Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीधुळ्यात पर्जन्यमापक यंत्राच्या अभावामुळे पाऊस नोंदणीत अडथळे

धुळ्यात पर्जन्यमापक यंत्राच्या अभावामुळे पाऊस नोंदणीत अडथळे

१६८ गावांसाठी केवळ १२ पर्जन्यमापक यंत्र,‘गाव तेथे पर्जन्यमापक’ बसवण्याची मागणी

धुळे (प्रतिनिधी) : शेतीपिकांच्या तसेच घराच्या पडझडीच्या नुकसान भरपाईसाठी पर्जन्यमापकावर होणारी पावसाची मोजणी महत्वपूर्ण ठरते. परंतू धुळे तालुक्यातील तब्बल १६८ महसुली गावांचे पर्जन्यमान मोजण्यासाठी केवळ १२ रेन गेज यंत्र कार्यान्वित आहेत. सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहता, एका चौकात पाऊस पडतो तर दुसरा चौक कोरडा राहतो. अशा परिस्थितीत पूर्ण महसुल मंडळातील १० ते १५ गावांचे पर्जन्यमान मोजमाप एका ठिकाणाहून करणे हे शेतकरी वर्गावर अन्याय करणारे आहे. या पार्श्वभूमीवर गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब रावण भदाणे यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना प्रत्यक्ष भेटून भदाणे यांनी चर्चा केली. यावेळी जि. प. सदस्य किरण पाटील व प्रभाकर पाटील हे उपस्थित होते. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा व अतिरिक्त मार्गदर्शन मिळावे यासाठी पर्जन्यमानाच्या नोंदी महत्वाच्या ठरतात. तालुक्यातील एकुण १७० गावांपैकी २ उजाड गावे सोडली तर उर्वरीत १६८ महसुली गावांसाठी केवळ १२ रेन गेज केंद्र असल्याने नुकसान भरपाई मिळण्यास मोठी अडचण येते. सद्य:स्थितीत तालुक्यात पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मंडळनिहाय पाऊस मोजला जात असल्याने त्या-त्या भागातील पावसाची अचूक आणि इत्यंभूत नोंदणी होतेच असे नाही. परंतु, किमान ग्रामपंचायत क्षेत्रात ही यंत्रे बसविली तर तेथील दैनंदिन पावसाच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार आहे.

मंडळनिहाय पडलेल्या पावसाच्या नोंदींवरून तालुक्यातील पावसाची सरासरी काढली जाते. तसेच ४ तालुक्यांमध्ये किती पाऊस पडला यावरून जिल्ह्यातील एकूण आणि सरासरी पावसाची नोंद घेतली जाते. परंतु, अनेकदा मंडळातील एखाद्या गावात भरपूर पाऊस पडतो. तर एखाद्या गावात पावसाचा थेंबही पडलेला नसतो. किंवा काहीवेळा संबंधित गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक राहाते. अशा परिस्थितीत पर्जन्यमानाची अचूक नोंदही होत नाही. प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाची मोजणी व अचूक नोंद व्हावी, यासाठी गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र होणे गरजेचे आहे.

पर्जन्यमानाचा अचूक अंदाज येऊन यामुळे शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबतचे मार्गदर्शन तसेच विविध योजनांचा योग्य लाभ मिळवून देणेही शक्य होणार आहे. एखाद्या गावात मुसळधार पाऊस होऊन घरांची पडझड तसेच शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले, तरी केवळ गावात पर्जन्यमापक केंद्र नाही म्हणुन शेतकरी वर्ग भरपाईला मुकतो. कारण सबंधीत गावात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊनही, फक्त मंडळाच्या गावाला कमी पाऊस झाल्यामुळे ही मदत नाकारली जाते. तर या सर्व पार्श्वभूमीवर गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी बोरकुंडचे प्रथम लोकनियूक्त सरपंच बाळासाहेब रावण भदाणे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारींना प्रत्यक्ष भेटून भदाणे यांनी चर्चा केली. यावेळी जि.प.सदस्य किरण पाटील व प्रभाकर पाटील तसेच पं.सं.सदस्य देवेंद्र माळी, बाबाजी देसले आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -