Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : मोदींची जादू, काँग्रेसची वाताहत

अग्रलेख : मोदींची जादू, काँग्रेसची वाताहत

गुजरात म्हणजेच नरेंद्र मोदी हे गेली दोन दशके समीकरण बनले आहे. गेली सत्तावीस वर्षे गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस सतत आदळ-आपट करीत होती. मोदींच्या गुजरातमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही सर्वस्व पणाला लावले. पण राज्यातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावरच आपला विश्वास आहे, हे निकालाने सिद्ध केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे मोदींनी मिळविलेल्या यशाचा महाविक्रम आहेच. पण भाजपला या राज्यात सलग सातव्यांदा सत्ता मिळवून देण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे. गुजरातमधील भाजपच्या अफाट विजयाचे श्रेय केवळ मोदींच्या नेतृत्वालाच आहे.

गुजरात, हिमाचल प्रदेश व दिल्ली महापालिका यांच्या निवडणुका पाठोपाठ झाल्या. दिल्ली महापालिकेमध्ये आपची सत्ता आली. पण गेली पंधरा वर्षे तेथे सत्तेवर असलेल्या भाजपने शंभरपेक्षा जास्त जागा जिंकून आपलाही आश्चर्याचा धक्का दिला. हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजप यांना आलटून-पालटून सत्ता मिळते, असा आजवरचा अनुभव आहे. हिमाचलमध्येही भाजपने आपली ताकद मजबूत आहे, हे निकालातून दाखवून दिले. कोणत्याही परिस्थितीत भाजपला गुजरातमधून सत्तेवरून हटवायचे, असा चंग काँग्रेस व आपने यावेळी बांधला होता. पण मोदींचा करिष्मा हा त्या दोन्ही पक्षांना भारी पडला. गुजरातमधील जनतेचा विश्वास राहुल गांधी किंवा अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावरच आहे. हे या निकालाने दाखवून दिले.

एका राज्यात सलग सहा वेळा म्हणजे २७ वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपला यावेळी अँटी इन्कमबन्सीचा फटका बसेल, असे काँग्रेस व आपने गृहित धरले होते. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही बाहेरचे नेते आहेत. या दोन्ही पक्षांना गुजरातमध्ये कोणी स्थानिक नेता नाही किंवा गेल्या १० वर्षांत काँग्रेस किंवा आपने या राज्यात नवे नेतृत्व निर्माण केले नाही. उलट मोदी-शहा हे दिल्लीत असले, तरी त्यांचे बारीक लक्ष गुजरातवर असते. आपल्या गृहराज्यात काय घडते आहे, याची बारीक-सारीक माहिती त्यांना असते. राज्यात त्यांनी स्थानिक नेतृत्वाची फळी व कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण केली आहे. पक्ष संघटना बांधणीवर भाजपचा नेहमीच कटाक्ष असतो. त्याचा लाभ या निवडणुकीत भाजपला मिळाला. गुजरात विधानसभेच्या निवडणुका उशिरा जाहीर केल्या म्हणून विरोधकांनी थयथयाट करून बघितला. गेल्या चार निवडणुकींत भाजपचे संख्याबळ सतत कसे कमी-कमी झाले याच्या आकडेवारीवर भर दिला. भाजपचे यावेळी नव्वदही आमदार निवडून येणार नाहीत, अशी भविष्यवाणी केली. केजरीवाल यांनी, तर भाजपचा पराभव होणार, पाहिजे तर आता लिहून घ्या, अशी भाषा वापरली होती.

काँग्रेसने गुजरात विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतलीच नाही. राहुल गांधी यांनी स्वत:ला भारत जोडो यात्रेत गुंतवून घेतल्याने त्यांनी गुजरातकडे दुर्लक्ष केले. जाता जाता केवळ एक सभा घेऊन त्यांनी प्रचारात हजेरी लावली. स्वत: राहुलच रस घेत नाहीत, म्हटल्यावर पक्षाचे अन्य नेतेही गुजरात निवडणुकीपासून दूर राहिले. त्यातच प्रदेशाध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मोदींना त्यांची औकात दाखवतो, अशी धमकी दिली, तर काँग्रेसचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर मोदींवर रावण म्हणून टीका केली. सोनिया गांधींपासून ते खर्गेंपर्यंत अनेक नेत्यांनी मोदींवर असभ्य शब्दांत ज्या ज्या वेळी टीका केली, त्या त्या वेळी काँग्रेसला त्याची किंमत मोजावी लागली हा इतिहास आहे. या निवडणुकीतही नेमके तेच घडले. गेल्या विधानसभेत ८० आमदार निवडून आणणाऱ्या काँग्रेस पक्षाची यावेळी १६-१७ आमदार निवडून आणताना दमछाक झाली. मोदी व शहा यांनी केलेले परिश्रम आणि गेल्या अडीच दशकांत राज्याच्या विकासासाठी वापरलेले गुजरात मॉडेल यामुळेच जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे ९९ आमदार निवडून आले होते. तेव्हा काँग्रेसने भाजपला शंभरी गाठण्यापासून रोखले म्हणून मोठा गवगवा केला होता. यावेळी भाजपचे दीडशेपेक्षा जास्त आमदार निवडून आले. १९८५ मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे १४९ आमदार निवडून आले होते, तो विक्रम भाजपने मोडला व नवा विक्रम निर्माण केला. मग यावेळी भाजपला रोखायला काँग्रेसला कोणी अडवले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा काँग्रेसला गुजरात किंवा दिल्लीच्या निवडणुकीत काहीच उपयोग झालेला नाही.

भाजपला अँटीइन्कबन्सीचा फटका बसण्याऐवजी प्रो इन्कमबन्सीचा लाभ झाला हे वास्तव आहे. चांगले काम करून भाजपने जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. पंतप्रधानांनी गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार केला म्हणून काँग्रेसने टीका केली. त्यांनी देशाचे काम बघावे, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ते कशाला जातात? असाही प्रश्न विचारला. पण मोदी, शहा हे प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात. शतप्रतिशत म्हणजे पंचायतीपासून ते संसदेपर्यंत भाजपच ही पक्षाची घोषणा आहे. पक्ष नेतृत्व गांभीर्याने व जिद्दीने निवडणूक लढवत असेल, तर पक्षाची केडरही तेवढ्याच उत्साहाने व निष्ठेने निवडणुकीत काम करते. हे फक्त केवळ भाजपमध्येच दिसून येते. म्हणूनच भाजपला गुजरातमध्ये धुवांधार यश मिळाले. गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या महाविक्रमी यशामुळे काँग्रेसला तर भूकंपाचा धक्का बसावा, असा दणका मिळाला आहे. गुजरातच्या निकालानंतर भाजप विरोधकांनी एकत्र येऊन २०२४ ची तयारी करा, अशी सांगण्याची पाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -