Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीहिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य सांगा

हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य सांगा

इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावे बदलता

मनसे नेते अखिल चित्रे यांचे दीपाली सय्यद यांना खुले आव्हान

मुंबई : “तुम्हाला काय उत्तर द्यायचे? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावे बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल” अशा शब्दांत मनसे नेते अखिल चित्रे य़ांनी दीपाली सय्यद यांना जाहीर आव्हान दिले आहे.

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केल्यानंतर आता मनसेने दीपाली सय्यद यांना खुले आव्हान दिले आहे. “पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले” असे ट्विट दीपाली यांनी केले आहे. यानंतर आता मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. “अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचे नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही” असे म्हणत मनसे नेते अखिल चित्रे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केले आहे. तसेच “तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा” असे ही अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.

“अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचे नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दीपाली सय्यद. २०१९ ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दीपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चे नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावे लागेल. तुम्ही इतरांना नावे ठेवता?” असे अखिल चित्रे यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -