Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणअश्रूधूर नव्हे आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

अश्रूधूर नव्हे आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

राजापूर : बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र अश्रूधूर नव्हे तर आंदोलकांनी वणवा लावल्याचे व तो वणवा पोलिसांनी विझवल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसे फूटेज विविध वृत्तवाहिन्यांनी टीपल्याचेही सामंत यांनी सांगितले.

बारसू प्रकल्पाच्या जमिनीचं सध्या माती सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण रोखण्यासाठी बारसू आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांना सर्वेक्षण स्थळी जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. माध्यमांशी बोलताना अनेक आंदोलकांनी याबद्दल माहिती दिली.

याठिकाणी माती सर्वेक्षण केले जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. यावेळी महिलांना मारहाण झाल्याचा दावा काही आंदोलकांनी केला आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. मारले, डोके फोडले तरी आम्ही पुढे जाणार. सात-आठ बायकांना पोलिसांनी मारल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले.

मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यालयातून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आंदोलकांनीच गवताला आग लावल्याचा दावा केला. सामंत म्हणाले, “अश्रूधुराच्या नळकांड्या कुठेही फोडण्यात आलेल्या नाहीत. आंदोलकांनी गवताला जी आग लावली, तो वणवा विझवताना तो धूर आलेला आहे. अशा वेड्यावाकड्या बातम्या बाहेर जात आहेत. काहीतरी गैरसमज आहे. तिथे वणवा लावण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता. ते विझवायचा पोलीस प्रयत्न करत होते, त्यातून आलेला तो धूर आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -