Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीरक्तदाबावरील महत्त्वाचं संशोधन

रक्तदाबावरील महत्त्वाचं संशोधन

मधुरा कुलकर्णी

वृद्धावस्थेत नेहमी जाणवणारी समस्या म्हणजे विस्मरण. या समस्येवर मात करण्यासाठी किंवा ती अटोक्यात ठेवण्यासाठी तरुणपणापासूनच प्रयत्न करता येतात. विस्मरण किंवा स्मृतिभ्रंशावर मात करण्यासाठी आपल्या शरीरातला रक्तदाब नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतो. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी पुढे आणलेल्या संशोधनानुसार उच्च रक्तदाबाचा स्मरणशक्तीवरही परिणाम होत असतो. अगदी तरुणपणी म्हणजे वयाच्या ३० ते ४०व्या वर्षादरम्यान रक्तदाबाची पातळी जास्त असेल, तर स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक वाढतो. थोडक्यात, रक्तदाब रोखल्यास स्मृतिभ्रंश टाळता येऊ शकेल, असा विश्वास संशोधकांना वाटतो.

शरीरातला वाढता रक्तदाब आणि स्मरणशक्ती कमी होण्यामध्ये काही संगती आहे का? हे तपासण्यासाठी ब्रिटनमधल्या अडीच लाखांहून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आलं. सहभागी झालेल्यांचं वय ३५ ते ४४ वर्षांच्या दरम्यान होतं. हे सर्वजण उच्च रक्तदाबाचे रुग्ण होते. एमआरआय अहवालात आढळलं की, यापैकी ६१ टक्के लोकांना भविष्यात म्हणजे वृद्धत्व आल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका आहे. उच्च रक्तदाबाला सामोरं जाताना या लोकांचा मेंदू आकुंचन पावत असून त्याचा आकार कमी होत असल्याचं संशोधकांना आढळलं.

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने २०१९ मध्ये एक सविस्तर अभ्यास केला. या अभ्यासात आढळलं की, इंग्लंडमधल्या ३० ते ४० वयोगटातल्या चाळीस लाखांहून अधिक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. संशोधक म्हणतात की, उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची आणि स्ट्रोकची प्रकरणं वाढण्याची शक्यता अधिक असते. यामुळे उच्च रक्तदाबाला संशोधक ‘सायलेंट किलर’ या नावाने ओळखतात. जगातल्या लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा रक्तदाब नेमका कशामुळे होतो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अभ्यासकांच्या मतानुसार, जीवनातले वाढते ताणतणाव, संसर्ग, औषधं आणि पाण्याची कमतरता यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होते. उच्च रक्तदाब किंवा रक्तदाबाची खालची पातळी असे दोन प्रकार असून विशेष चिंतेची बाब म्हणजे रक्तदाबाचं गांभीर्य माहीत नसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या परिस्थितीमुळे जगातले लाखो लोकं मृत्यू बरोबर घेऊन जगत असतात. रक्तदाबाचं गांभीर्य माहिती नसलेल्या लाखो लोकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं आणि या आजारांतच त्यांचा नंतर मृत्यू होतो.

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत केलेल्या एका अभ्यासानुसार, सध्या जगभरात १५० दशलक्ष लोकं उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. २०१९ मध्ये हृदयरोगामुळे १.७९ कोटी लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंपैकी एक तृतियांश मृत्यूंना उच्च रक्तदाब जबाबदार ठरला. उच्च रक्तदाब असणाऱ्यांना मुळात जडलेली व्याधीच उमगत नसल्यामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यातच याची लक्षणं दिसत नसल्यामुळे रुग्णांमध्ये अकस्मात येणाऱ्या हृदयविकारासारख्या घटना घडतात. रक्तदाब प्रामुख्याने चार कारणांमुळे वाढतो, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे धूम्रपान. धूम्रपानामुळे शरीरात जाणारं निकोटीन शरीरातल्या धमन्यांच्या भिंती संकुचित करून त्या कडक करतात. या व्यतिरिक्त निकोटीन रक्त गोठण्यास देखील कारणीभूत ठरते. एखाद्या व्यक्तीने धूम्रपान केल्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य होण्यास २० मिनिटं लागतात. यामुळे चांगल्या आरोग्यासाठी धूम्रपान टाळणं केव्हाही चांगलं.

आपल्या शरीराच्या वाढत्या वजनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या तीव्र होत असते. याबाबत मेयो क्लिनिकने एक अभ्यास केला. या अभ्यासात त्यांना आढळलं की, जास्त वजन असलेल्या व्यक्तीने एक किलो वजन कमी केलं तर रक्तदाब एक मिमी एचजी (अंदाजे एक बिंदू) कमी होतो. एवढंच नव्हे, तर रक्तदाबाचा संबंध कंबरेशीही आहे. पुरुषांची कंबर ४० इंचांपेक्षा जास्त आणि महिलांची कंबर ३५ इंचांपेक्षा जास्त असल्यास त्यांना रक्तदाबाचा धोका जास्त असतो. मिठाचं शरीरातलं प्रमाण हा घटकही रक्तदाबाबाबत अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आहारशास्त्रानुसार, तरुणवयीन लोकांनी दिवसाच्या आहारात पाच ग्रॅमपेक्षा कमी मिठाचा वापर करावा. एक चमचा मिठामधून आपल्या शरीरात साधारण २,३०० मिलीग्राम सोडियम प्रवेश करत असतं. अन्नातल्या सोडियमचं प्रमाण आपण जेवढं कमी करू, त्या प्रमाणात आपल्याला ५ ते ६ गुणांनी रक्तदाब कमी करता येईल. रोज ३० मिनिटं न चुकता व्यायाम करणं हाही एक महत्त्वाचा उपाय आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, दिवसातून ३० मिनिटं चालत असाल, तर तुमचा रक्तदाब पाच ते आठ गुणांनी कमी होतो. त्यातही न सलग चालल्यास फायदा होतो. अन्यथा रक्तदाब पुन्हा वाढू शकतो. विस्मरणाचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला शरीराच्या हालचाली वाढवाव्या लागतील. चालण्याबरोबर जॉगिंग, सायकलिंग आणि नृत्य यांमुळेही रक्तदाब कमी होतो. दररोज उड्या मारल्या तर शरीराच्या हालचाली होण्याबरोबर रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमता वाढते. व्यायाम हा औषधापेक्षा कमी नसल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. काही काळापूर्वी इंग्लंडमधील साऊथ वेल्स विद्यापीठातले संशोधक प्रा. डेमियन एम. बेली यांनी एक संशोधन केलं होतं. त्या अभ्यासात ते म्हणतात की, उड्या मारण्याच्या व्यायामामुळे अल्झायमरचा (स्मरणशक्ती कमी होणे) धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. या व्यायामामुळे मेंदूची काम करण्याची क्षमता वाढते.

दररोज कमीतकमी तीन ते पाच मिनिटांसाठी उड्या मारणं आवश्यक आहे. उड्या मारण्याचं प्रमाण एकदम वाढवू नये. हळूहळू वाढ करत गेल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा एक महत्त्वाचा भाग आहे. एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हा भाग जबाबदार असतो. जस जसं आपलं वय वाढतं, तस तसं ते आकुंचन पावतं. त्यातून होणारा रक्त प्रवाह कमी होत जातो. उड्या मारल्याने हिप्पोकॅम्पस भागातल्या रक्ताभिसरणाचं प्रमाण वाढतं. रक्ताभिसरण वाढल्याने स्मरणशक्ती समृद्ध होते. उड्या मारल्याने शरीराला आणखीही काही फायदे होतात. किनेटिक्समध्ये प्रकाशित संशोधनानुसार पाठीचा कणा आणि शरीराची स्थिती सुधारण्यासाठी उड्या मारण्याचा व्यायाम प्रभावी ठरतो.

हा व्यायाम शरीराच्या वरच्या भागाला तसंच पायांना मजबूत करतो. उड्या मारल्याने हाडांची घनता वाढते. एका संशोधनानुसार, ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त महिलांना हा व्यायाम १२ आठवडे करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या हाडांची घनता २.९ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी उड्या मारणं हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे पाय तसंच संपूर्ण शरीराचे स्नायू मजबूत होतात. व्यायामादरम्यान टेस्टोस्टेरॉन हार्मोन सोडला जातो, जो शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतो. उड्या मारण्याच्या व्यायामाने पाय, कंबर, पोट, नितंब आदी भागातली चरबी कमी होते आणि त्यांना सुडौल आकार प्राप्त होतो. आपण दररोज उड्या मारल्यास, ६०० कॅलरीज कमी करू शकतो. मात्र, प्रारंभी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उड्या माराव्यात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -