Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखइंडिया आघाडीचा पोपट घायाळ

इंडिया आघाडीचा पोपट घायाळ

पंतप्रधान मोदी यांना येत्या लोकसभा निवडणुकीत हटवायचेच, या निर्धाराने एकत्र आलेल्या काँग्रेस आघाडीचा पोपट ज्या पद्धतीने घायाळ झाला आहे, त्या पद्धतीमुळे भाजपा विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी त्या आघाडीत सामील झाल्याने महाराष्ट्रातील उबाठा गट, पवार-सुळे गट वगैरेंना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता मोदी सरकार गेलेच, अशा थाटात माजी मुख्यमंत्र्यांच्या वल्गना सुरू होत्या, पण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व म्हणजे ४२ जागांवर उमेदवार उभे करून काँग्रेसप्रणीत आघाडी निकालात निघाली आहे, याचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसला आता कपाळावर हात मारण्यापलीकडे काही करायचे शिल्लक उरलेले नाही. ममता यांना तर मोदी विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून समोर आणायचे प्रयत्न सुरू होते, पण त्या प्रयत्नांबरोबरच उबाठा गटाचे मनातली मांडे आणि पवार-सुळे गटाचे पुन्हा आपली ताकद प्राप्त करण्याचे मनसुबे सारेच ममतांच्या एकाच निर्णयाने धुळीस मिळाले आहेत. याच ममता यांनी मुंबई भेटीवर आल्या असताना यूपीएमध्ये काँग्रेस आहेच कुठे? असा सवाल करून आपण काँग्रेसला मोजत नाही, याची ग्वाही दिली होती. काँग्रेसची दयनीय दशा झाली आहे आणि राजकारणात असे चढ-उतार येतच असतात, असे सांत्वन काँग्रेस करून घेईलही.

ममता यांनी जो काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांना हादरा दिला आहे, त्यातून आता आघाडी सावरणे अवघड आहे. ममता यांची राज्यात ताकद मोठी आहे आणि त्यांनी स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. तसा चमत्कार एकदाही पवार किंवा उबाठा गटाला करता आलेला नाही. ममता यांनी स्वतःच पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर येण्याची तयारी केली होती आणि त्यांची तशी ताकदही आहे. अर्थात त्या मोदी यांच्या लोकप्रियतेत पासंगालाही पुरू शकत नाहीत, पण त्यांचा आत्मविश्वास दांडगा आहे. पण आता त्यांनी काँग्रेस आघाडीला मात्र जो सुरूंग लावला आहे त्याचा आवाज कित्येक वर्षे गर्जत राहील. काँग्रेसची अवस्था आता इतकी बिकट झाली आहे की, एकेकाळी ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून ज्या पक्षाला ओळखले जात होते, त्या पक्षाला छोटे पक्षही मोजत नाहीत, अशी स्थिती आहे. काँग्रेसपासून सारे पक्ष दुरावले का जात आहेत, त्याचे आत्मपरीक्षण काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केले पाहिजे, कारण काँग्रेस ही आजही सरंजामी मानसिकतेतून बाहेर आलेली नाही. अजूनही काँग्रेसला आघाडीचे नेतृत्व हवे आहे आणि ते कुणी देण्यास तयार नाही. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेस आघाडीला आतून सुरूंग लावणाऱ्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत काय निकाल लागणार, ते स्पष्ट दिसत आहे.

ममता यांनी असा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, त्यामागे गणित आहे. गेल्या वेळी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी अशीच आघाडी करून काँग्रेसला जास्त जागा सोडल्या होत्या आणि त्याचा भलताच पश्चात्ताप त्यांना नंतर झाला. काँग्रेसचा त्या निवडणुकीत सफाया झाला आणि त्यामुळे इतर विरोधी पक्षांचाही झाला. हे उदाहरण समोर असल्याने ममता काही त्याची पुनरावृत्ती करायला मूर्ख नाहीत. त्यांना आपल्या पक्षाचे भवितव्य कशात आहे, ते चांगले समजते. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीतील मुख्य पक्षच स्वतंत्र लढवणार असल्याने उबाठाच्या माजी मुख्यमंत्र्यांची मात्र घोर निराशा झाली आहे. इंडिया आघाडीच्या जोरावर आपण मोदी यांना शह देऊ शकू, अशा मूर्ख समजुतीत ते इतके दिवस होते. पण आता इंडिया आघाडीला ममतांचा रट्टा बसल्याने माजी मुख्यमंत्र्यांचा केवळ भ्रमनिरास झाला नाही, तर त्यांना आता या निवडणुकीत आपले काय होणार, याची पुरेपूर कल्पना आली आहे. त्यांच्या पक्षाला एकामागोमाग एक दणके बसत आहेत आणि रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश हा अखेरचा दणका ठरू शकतो. पण राष्ट्रीय राजकारणातही त्यांना ममता यांच्याकडून जोरदार दणका बसला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांबरोबर पवार-सुळे गटाच्या प्रमुखांनाही जोरदार दणका बसला आहे. नितीश कुमार हे आघाडीचे समन्वयक स्वतःच भाजपाच्या गोटात गेल्याने पहिल्या प्रथम या पोपटाची मान आवळली गेली. आता ममता यांनी त्याला घायाळ केले आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडे मोदी यांच्याविरोधात लढण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. काँग्रेसला ममता यांनी जोरदार धक्का देतानाच मोदी यांच्याविरोधात एकास एक लढती होण्याची शक्यताही संपुष्टात आणली आहे. काँग्रेसच्या बाजूने मिळणारी भाजपाविरोधी मते आता विभागली जातील आणि त्यामुळे काँग्रेसच्या जागा आपोआपच कमी होतील. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या बाजूने मिळणाऱ्या मतांमध्ये कसलीही फूट पडणार नसल्याचे दिसत आहे. मोदी यांची लोकप्रियता, विविध योजनांच्या माध्यमातून लोकांना मिळणारे सहाय्य आणि भाजपाची स्वच्छ प्रतिमा याचा लाभ भाजपाला होणारच आहे. माजी मुख्यमंत्री हे आता ममता यांच्याविरोधात ईडी चौकशीचे कारण देण्याचे नेहमीचे तुणतुणेही वाजवू शकणार नाहीत, कारण ममता यांच्याविरोधात एकही प्रकरण ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात नाही.

ममता यांच्या या दणक्याने लोकसभा निवडणुकीतील सारी गणिते बदलणार आहेत. आता लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी तर एकसंध नाही आणि त्याचा लाभ भाजपा आणि एनडीएला होणार आहे. दुसरीकडे कर्नाटकात देवेगौडा यांचा पक्ष तसेच तेलुगू देसम हेही भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसशी समझोता म्हणजे आपली राजकीय आत्महत्या असे समीकरण दृढ झाले आहे. एकूण काय तर इंडिया आघाडीचे दिवस आता भरत आले आहेत. त्यामुळे पोपट घायाळ झाला आहे, हे ठासून सांगण्याची वेळ आता आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -