर चूक नाही. चिंतन, मनन किंवा reading between the lines हे महत्त्वाचे. त्या अर्थी काहीही वाचावे. पुष्कळांना आपण English पुस्तके वाचतो, याचा गर्व असतो. मराठीतल्या कहाण्यांचे सुद्धा पुस्तक वाचावे, मात्र विचार करावा.
शांताबाई शेळक्यांचे उदाहरण आवर्जून द्यावेसे वाटते. एका बड्या विद्वान प्राध्यापकाशी गप्पा मारत होत्या. प्राध्यापकांनी विचारले, ‘सध्या काय वाचताय?’
‘आवर्जून सांगावे, असं काही
नाही’ – शांताबाई
‘काहीतरी वाचणारच’! वाचनाशिवाय माणसाच्या जगण्याला अर्थच नाही. माणसाला समृद्ध करणारा छंदच आहे तो. शांताबाई एकाच वेळी ४/५ पुस्तके आलटून पालटून वाचीत. शिवलीलामृत असेल, नाहीतर कहाण्या असतील, नाहीतर बिरबल तर कधी अंगाया खिस्ती. मला अगाथा आवडते. सुंदर व्यक्तिचित्रण करते.

प्राध्यापक म्हणाले, ‘अॅगाया म्हणजे Timekiling. शनिमहात्म्य कहाण्या झाल्या जुन्यापुराण्या. मी तुम्हाला ४/५ इंग्रजी पुस्तकं पाठवून देतो. ती वाचा. प्राध्यापक थोर नक्कीच होते. पण आपल्या वाचनाला निरर्थक, बिरबलाला हसू येणारे म्हटलेले त्यांना आवडले नाही. राग आला. अर्थात निरर्थक म्हटल्यामुळे माझा (शांताबाईचा) अपमान नाही झाला तर वाङ्मयाचा झाला. वाढत्या वयाबरोबर साहित्य वेगळ्या अर्थाने समजू लागते. अनुभवाच्या चटक्यांनी आपण वाढत जातो. आकलनशक्ती वाढते.

शुक्रवारच्या एक कहाणीची गोष्ट. लक्ष्मी विष्णूचे पाय चेपत असते. तिचे हात विष्णूला खरखरीत लागतात. लक्ष्मीला वाईट वाटते आणि हात मऊ करायला काय करू? असं विचारले. विष्णू सांगतात, ‘पृथ्वीवर जा, वेष पालट आणि एका गरीब महिलेचे बाळंतपण करून ये. हात मऊ होतील.’ लक्ष्मीने तसे केले आणि हात मऊ झाले ती साठा उत्तराची कहाणी… संपूर्ण. आता या वयाला आपल्याला प्रतीकात्मक समजतो. लक्ष्मी ही संपत्तीची देवता. दीनदुबळ्यांच्या कामी जोवर ती येत नाही, तोवर कठोरच राहणार. कणवेने वापरली तर मुदूता येईल. हे चिंतन, हा अर्थ हळूहळू आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो.

शनिमहात्म्य घ्या. विक्रम राजाच्या मागे शनी लागतो. भिंतीवरील चित्राचा हंस जिवंत होतो. खुंटीवरचा मोत्याचा हार खाऊन टाकतो. राजावर चोरीचा आळ येतो. पुढं त्याची दशा संपल्यावर सारं काही गोड होते, तर आपण शनिमहात्म्य संकट दूर होईल म्हणून वाचायचे नाही, तर लक्षात ठेवायचे की, कुठलेही संकट, कशाही प्रकारे, अकारणही आपल्या समोर येऊन उभे राहते. आपल्या वाट्याला येणारी दु:खे भीषण आणि अतर्क्यदेखील असतात, हे त्याने जाणवून दिले. त्यावर आपल्याला मात करायची आहे.

नरसिंहाने हिरण्यकश्यपूला नखांनी पोट फाडून मारलेली कथा आपण वाचतो. प्रत्यक्षात असे घडले असेल का? प्रत्येक immposible गोष्टीत possibility असते, हा विचार आपण का नाही करत? हिरण्यकश्यपू म्हणाला, ‘मला मरण दिवसा नको, रात्री नको, माणूस नको, पशू नको, शस्त्र नको, अस्त्र नको, मग त्या सगळ्यांवर नरसिंहाचा उपाय निघाला, हे महत्त्वाचे.
सगळ्यांचा मथितार्थ काय तर ‘कोणतेच वाचन हे कधीच निरर्थक नसते. वाचनाने आपली आकलनशक्ती प्रौढ बनते. घटनेला प्रतिकात्मकता येते.’ इतकेच म्हणेन –

जैसे लोहाचे होय सुवर्ण, तैसे मानवाचे मनोमन.
करिता उत्तम वाचन ‘पुस्तक’ होय.
जैसे ज्ञान रंजनाचे साधन, तैसे आहे वाचन.
करी मनाचे कांचन, वाचन एक.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -