राजापूर (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री निनादेवी कबड्डी संघ कणेरी आयोजित ७०वी रत्नागिरी जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धा (Kabaddi Tournament) प्रथमच राजापूर येथील राजीव गांधी क्रीडांगणावर १० व ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेची जय्यत तयारी हाती घेण्यात आली असून राजापुरात प्रथमच कबड्डीचा जागर होताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतून रत्नागिरी जिल्ह्याचा महिला आणि पुरुष असे दोन संघ निवडण्यात येणार असून हे संघ राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातून ३२ संघ आणि ५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती श्री निनादेवी कबड्डी संघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन पाडावे यांनी दिली.
राजापूर तालुक्यात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, उदयोन्मुख खेळाडुंना कबड्डीबद्दल प्रेम निर्माण व्हावे व त्यातून खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने प्रथमच राजापूर तालुक्यात या निवड चाचणीचा घाट घालण्यात आला आहे. या स्पर्धेत साखळी पद्धतीने सामने खेळविले जाणार आहे, तर बाद फेरीतून अंतिम २० खेळाडूंचा चमू शिबीरासाठी पात्र ठरविला जाणार आहे. त्यातून १२ खेळाडूंची निवड जिल्हा संघासाठी केली जाणार आहे. हा संघ २७ डिसेंबर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळविला जाणार आहे.
शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगणावर ही निवड चाचणी होत आहे. सहभागी संघ आणि खेळाडू आणि स्पर्धेचा कालावधी विचार करता एकाच वेळी चार मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. ही खुल्या गटाची निवड चाचणी असल्याने पुरुष ८५ किलो ग्रॅम, तर महिला ७५ किलोग्रॅम वजनी गटात होणार आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ शनिवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राजीव गांधी क्रीडांगणावर होणार आहे. या दरम्यान जवाहरचौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते राजीव गांधी क्रीडांगण अशी जनजागृती रॅली काढली जाणार आहे, तर स्पर्धेदरम्यान समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेला पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आदी उपस्थित असणार आहेत.