Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकोकणवासीयांचे दादा...

कोकणवासीयांचे दादा…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराने चिपळूणपासून ते दोडामार्गपर्यंत सारा मतदारसंघ भाजपामय झाला आहे. ज्या नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने कोकणात शिवसेना घराघरांत पोहोचवली, त्याच नारायण राणेंच्या झंझावाती प्रचाराने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अस्ताकडे वाटचाल करीत आहे. ज्या राणेंनी मोठ्या परिश्रमातून कोकण हा शिवसेनेचा भक्कम गड बनवला होता, आता त्याच राणेंकडून उबाठा सेनेवर आचके खाण्याची पाळी आली आहे. सुरेश प्रभू, विनायक राऊत असे शिवसेनेचे खासदार धनुष्यबाण या चिन्हावर लोकसभेत निवडून जात होते, यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने उबाठा सेनेला मशाल चिन्ह दिले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला होता, हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे लढायला उत्सुक होते. पण शेवटच्या क्षणाला नारायण राणे यांची भाजपाने उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीतील स्पर्धा संपुष्टात आली. उदय सामंत (रत्नागिरी) व दीपक केसरकर (सावंतवाडी) शिवसेनेच्या दोन्ही मंत्र्यांनी मोदी-शहांचा निर्णय मान्य केल्याचे जाहीर केले व नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केला. अबकी बार ४०० पार व फिर एक बार मोदी सरकार हा संकल्प साध्य करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील विजय महत्त्वाचा आहे, हे प्रत्येक प्रचार सभेत राणे, सामंत व केसरकर सांगत आहेत.

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे स्वत: उभे राहिल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ व्हीव्हीआयपी बनला आहे. उबाठा सेनेची येथे आता अस्तित्वासाठी लढत चालू आहे. कोकण हा अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. कोकणी मतदारांची बांधिलकी शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेशी होती. पण ही नाळ गेल्या दोन-तीन वर्षांत तुटली. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची शकले उडाली. या मतदारसंघातून भाजपाने कधी खाते उघडले नव्हते. राणेंच्या उमेदवारीने भाजपाच्या खात्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ जमा होणार आणि ‘अब की बार फिर मोदी सरकार’ या संकल्पात कोकणवासीयांचा मोठा वाटा असणार आहे.

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे पूर्वी याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते, नंतर मात्र दोन वेळा अविभाजित शिवसेनेच्या उमेदवाराला मतदारांनी खासदार म्हणून पाठवले. लोकांनी मॅट्रिक नापास असलेला माणूस दोन वेळा खासदार निवडला, हे पाहून हसू येते, असे उद्गार नारायण राणे यांनी काढले. निलेश यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले, नंतर इकडे येऊन ते एमकॉम झाले. निलेश यांचा जनसंपर्क अफाट व दांडगा आहे. पराभव झाला म्हणून ते खचले नाहीत. कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्याचे काम त्यांचे अव्याहत चालू आहे.

नारायण राणेंच्या प्रचारात आखणी आणि मतदार संपर्क यासाठी निलेश व नितेश या दोन्ही बंधूंनी अचूक नियोजन केले आहे. स्वत: सौ. निलम वहिनींनी महिलांचे अनेक मेळावे घेऊन भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. सारा राणे परिवार भाजपा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नारायण राणे यांना विक्रमी मताधिक्य मिळावे म्हणून अहोरात्र झटत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांचे कार्यकर्तेही मनापासून प्रचारात उतरले आहेत. महायुतीची एकी, नारायण राणेंचे वलय, मोदी-शहांचा भक्कम पाठिंबा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची फौज यापुढे विरोधी पक्षाला अक्षरश: हात-पाय मारावे लागत आहेत.

नारायण राणेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजपूरला आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही प्रचारसभा ठरलेल्या आहेत. भाजपाच्या ताकदवान झंझावती प्रचारापुढे उबाठा सेनेचा निभाव लागणार तरी कसा? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने नारायण राणेंच्या विरोधात जे सुडाचे राजकारण केले ते महाराष्ट्रातील जनतेला मुळीच आवडले नव्हते. नाशिक व पुण्याहून पोलीस फौजफाटा पाठवून एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचे कारस्थान कसे रचले गेले, हे उभ्या महाराष्ट्राने टीव्हीच्या पडद्यावरून पाहिले आहे. राणे यांचे मुंबईतील घर पाडण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारच्या काळात झाला.

राणे व त्यांचे कुटुंबीय मुंबईत घरी नसताना, उबाठा सेनेच्या सग्या-सोयऱ्यांनी त्यांच्या घरासमोर जमाव आणून कशी हुल्लडबाजी केली होती याचाही महाराष्ट्राला विसर पडलेला नाही. कोकणातील लक्षावधी जनता नारायण राणे या व्यक्तीवर मनापासून प्रेम करते. घराघरांत त्यांच्याविषयी, आपले दादा, अशी भावना आहे. ठाकरे सरकारच्या काळात दादांवर राजकीय सूड उगविण्याचे काम झाले, त्याचा बदला यंदाच्या निवडणुकीत घेण्याचे कोकणातील मतदारांनीच ठरवले आहे. म्हणूनच अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आपण निवडून येऊ, असा विश्वास नारायण राणेसाहेब बोलून दाखवत आहेत.

ठाकरेंचा पक्ष टायटॅनिकप्रमाणे बुडेल, त्यांच्यासोबतचे मोजके आमदारही लोकसभा निवडणुकीनंतर निघून जातील, गोदामे रिकामी होतील, असे भाकीत राणे यांनी वर्तवले आहे. त्याच दिशेने उबाठा सेनेची वाटचाल चालू असलेली दिसत आहे. आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर सिंधुदुर्गमधून परतीचा मार्ग कुठून जातो ते आम्ही दाखवू, असा इशारा राणे यांनी दिला आहे, त्यातून पुढे संघर्ष होणार की उबाठा सेनेचे नेते घाबरून चूपचाप बसणार हे लवकरच समजेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, पैकी चार मतदारसंघांतील आमदार राणे यांना अनुकूल आहेत. उबाठा सेनेमधील अनेक कार्यकर्ते नारायण राणे यांच्या प्रेमापोटी त्यांचे काम करीत आहेत. मोदी यांच्या शनिवारी झालेल्या कोल्हापूरमधील विराट सभेने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे.

नारायण राणे यांचे राजकारण प्रामुख्याने हे मातोश्री व उद्धव ठाकरे यांच्याभोवती फिरत असते, ठाकरेंनी मोदी-शहा-फडणवीस किंवा भाजपावर टीका केली की स्वत: राणे अथवा नितेश राणे हे मातोश्रीवर तत्काळ तुटून पडतात. भाजपावरील टीकाटिप्पणीला तातडीने जशास तसे उत्तर राणे परिवाराकडून दिले जाते. यामुळे भाजपाचा मतदार व पक्षाचे कार्यकर्ते सुखावतात. त्यांच्या मनातील संताप-चीड राणे बोलून दाखवतात, हे सर्वसामान्य लोकांना आवडते. त्यामुळे राणे यांचा चाहता वर्ग नेहमीच वाढत असताना दिसतो. स्वत: नारायण राणे हे त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

खरे तर त्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती. पण मोदींना पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करायची आहे व विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी भाजपाला पुन्हा केंद्रात सत्तेवर आणायचे आहे म्हणून मोदी-शहा यांच्या सांगण्यावरून राणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आजवर कोकणात भाजपाचा फारसा शिरकाव नव्हता. भाजपाचा विस्तार हे तर दिवास्वप्न होते. पण नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत पक्षाला मोठी ताकद प्राप्त झाली. जे काही करायचे ते भाजपासाठीच, या जिद्दीने राणे परिवाराने वाहून घेतले आहे. राणे यांच्या विजयानंतर या मतदारसंघातून भाजपाचा प्रथमच खासदार लोकसभेवर निवडून जाणार आहे.

गेली पाच दशके नारायण राणे यांनी कोकणचे राजकारण ढवळून काढले आहे. राणेंशिवाय कोकणात राजकारण होऊ शकत नाही. राणे भाजपामध्ये येईपर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पक्षाकडे राणेंसारखा तगडा नेता नव्हता. नारायण राणे यांचे मुंबईतही नेटवर्क मोठे आहे. ‘प्रहार’ वृत्तपत्रासह या परिवाराने सुरू केलेले अनेक उद्योग, व्यवसाय यशस्वीपणे चालले आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी चेंबूरमध्ये शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, केंद्रात मंत्री असा त्यांचा लक्षणीय प्रवास आहे.

शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक अशी त्यांची मूळची ओळख आहे. भाजपाने त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला दावा मागे घेतला. नारायण राणे यांचे नाव, लोकप्रियता, ताकद, क्षमता, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फौज, कामाचे वाटप व प्रचाराचे नियोजन, कोकणवासीयांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होणारे नेतृत्व, गरजूंना मदतीचा सदैव मदतीचा हात देणारा नेता आणि सर्वात म्हणजे भाजपा हायकमांडचा त्यांचा असलेला भक्कम पाठिंबा, या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. म्हणूनच कोकणवासीयांचे, एकच दादा, ही त्यांची ओळख आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -