Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीनैसर्गिक आपत्तीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका

नैसर्गिक आपत्तीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका

विदर्भ, मराठवाड्यात सलग तिसर्‍या दिवशी गारपीट, अवकाळी पावसामुळे जीवितहानी

छत्रपती संभाजीनगर : सलग तिसर्‍या दिवशी गारपीट व अवकाळी पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचे नुकसान, विजेच्या तारा पडून जीवितहानी झाली आहे.

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्घटना घडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात मालटेकडी परिसरातील कामठा येथे वीज पडून शेख वजीर शेख चांद या ४५ वर्षीय तर जवाहरनगर तुप्पा येथे हिमाचलचे रहिवासी तारासिंग बाबूराम या ४० वर्षीय व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने व्यंकटी लक्ष्मण दंडलवार या युवकाचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. टीनपत्रावरील दगड अंगावर पडल्याने सोनुबाई नंदू पवार या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वीज पडून गणेश जहाने या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली.

सांगोला येथे वावटळीमुळे लाकडी काठ्यांना बांधलेला कापडी पाळणा उडाला व त्यात ठेवलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दगडावर आपटून मृत्यू झाला. जळगावात वावटळीमुळे उभा कंटेनर कलंडून अभियंत्यासह दोन मजूर ठार झाले. गुरुवारी कंटेनरमधून लोखंडी पत्रे काढत असताना वावटळ सुरु झाली. त्यात पत्री शेड, पाच ते सहा दुचाकीही उडून गेल्या. याच वेळी भोला व चंद्रकांत हे दोन मजूर कंटेनरच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. वावटळीत हा कंटेनर कलंडून दोघांच्या अंगावर कोसळून दोघेही जागीच गतप्राण झाले.

अशा दुर्घटना घडत असतानाच हवामान खात्याने पुढील आणखी काही दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -