Wednesday, May 8, 2024
Homeअध्यात्मनिर्गुण निराकार

निर्गुण निराकार

  •  सद्गुरू वामनराव पै

ज्ञानेवर महाराज सांगतात, “अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथूनी चराचर त्यासी भजे.” चर व अचर, सगुण निर्गुण जेथून उदयाला येते. त्याला परमेश्वर म्हणतात. त्याच्या ठिकाणी काय आहे. या प्रश्नापेक्षा त्याच्या ठिकाणी काय नाही, असा विचार केला की, हे उमजते की, सर्व जे आहे ते तिथूनच येते आणि सर्व जे आहे ते तिथेच जाते. तो एका बाजूने सगुण आहे, तर दुसऱ्या बाजूने निर्गुण आहे. तो दोन्ही आहे. निर्गुण जो आहे त्याचे वर्णन आपण समजतो त्यापेक्षा वेगळे आहे. तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, अदृश्य आहे असे आपण म्हणतो त्याचा खरा अर्थ काय? परमेश्वर अव्यक्त आहे, याचा अर्थ असा जे व्यक्त आहे. ते जिथून आलेले आहे, त्याला अव्यक्त म्हणतात. परमेश्वर अदृश्य आहे, याचा अर्थ असा जे दृश्य आहे, ते जिथून आलेले आहे त्याला अदृश्य म्हणतात. जगात जे आकार आहेत ते असंख्य अगणित आहेत.

ते जिथून आले त्याला निराकार म्हणतात, तर सर्व गुण, अवगुण व चांगले गुण जिथून आले ते निर्गुण. तो सर्वव्यापी आहे. परमेश्वराचे वर्णन आपण किती करू शकतो. तो जसा आहे तसा त्याचे वर्णन कुणालाच करता येणार नाही. माणसाचे ज्ञान हे किती मर्यादित आहे व परमेश्वराचे दिव्यज्ञान किती अमर्याद आहे त्याचा आपल्याला पत्ताच नाही. आपल्या ठिकाणी जे ज्ञान नांदते ते समुद्रावरील वाळूच्या एका कणाइतके असते. ही गोष्ट ध्यानात घेऊनच जीवनविद्येने परमेश्वराचे वर्णन करताना Divine Consciousness, Divine Intuition असे शब्द वापरले. यालाच डॉ. मर्फींनी Infinite Intelligence and Boundless Wisdom असे शब्द वापरले. मी जे वर्णन केले ते दिव्य जाणीव व दिव्य नेणीव असे केले आहे. म्हणजेच Divine Consciousness, Divine Intuition आहे त्याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही, तरीही आपण परमेश्वराबद्दल जेवढे उथळपणे बोलता येईल तेवढे बोलत असतो. आपण त्याचे अक्षरश: खेळणे बनवून टाकले आहे. परमेश्वर आहे कुठे? परमेश्वर आहे कशावरून? अरे तुला तो माहीत नाही म्हणून तो नाही असे होते का? काही माणसे अशी असतात की त्यांना बजेट म्हणजे काय हे माहीत नसते, तरी बजेट आले की त्यावर खूप बोलतात. माझ्याकडे एक माणूस आला होता. तो म्हणाला काय ते बजेट केलेले आहे? हा मॅट्रिकला चार वेळा नापास झालेला व बजेटवर बोलतो याला काय म्हणायचे? तसे परमेश्वर हा विषय लोकांनी इतका उथळ करून टाकलेला आहे की कुणीही उठावे व त्यावर बोलावे. जीवनविद्या सांगते हा विषय उथळ नाही, तर परमेश्वर हा विषय इतका महत्त्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे की तो आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे. सर्वस्व! त्याच्याशिवाय आपण एक पाऊलही टाकू शकत नाही. त्याच्याशिवाय आपण एक क्षणभरही जगू शकत नाही. त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही, असा हा परमेश्वर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -