शब्दब्रह्म महावृक्षाच्या छायेत

मधु मंगेश कर्णिक ही अष्टाक्षरे गेली पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ कथा, कविता, कादंबरी, ललितलेखन, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र, चरित्र, नाटक, बालसाहित्य अशा वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांत ताकदीने व विलक्षण अनुभूतीने वावरत आहेत.

विशेष – लता गुठे

एप्रिल, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शतायुषी व्हा मधुभाई…

माझं २०११ला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच वेळी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा परिचय झाला. मी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे सभासद झाले आणि गेली १३ वर्षे त्या साहित्य प्रवाहात मी अशी काही रमले की, ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ मला माझं दुसरं कुटुंबच वाटू लागलं. याच भूमिकेतून मी साहित्य पालखीची भोई झाले. या दुसऱ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आम्हा सर्वांवर मुलांसारखं प्रेम करणारे ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे सर्वेसर्वा. आमचे मधुभाई.

‘पद्मश्री’ या बहुमानाच्या पदवीने त्यांच्या कार्याच्या उंचीचा तर अंदाज येतोच; परंतु ही उंची गाठण्यासाठी त्यांना किती काटेरी पायवाटा तुडवाव्या लागल्या असतील, याचा अंदाज येण्यासाठी एकदा त्यांची मुलाखत घेतली.त्याआधी अनेकदा त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्या-त्या वेळेला त्यांच्याशी झालेला सुसंवाद. प्रत्येक भेटीमध्ये कळत-नकळत त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मधुभाई हे ज्येष्ठ समकालीन साहित्यिक आहेत, असं मी म्हणते. कारण मधुभाई शाळेत असताना, त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि आता नव्वदी पार केल्यानंतरही ते लिहीतच आहेत.

नुकतेच त्यांची ‘प्राप्तकाल’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. तीन पिढ्या त्यांची पुस्तकं वाचत आहेत. मधुभाई हे सुप्रसिद्ध साहित्यिक तर आहेतच, त्याबरोबर ते थोर विचारवंत, आदर्श समाजसेवक आणि माणसातलं माणूसपण जाणणारे देवमाणूस आहेत. आमच्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून, मनापासून कौतुक करणारे मधुभाई जेव्हा केव्हा भेटतात, त्या प्रत्येक भेटीत त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा पाहून मन सुखावतं आणि परमेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर जे समाधान लाभतं, ते मधुभाईंना पाहिल्यानंतर मिळतं. हा फक्त माझाच अनुभव नसून, भाईंच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाचाच अनुभव आहे.

एक दिवस मधुभाईंच्या घरी त्यांना भेटायला गेले, तेव्हा ते निवांतपणे बोलत होते, मी सहजच विचारलं, “भाई, तुमचं बालपण कुठं आणि कसं गेलं?” बालपणीच्या अनेक आठवणी सांगताना, त्यांचा चेहरा कधी उजळत होता, तर कधी उदास होत होता. शब्दांच्या बरोबर मी मधुभाईंच्या कोवळ्या बालपणाच्या पायवाटेने घटना, प्रसंग अनुभवत मागे मागे जाऊ लागले. भाई म्हणाले, “घरचं आठराविश्व दारिद्र्य. लहानपणीच मी चार वर्षांचा असताना वडील गेले. मोठ्या चार‌ बहिणी. आईच्या मायेच्या छत्रछायेखाली माझं बालपण निराधार पोरकं आणि उनाड होतं. उनाडक्या करायचो. गणपती बनवायला, शिकारीला जायला आवडायचं. पण शाळा, अभ्यास आवडतं नसे‌. आई रामायण-महाभारतातील गोष्टी सांगायची आणि मी त्या कान देऊन ऐकायचो. रोज नवीन गोष्ट ऐकायला आवडत असे म्हणून आई स्वतःच गोष्ट तयार करून सांगत असे. याचा परिणाम त्या बालमनावर खोलवर झाला. कदाचित माझ्या कथेची बीजं तिथेच रुजली असावीत, असं मला वाटतं.”

एकदा त्यांच्या शाळेमध्ये साने गुरुजी आले. त्यांच्या ‘श्यामच्या आई’ने मधुभाईंच्या मनावर गारूड केले आणि साने गुरुजींना पाहिल्याची आठवण मधुभाईंनी आजही त्यांच्या हळव्या हृदयामध्ये तशीच जपून ठेवली आहे, हेही एकदा गप्पांच्या ओघात उमगले. भाईंचे आजोबा हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कार ते व स्वामी विवेकानंदाचे अनुयायी होते. त्यांनी’ हिंदू धर्म’ या पुस्तकाचं लेखन केलं होतं. त्यांचे वडील मंगेशदादा हे चांगले रसिक वाचक होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांची वाचून झालेली पुस्तकं माळ्यावर तशीच धूळ खात पडली होती. आईच्या सांगण्यावरून ती मधुभाईंनी काढली आणि वाचायला सुरुवात केली. त्यातूनच वाचनाचा छंद जडला. निसर्गरम्य कोकणाचा मनसोक्त आनंद मधुभाईंनी घेतला. त्याबरोबरच तेथील निसर्गाचे अनेक चमत्कार त्यांनी जवळून पाहिले. निसर्गसौंदर्याची अनेक रूपे अनुभवली. तेथील सामाजिक प्रश्न, समस्या माणसाचं वास्तव जीवन याकडेही उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्या समस्या पुढे दूर करण्याचाही त्यांनी अतोनात प्रयत्न केला. कथा, कादंबऱ्यांमधून कोकणातील निसर्ग, तेथील माणसं, त्यांचं जीवन मधुभाई साकारू लागले. करूळला शाळा काढली. अनेक पिढ्या त्या शाळेने घडविल्या.

‘माहीमची खाडी’ ही कादंबरी वाचली नाही, असा मराठी वाचकच सापडणार नाही. माहीमची खाडी आणि मधुभाईंचं ‘करुळचा मुलगा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि एखाद्या विस्तीर्ण, स्फटिकमय गूढ, रम्य सरोवरासारखा त्यांच्या जीवनाचा पट उलगडत गेला. त्यासोबतच कोकणातील खळखळ वाहणारे झरे, तांबडी माती, मोहरलेल्या आंब्या- फणसाच्या झाडांची डवरलेली ती काटेरी वाट संपूच नये असं वाटत होतं. त्यांच्या अलवार शब्दांनी मनावर गारुड केलं.

कथा, कादंबरी, ललित लेख, व्यक्तिचित्रे, चरित्र, आत्मचरित्र, संकीर्ण, कविता, नाटक, बाल वाङ्मय, चित्रपट, दूरदर्शन मालिका इत्यादी विविध साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांच्या त्या अफाट साहित्याचा परिचय झाला, तेव्हा आश्चर्य वाटले. त्यानंतर जेव्हा भाईंना भेटले, तेव्हा मी त्यांना विचारलं, “भाई, आपण इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती केली, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तुमच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. त्याबरोबर आपण नोकरीही करत होतात. हे सर्व एकाच वेळेला कसं पेलवलं?”

मधुभाई म्हणाले, “उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं की, कथाबीज सापडते, त्यावर विचार प्रक्रिया सुरू होते. कथा कागदावर उतरली की, खूप आनंद होतो. लिखाण माझ्यासाठी ऊर्जा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी एका वेळेला मी करू शकलो.”

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते फेडण्यासाठी मधुभाईंनी अनेक संस्थांवर पदभार स्वीकारून, संस्थांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यापैकी काही संस्थांचा उल्लेख करता येईल. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात तीन-साडेतीन वर्षे माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे सरकारच्या जनसंपर्क अधिकारी या पदावरही आपण काम केले. आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी होतात व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे

महाव्यवस्थापकही होतात. अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, दुसरीकडे लिखाणही चालू होते.
१९८३ साली मधुभाईंनी नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. परत‌ २००६ साली ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष झाले. इतकेच नाही तर यांनी एक काच कारखानाही काढला होता. त्या मागचा उद्देश होता, कोकणातील गरीब लोकांना हाताला काम मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. मधुभाईंचे हे सर्व व्याप पाहून, ते लिखाण कधी करत असतील? हा मला प्रश्न पडला. या प्रश्नाचे उत्तर देताना भाई म्हणाले की, “कोणत्याही लेखकाचं अनुभव विश्व त्याला लिहिण्यासाठी प्रेरित करतं. कोणत्याही गोष्टीसाठी वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही.” भाईंची ही वाक्ये कायमच मनात रुजली.

अनेक वेळा ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमासाठी केशवसुत स्मारकांमध्ये जाणे झाले. ते ठिकाण आमच्यासाठी आता माहेरघरच झाले आहे. केशवसुत स्मारकाची उभारणी करून, मधुभाईंनी कवींसाठी ते एक काव्यतीर्थ उभं केलं आहे. केशवसुत स्मारकाच्या निर्मितीमागे मधुभाईंचा मोलाचा सहभाग आहे, त्याबरोबरच खूप कष्टातून त्यांनी ते उभे केले आहे.

मधुभाईंच्या आयुष्यात अनेक वादळं आली आणि त्या वादळांना खंबीरपणे ते हसत-हसत सामोरे गेले. त्यांना मी कधी थकलेलं पाहिलं नाही. निर्मळ स्वच्छ मनाचे मधुभाई हे सर्वांचेच प्रेरणास्रोत आहेत.
मला त्यांचा फक्त सहवासच लाभला नाही, तर त्यांचा परिसस्पर्श माझ्या शब्दांना झाला. या साहित्य प्रवाहात मधुभाईंमुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

मधुभाईंचा सहवास म्हणजे, निळ्याशुभ्र आकाशात इंद्रधनुष्याबरोबर रंग खेळण्यासारखं आहे.
ही शब्द सुमनांची ओंजळ मधुभाईंच्या ९३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या कवितेतून त्यांना अर्पण करते…

भाई,
वादळ कवेत घेऊन
चालत राहतात तुम्ही जेव्हा
शब्दांचं मोहळ…
तुमच्या डोळ्यांत दाटून येतं तेव्हा

वाचत राहते तुम्हाला
एखाद्या पुस्तकासारखी
पानन् पान आयुष्याचं
तुम्ही लिहून ठेवलेलं खरेपणाने
म्हणूनच त्या शाईलाही
सुगंध येतो वेदनेचा

शांत धीर गंभीर
स्थितप्रज्ञ पाहाडासारखे
तुम्ही हवं तसं जगलात
ना भीती ना चिंता
जाणवली कधी तुमच्या डोळ्यांत

कायमच एक स्मित रेषा
पाहात आलेय ओठांवर
तीच बळ देते
तुमच्या सहवासात असलेल्या
सर्वांनाच

तुम्ही आजातशत्रू झालात भाई
कारण तुम्हाला माहीतच नाही
आपलं परकं मानणं

भरभरून दिली मायेची सावली
अन्…
झालात वटवृक्ष
तुमच्या गर्द छायेत पंख पसरून
आम्ही निश्चिंत झालो

मधुभाईंना चांगले आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. भाईंच्या कार्याला शतशः प्रणाम करून वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…!

इच्छा…

“लग्न करा. पण नर्सिणीसोबत नको. दुसरी कोणीही चालेल. ही माझी अखेरची इच्छा आहे.” तो मोठ्याने हसला. “आता तर ती गेली” “अखेरची इच्छा?” नर्सिणीनं पायात चपला घातल्या नि निघून गेली. दूर दूर…

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

सुहास माझा टॉवेल…” प्रभुदेवांनी हाक मारली. “देते महाराज.” सुहास टॉवेल घेऊन आली. दीपा बघत होती कॉटवरून. ती दुखणाईत होती. सुहास २४ तासांची नर्स होती. इन अँड आऊट अशी भानगड नव्हती. प्रभुदेवांशी तिचे नाते जवळकीचे होते. हक्क प्रस्थापित झाला होता. दीपा असहाय्य होती. जिवंतपणी गरजेला उभी राहत नाही, ती बायको कसली? असाध्य आजार जडला होता ना! नशिबाने जोडीदार दुखणे बाणे लागलेल्या बायकोस प्रेमाने सांभाळत होता. दुस्वास करीत नव्हता. औषधे विनातक्रार आणत होता. “प्रभुदेवा… महाराजा… टॉवेल घ्या.” बंद स्नानगृहापाशी दाराशी तिने
टकटक केली.

आता टॉवेलसकट नर्सिणीला हा टिकोजीराव आत ओढणार. रोजचेच होते हे प्रेमालाप. दीपाचे मन फुणफुणले. कापले. त्रासले. मग असहाय्य होऊन गप्प निपचित पडले.

रोजचा बायको देखत नर्सिणीसोबत ‘टॉवेलनामा’ झाला. दीपाने तो अस्वस्थपणे सहन केला. न सहन करून कोणाला सांगणार? मूलबाळ नव्हतेच अवतरले घरात.

“देवा, सोडव या मरण यातनातून.” तिने रामप्रभूंना विनविले. अगतिकपणे आस लावून.
“कधी गं मी जीव सोडेन?” तिने नर्सिणीला विचारले.
“जीवन देतो ‘तो’ … जीवन संपवितो, ‘तोच’आपल्या हातात आहे का, ते जगणे मरणे? मी तुमची सेवा चांगली करते माझ्यापरी!”
“हो. करतेस त्याबाबतीत प्रश्नच नाही.”
“सुहास, पावडर टाक पाठीवर” प्रभुदेवांनी आज्ञा केली.
दीपा टकामका रोज बघे. हळुवार हातांनी तिचा हक्काचा नवरा, नर्सकडून पाठ हलक्या हातांनी चोळून घेई.
वर अहाहा, झकास असे समाधानाचे हुंकार देई. दीपाला ते शक्य नव्हते. काय करणार?
प्रभुदेवांच्या पाठीवर कोमल हातांनी स्पंज झाले. अहाहा… झकाससुद्धा उरकले. ‘आता बास’ दीपा चिरकली.
“जळू नको गं. तुला काही कमी करतो का मी?” नवरा उत्तरला.
“नाही.”
“मग गपचिप बघ.”
ती असहाय्य होती. गपचिप तो स्पर्श सोहळा बघण्यावाचून तरणोपायच नव्हता. आरडाओरडा करून फरक पडणार नव्हता.

नौरोजी यथासांग पावडर स्वामी झाले. मग बायकोदेखत प्रभुदेवांनी नर्सिणीला एक ओष्ठय लॉलीपॉप दिला. मग त्याच उष्ट्या ओठांनी बायकोच्या कपाळाचा मुका घेतला.
बायको निपचित पडली होती.
“गोड लागला की नाही?”
“हो.”
“शहाणी माझी बायको. अगं पुरुष वर्षानुवर्षे एकटा, व्रतस्थ नाही राहू शकत गं बायको.”
“मला समजतं.”
“मग बरं? शहाणी हो. तरी मी नर्स बरोबरच लफडं करतो. अन्य प्रेमसंबंध करीत नाही. बाहेरख्यालीपणा तर अंगातच नाही.” तो स्वत:चे कौतुक
स्वत:च करीत होता. बायको ओठ शिवून होती.
“तू का गं गप्प गप्प?” त्याने बायकोस विचारले. पण ती गप्प गप्पच होती. त्याने नर्सिणीला घट्ट जवळ घेतले नि तो कामाला निघून गेला.

दिवस रात्रीचे गणित एकदाचे संपले. ती गेली. स्वर्गस्थ झाली. “सुटली.” नवरा म्हणाला. थोडे फार गिल्टी वाटायचे त्याला. नाही असे नाही. पण क्रियाकर्म यथासांग पार पडले.

“आता नो वांधा, लग्न करूया…”
“माझी हरकत नाही.” नर्सिण म्हणाली.
“लग्न म्हणजे काय? तू कायद्याने माझे नाव लावणार. कायद्याने माझी बायको होणार.”
“पण ते गरजेचे आहे ना?” नर्सिणीने म्हटले.
“म्हटलं तर आहे. म्हटलं तर नाही.”
“का हो? महाराजा…? …”
“जाताना ती म्हणाली…”
“काय म्हणाल्या बाईसाहेब?”
“अगं म्हणाली, मी तुम्हाला शरीरसुख देण्यात कमी पडले. मी गेले की दुसरं लग्न लगेच करा.”
“असं म्हणाल्या त्या? मन मोठं त्यांचं.” ती गदगदली.
“पण एक अट घातलीच.”
“कोणती हो?”
“लग्न करा. पण नर्सिणीसोबत नको. दुसरी कोणीही चालेल. ही माझी अखेरची इच्छा आहे.” तो मोठ्यामोठ्यांदा हसला. “आता तर ती गेली” “अखेरची इच्छा?” नर्सिणीनं पायात चपला घातल्या नि निघून गेली. दूर दूर…

बिवलीचा लक्ष्मीकेशव

कोकणात केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतात. कोकणातील असेच गर्द राईतील अपरिचित शिल्प म्हणजे बिवली गावचा लक्ष्मीकेशव. पेशवाईत अतिशय कठोर न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर नीळकंठशास्त्री थत्तेंची नेमणूक झाली. लक्ष्मी केशवाची मूर्ती थत्तेंना सापडली आणि त्यांनी बिवलीत प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले.

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

कोकणात विष्णू मूर्तीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसते. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतील. इतक्या विपुल प्रमाणात शवाच्या मूर्ती या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. विष्णू मूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती या प्रकारात मोडतात. गर्द झाडी, शांत समुद्रकिनारे आणि कौलारू घरे अशा निसर्ग श्रीमंतीने कोकण प्रांत बहरलेला आहे; परंतु त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर शिल्प श्रीमंतीसुद्धा या प्रदेशाला लाभलेली आहे. मात्र ही शिल्प श्रीमंती, हे शिल्पवैभव हे त्याच गर्द झाडीमध्ये कुठेतरी आतमध्ये लपलेले दिसते.

ते पाहायचे, अनुभवायचे तर नुसती वाट वाकडी करून चालत नाही, तर त्या ठिकाणाची नेमकी माहिती आणि इतिहाससुद्धा जाणून घ्यावा लागतो. कोकणातला प्रवास म्हणजे वळणावळणाचाच. सहजगत्या कोणत्या ठिकाणी जाऊ असे कधी इथे होतच नाही. पण जेव्हा आपण इच्छितस्थळी पोहोचतो तेव्हा मात्र निसर्ग नाही तर शिल्पं आपली नजर खिळवून ठेवतात. असेच एक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.

चिपळूण हे कोकणातील एक महत्त्वाचे शहर, रेल्वे स्टेशन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण. गुहागर या माझ्या अतिशय आवडत्या ठिकाणी जायला चिपळूण सोयीचे पडते. सध्या या रस्त्यावर पुलाचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे, पण लवकरच हा मार्ग आणखी उत्तम होईल अशी आशा. पण या हमरस्त्याला सोडून थोडी भ्रमंती करण्याची तयारी जर असेल, तर काही नितांत सुंदर ठिकाणे पाहता येतात. असेच एक ठिकाण म्हणजे बिवली. चिपळूणहून वासिष्ठी नदीच्या पात्राला समांतर २५-३० कि.मी. पश्चिमेकडे गेले की, मालदोली नावाचे ठिकाण लागते. तिथे हल्ली नदीतून बॅकवॉटर सफारी करण्याची सोय झाली आहे. मालदोलीकडे जात असताना केतकी या नावाचे गाव लागते. नदीचे पात्र उजवीकडे ठेवत २० कि.मी. अंतरावर श्रीराम मंदिर आहे, तिथून सरळ डाव्या बाजूला बिवलीकडे जाणारा रस्ता लागतो. शेवटचा काही भाग थोडा कच्चा आहे, पण गाडी व्यवस्थित गावापर्यंत जाते. गुगल मॅपमध्ये शेवटचे २०० मी.

अंतर पायी जावे लागते असे दर्शवले असले, तरीही कच्च्या मार्गावरून गाडी मंदिरासमोर पोहोचते. पेशवाईत अतिशय कठोर न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर बिवली गावातील नीळकंठशास्त्री थत्ते यांची नेमणूक झाली. इथली लक्ष्मी केशवाची मूर्ती थत्तेंना सापडली आणि त्यांनी बिवलीत प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले.

सन १८३० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. हे देवस्थान थत्ते मंडळींचे कुलदैवत मानले जाते. पद्म-शंख-चक्र-गदा अशा क्रमात मूर्तीच्या हातातील आयुधे असल्याने ही मूर्ती केशवरूप मानली जाते. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर कोरीवकाम असलेल्या विष्णू मूर्ती पाहता येतात. ११-१२ व्या शतकात कोकणावर शिलाहार राजांचे शासन होते, तेव्हा यापैकी बहुतांश मूर्ती कोरल्या गेल्या. लेखाच्या शेवटी दिलेली लिंकही नक्की पाहा. त्याही नक्की पाहा. मूर्तीच्या गळ्यातील माळेत आंबा कोरला आहे, म्हणजे मूर्तिकार स्थानिकच असावा का? मूर्तीच्या पायाशी श्रीदेवी आणि नमस्कार मुद्रेतील गरुड दिसतो आणि सोबत सेविका आहेत. मूर्तीच्या हातातील कमळ एका बाजूने स्त्रीरूपाचा आभास निर्माण करते, यालाच लक्ष्मी मानले जाते. अतिशय सुंदर मुकुट, कोरीवकाम असलेली प्रभावळ आणि अगदी खरी वाटावीत अशी आभूषणे असे नाजूक कोरीव कामाने नटलेले हे शिल्प आहे. गाभाऱ्यासमोर गरुड शिल्प आहे, ते नवीन असावे. जसे शिवमंदिरात नंदी असतो, तसाच इथे गरुड आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

विचारचक्र

अनेक लोक अतिविचारांनी ताणतणावाच्या चक्रात अडकले जातात. अतिविचार करणे हा मानवी मनाला अडसर ठरू शकतो. सतत फक्त विचारातच गुंग असल्याने व्यक्तीचे कृतीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वर्तमानातील महत्त्वाचा वेळ वाया न जाऊ देता एका मर्यादेपेक्षा विचार करणं आवश्यक आहे. यासाठी मन:शांतीचे तत्त्व आत्मसात करा. अतिविचारांच्या भोवऱ्यातून मुक्त व्हा व एक सशक्त आयुष्य जगा.

ओंजळ – पल्लवी अष्टेकर

संत बहिणाबाई यांची मानवी मनावर एक सुंदर कविता आपल्याला माहीत आहे.

‘मन वढाय वढाय,
उभ्या पिकातलं ढोर,
किती हांकला हांकला,
फिरी येतं पिकांवर’

आपल्या मनाच्या विविध अवस्थांचे वर्णन संत बहिणाबाई यांनी अतिशय समर्पक शब्दांत केले आहे. बहिणाबाई परमेश्वराला विचारतात की, “देवा, अशी कशी ही मनाची करामत? कारण, मनासारखी चालणारी दुसरी कोणतीच गोष्ट या जगामध्ये नाही.” मनाच्या विविध अवस्थांपैकी आणखी एक अवस्था, म्हणजे अतिविचार करण्याची. अतिविचार करणे हा मानवी मनाचा एक अडसर आहे. विचारांचा विचार करण्यात गुंतणे, सतत स्वत:च्या विचारांची जाणीव असणे, अचानक येणाऱ्या विचारांचा ताण अशा गोष्टी यात अंतर्भूत आहेत. अनेकदा व्यक्ती आपल्या विचारांना प्रश्न विचारणे, त्यांच्या योग्यतेवर शंका घेणे, त्यांचे पृथ्थकरण किंवा अंदाज यात अडकून पडते. अतिविचार करणारी व्यक्ती पुन:पुन्हा एकच विषय घोळवित राहते.

माधुरी नोकरी करायची. तिच्या नवऱ्याची मिळकतही बेताचीच होती. एकत्र कुटुंब होतं, त्याचेही ताणतणाव वेगळे असायचे. माधुरीला दोन मुले होती. सर्वांची खाणी-पिणी, घरातील कामे याचा ताण तिच्यावर असायचा. अगदी घरकामाला बायका असल्या, तरी माधुरीचे विचारचक्र थांबायचे नाही. दिवसभर धावपळीत वावरल्याने, ती संध्याकाळी थकलेली असायची. ऑफिसातील कामेही वेळेत पूर्ण करण्याचे बंधन तिच्या डोक्यावर असायचे. तिच्या मनातील एका कप्प्यात कामांची न संपणारी यादी असायची. मुलांची आजारपणे, घरातील सणवार, पै-पाहुणे या गोष्टी अपरिहार्य होत्या. ऑफिसमधून निघताना सासूबाईंचा घरातल्या सामानांसाठी फोन यायचा.

यामध्ये माधुरीने अतिविचार टाळण्यासाठीची कौशल्ये जाणून घेऊन कृतीत आणणे जरूरीचे आहे. जसे की, अधे-मधे सुट्टीच्या काळात सहली काढणे, दैनंदिन जीवनात काही प्रमाणात बदल करणे. अनेकदा ‘आहे त्या गोष्टीचा स्वीकार करण्यानेही’ तणाव टाळला जातो. जर अनेक प्रसंगांशी जुळवून घेणारी कला आपण आत्मसात केली, तर अकारण होणारी भांडणे व त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव टळतील. अतिविचारांच्या लक्षणांमध्ये झोपेचा त्रास, डोकेदुखी, भूतकाळाबाबत विचार करण्यात बराच वेळ घालविणे, आपल्या चुकांचा सतत विचार करणे, एखाद्याने सांगितलेली गोष्ट मनात धरून सतत त्यावर विचार करणे, चिंता व तणाव मनातून काढण्यास असमर्थ ठरणे. अतिविचार करणारी व्यक्ती याबाबत बरेचदा अनभिज्ञ असते.

माधुरीने एकाच वेळेस असंख्य कामांचा विचार करण्यापेक्षा, महत्त्वपूर्ण कामे अगोदर व ज्या गोष्टींची घाई करण्याची गरज नाही, त्यांच्यावर काट मारणे गरजेचे आहे. कुटुंबात काही जबाबदाऱ्या इतरांवर सोपवा किंवा त्यांना स्वत:हून काही जबाबदाऱ्या स्वीकारू द्या. यातून तुमची मुले व कुटुंबातील इतर सदस्य यांनासुद्धा तुमच्या कष्टांची जाणीव होईल. दररोज त्याच त्या चक्रात पिसण्यापेक्षा अधे-मधे स्वत:च्या छंदांनाही जरूर वेळ द्या. एखाद्या अतिश्रमामध्ये नोकरी करणारे लोक, थकले तरी पाठोपाठ काम करणारे लोक असे लोक बहुतांशी वेळा अतिविचारांच्या चक्रात अडकलेले असतात.

अतिविचारांनी सतत ताणतणाव निर्माण होतो. अशी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत फाटे फोडण्याची सवय असते. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होत नाही. त्यामुळे रूक्षता, फटकळपणा, रागीट स्वभाव, उतावीळपणा, उदास, नाराज चेहरा, मन आनंदी नसणे, धडधड, डायबेटिस, बी. पी. अशा गोष्टी निर्माण होण्याची प्रवृत्ती अधिक असते. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे चांगली तब्येत असणे. योग्य आहार, विहार, निद्रा यांचे संतुलन मनावरही योग्य परिणाम करते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार-ताज्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा. चमचमीत, तेलकट पदार्थ टाळावेत.

खरं तर व्यक्तीने सुपरमॅन होण्याचा मार्ग न शोधता, आपल्या अपेक्षा कमी करणं, हा सर्वात सोपा व वास्तवाला साजेसा उपाय आहे. आपला ताणतणाव टाळण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेणं, ही एक महत्त्वाची गोष्टं आपण करू शकतो. जुळवून घेणं म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करणं. आपली ध्येय एखाद्या गोष्टीबद्दलची आपली समज, अपेक्षा यांच्यात बदल करणं. सर्वात महत्त्वाची गोष्टं म्हणजे, आपला स्वत:वर ताबा असणं व आपल्या आयुष्याचे सूत्रधार आपण स्वत: आहोत, हे लक्षात ठेवणं.

अस्वस्थता व अतिविचार यांच्यात आपलं लक्ष विचलित करण्याची, तसेच आपला संभ्रम आणखी वाढविण्याची ताकद असते. जेव्हा आपण या विचारांचं नीट आकलन करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की, यातले बरचसे विचार म्हणजे निव्वळ गोंधळ आहेत व त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपलं स्वत:वर नियंत्रण आहे, हे जितक्या ठामपणे तुम्हाला वाटेल तितकी तुम्ही अतिविचार करण्याची शक्यता कमी होते. कामं अर्धवट ठेवणं टाळा. एकावेळी अनेक कामं करणं टाळा. एका कार्याची निवड करा, त्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित करा, ते पूर्ण करा व मग नवीन कार्याची निवड करा.

त्यामुळं आता पुढं कोणतं काम आहे, याचा अतिविचार करणं बंद होतं. ताणतणाव व दबाव येऊ नये म्हणून अर्धवट कामे सोडू नका. अनेक डॉक्टर्स सुचवितात की, फार यश-अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे. निर्णय घेण्याला फार महत्त्व आहे. नेहमी माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे, या विचारात गुंतून पडल्याने निर्णय घेताच येणार नाही. सतत फक्त विचारातच गुंग असलेल्या व्यक्तीचे कृतीकडे दुर्लक्ष होते. पुढचा विचार करणं चांगलं असलं, तरी एका मर्यादेपेक्षा तो करणं, यातून आताचा वर्तमानातील महत्त्वाचा वेळ वाया जाऊ शकतो.

मन:शांतीचे तत्त्व आत्मसात करा. तुम्ही शिथिल होऊन तुम्हाला आवडेल, अशा एखाद्या शांत, गुढ जंगलाची, समुद्रकिनाऱ्याची, पुस्तक वाचत बसल्याची कल्पना करू शकता. काही लोकांना सतत काळजी करण्याची सवय असते. त्यांचे काळजीचक्र सातत्याने सुरूच असते. त्यानेही अतिविचार सुरू राहतात. जेवढी तुम्ही काळजी करण्यास विलंब करता, तेवढी तुमची काळजी करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. तुमच्या विचारांची पुनर्रचना करा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. लक्ष विचलित करणाऱ्या विचारांच्या तुम्ही नियंत्रणात नसून तुमच्याकडे पर्याय आहे, हे तुम्ही स्वत:ला शिकवित जा.

काही दृष्टिकोन आपल्या आयुष्यात आणण्याची गरज आहे. जसे की, जे नियंत्रणात ठेवणं शक्य नाही, त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही जे नियंत्रणात ठेवू शकता, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जे हवं आहे, त्यावर नाही, तर तुम्हाला ज्याची गरज आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. अतिविचारांच्या भोवऱ्यातून मुक्त व्हा व एक सशक्त आयुष्य जगा.

‘जगी ज्यास कोणी नाही…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

एके काळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आकाशवाणीने फार मोठे योगदान दिले आहे. ते इतके प्रचंड आहे की, अनेक पिढ्यांच्या बालपणातल्या आठवणी आणि मनावर नकळत झालेले संस्कार आकाशवाणीशी निगडित आहेत. समाजमनाचे मानसिक आरोग्य जुन्या संतांनी, त्या काळच्या लेखकांनी जाणीवपूर्वक जपले होते. कलेचा आस्वाद घेता-घेता, माणसाच्या मनात उच्च जीवनमूल्यांची जोपासना व्हावी, अशी व्यवस्था केली होती. त्याचे अगदी नितळ प्रतिबिंब आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध कार्यक्रमांत उमटवलेले दिसायचे.

सुमारे ४-५ दशकांपूर्वी सकाळच्या प्रसन्न वेळी जवळजवळ प्रत्येक घरात रेडिओ लागलेला असायचा. सुरुवातीला उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला एखादा कर्णमधुर राग लागे. मग ‘विचारपुष्प’ किंवा ‘प्रभातकिरणे’ अशा सदरात चांगले विचार देणारे अतिसंक्षिप्त प्रवचनवजा भाषण होई आणि त्यानंतर भक्तिगीते लागत. दरम्यान उत्तम मराठीत लिहिलेले नेटके, फक्त खरी आणि उपयुक्त माहिती देणारे, एखादे बातमीपत्र येऊन जायचे.

सकाळच्या वातावरणात त्या वेळच्या सरळसाध्या समाजातील माणसांचे मन स्वाभाविकच भक्तीकडे, परमेश्वराच्या आराधनेकडे वळायचे. आकाशवाणीवरचे कार्यक्रमही सर्वसामान्य माणसाच्या या मानसिकतेला अनुकूल असेच असत. लाखो मराठी श्रोत्यांना लतादीदी, सुमन कल्याणपूर, गजाजन वाटवे, सुधा मल्होत्रा, पंडित भीमसेन जोशी, विठ्ठल शिंदे यांनी गायलेली भजने आजही तोंडपाठ आहेत. मधुकर जोशी यांनी लिहिलेले आणि दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेले असेच एक भक्तिगीत आकाशवाणीवर नेहमी लागायचे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातल्या त्या गाण्यात निराश मनाला उभारी देणारा एक विचार मांडला होता.

जेव्हा माणसाच्या मनाला उदासीनता घेरून टाकते, जीवनात आलेले अपयश अस्वस्थ करते, एकटेपणा खायला उठतो, तेव्हा अशा गाण्यांनी मोठा आधार मिळायचा. दशरथ पुजारी यांनी ‘वैरागी-भैरव’ रागात बसवलेल्या, या गाण्याने अगणित अस्वस्थ मनांना त्याकाळी मोठा दिलासा दिला. गीतकार जोशी यांचे त्या भक्तिगीताचे शब्द होते-

‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे.’

माणसाच्या जीवनात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, संकटांवर संकटे येऊ लागतात. सुटकेचा मार्गच सापडत नाही. ‘आपले कुणी नाही, आता कुठूनही मदत येणार नाही’ असे वाटून तो निराश होतो. त्यावेळी कुणीतरी त्याला आधार देणारे चार शब्द सांगितले, तर परिस्थिती जरी बदलत नसली, अगदी तीच राहत असली, तरी मनाला थोडी उभारी येते.

तणाव कमी होऊन थोडे हलके वाटू लागते. सुकून गेलेल्या आशेला नवे कोंब फुटू लागतात. त्यात जर त्या आशा दाखवणाऱ्या व्यक्तीने काही उदाहरणे दिली, तर अजूनच उत्साह जाणवू लागतो. मधुकर जोशींनी गाण्यात अशी उदाहरणे घेतली होती की, ती भारतातल्या तत्कालीन सर्वच लोकांना परिचित होती. चटकन समजण्यासारखी होती. ते म्हणतात, कुंतीने लोकलज्जेस्तव आपल्या पोटी नुकतेच जन्मलेले अनौरस अर्भक सरळ एका टोपलीत ठेवून नदीत सोडून दिले. तिने क्षणभरही हा विचार केला नाही की, अजून कसलेच ज्ञान नसलेले, हे शक्तिहीन बालक खळखळत्या नदीत वाहून जाताना जर ती टोपली वाऱ्याने उलटली तर पाण्यात पडेल. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा काही तासांतच मृत्यू होईल!

पण ईश्वरी लीला वेगळीच होती. गीतकार म्हणतात की, ‘जो विश्वनिर्माता भूतलावरचे कोणताही खांब नसलेले, निळ्या आकाशाचे छप्पर अधांतरी तरंगत ठेवतो’ तो काहीही करू शकतो. आईने जन्मत:च त्याग केलेल्या कर्णरूपी तान्हे बाळ घेऊन गंगेच्या वेगवान प्रवाहात वाहत निघालेली ती टोपली ‘अधिरथ’ नावाच्या सम्राट धृतराष्ट्राच्या सारथ्याला सापडते. त्याची पत्नी राधिका आणि तो त्या निराधार बाळाचा पित्याप्रमाणे सांभाळ करतो, हा योगायोग नसतो, ती ईश्वरी योजनाच असते. त्यामुळे गंगेच्या अनेक भवरे असलेल्या वेगवान पाण्यात ज्या अगतिक बाळाचा फक्त मृत्यूच शक्य होता, तो पुढे महाभारतातला एक नामांकित राजा, एक अजेय योद्धा बनून अजरामर झाला!

‘बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणूनी त्याचे नाव अमर आहे.’

मधुकर जोशींनी घेतलेले दुसरे उदाहरण तर अजूनच प्रभावी आहे. परमेश्वराची भक्ती करतो म्हणून प्रल्हादाला त्याच्या राक्षस असलेल्या पित्याने ठार मारायचे ठरवले. त्यावेळी देवाने हिरण्यकश्यपूला मिळालेला विचित्र वर लक्षात घेऊन नृसिंहरूप धारण करून, स्वत:च त्याचा वध केला आणि प्रल्हादाचे प्राण वाचवले!

“भक्त बाळ प्रल्हादाला छळिले पित्याने
नारसिंहे रूपे त्याले रक्षिले प्रभुने
अलौकिक त्याची मूर्ती अजून विश्व पाहे.”

दोन प्राचीन उदाहरणे घेतल्यावर, मधुकरजींनी तिसरे उदाहरण थोडे अलीकडचे घेतले. संत कबीर हे एक गरीब वीणकर होते. त्यांना लोक चिडवत, त्यांची टिंगल करत. त्यावेळी ज्या वेदना ते सहन करत, त्यातूनच त्यांचे लेखन होई. त्यांनी अनेक दोहे लिहिले. त्यांनाही देवानेच वाचवले, इतकेच नाही तर समाजातल्या अगदी खालच्या स्तरात जीवन व्यक्तीत केलेल्या, त्या माणसाला संतपद प्राप्त झाले. आता लोक त्यांचे दोहे मोठ्या भक्तीने गातात. कबीराने अश्रू गाळत ज्या ओळी लिहिल्या त्याच पुढे मोठे भक्तिकाव्य ठरल्या, हेसुद्धा ईश्वरी कृपेनेच घडले असे गीतकार म्हणतात.

‘साधुसंत कबीराला त्या छळिती लोक सारे,
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे,
आसवेच त्यांची झाली दु:खरूप दोहे.’

आता सगळे बदलले! टेलिव्हिजनमध्ये श्रवणाबरोबर दृश्यही दिसतात म्हणून त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. माणसाची दोन ज्ञानेंद्रिये गुंतवून ठेवणारे हे माध्यम ज्ञान मात्र किती आणि कोणते देते हा प्रश्नच आहे. कारण आकाशवाणी ऐकत लोक आपली सकाळची कामे करू शकत. मधुर संगीत आणि सुंदर कविता यांमुळे कलेचा आणि उच्च जीवनमूल्यांचा एक संस्कार सगळ्या समाजावर नकळत होऊन जायचा. आज आपण ज्या टीव्ही मालिका पाहतो, त्यात तर प्रत्येक घर हे आपसातल्या कारस्थानांचे केंद्र बनलेले पाहतो. मत्सर, द्वेष, राग, गुन्हेगारी, खोटेपणा, बाहेरख्यालीपणा याची रेलचेल जणू प्रत्येक कुटुंबात पसरली आहे, असे खोटेच चित्र उभे केले जाते.

काही अभ्यासकांच्या मते, पाश्चिमात्य जगातील मोठमोठ्या कॉर्पोरेट्सना भारतातील भक्कम कुटुंबसंस्था हा अडथळा वाटू लागली आहे. ती आधी खिळखिळी आणि हळूहळू नष्ट करण्यासाठीच परस्परविश्वास, टिकाऊ नातेसंबंध, नैतिक मूल्ये हे सर्व नष्ट करणारे साहित्य मुद्दाम पुरस्कृत करण्यात येते आहे. खरे-खोटे देवालाच माहीत. पण तो जुना सुसंकृत, निकोप, सकारात्मक मनोरंजनाचा काळ संपला हे मात्र खरे!

हा छंद जीवाला लावी पिसे…

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

मी आज हे जे काही सांगणार आहे त्याच्यावर तुमच्यापैकी कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे.
तुम्हीच कशाला पण माझा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. मी पुन:पुन्हा-चार सहा ठिकाणी चौकशी करून खात्री करून घेतली आणि नंतरच विश्वास ठेवला.
तुम्ही विश्वास ठेवणार नाही तरीही सांगतो…

रवींद्रकुमार सैनी नावाचा हरयाणातील साहरनपूरचा रहिवासी…
वय वर्षं तेवीस…
हा रवींद्रकुमार साहरंगपूरला ऑडिओ व्हीडिओचं एक दुकान चालवायचा.
आपल्या भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत त्यांच्यापैकीच एक. विशेषकरून महिंद्रसिंग धोनीचा चाहता. ज्याला इंग्रजीत ‘फॅन’ म्हणतात ना तसा हा धोनीचा पंखा…
एकदा त्याला त्याची मैत्रीण सहजच म्हणाली, ‘अरे तू जर धोनीचा एवढा भक्त आहेस तर मग त्याच्यासोबत तुझा एकही फोटो नाही?’
झालं… स्वारी जिद्दीला पेटली आणि…
सध्या महिंद्रसिंग धोनी कुठे आहे याची चौकशी करता करता धोनी सध्या रांची येथे असल्याचे रवींद्रकुमारला कळलं. या रवींद्रकुमारने तडक रांची गाठली. एक दोन नव्हे तर तब्बल पस्तीस दिवस तो रांचीला हॉटेलमध्ये रूम घेऊन तळ ठोकून बसला आणि त्यानंतर धोनी रांचीहून मुंबईला विमानानं निघाला असता विमानतळावर रवींद्रकुमारने सुरक्षा रक्षकांचं कडं भेदून धोनीपर्यंत मजल मारली. त्याचाशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्याबरोबर आपलं एक छायाचित्रही काढून घेतलं. धोनीबरोबर फोटो काढून घेण्याची जिद्द पूर्ण केली. पण या जिद्दीची किंमत किती याची कल्पना आहे?

त्या रवींद्रकुमार सैनीने त्याच्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेलं ऑडिओ व्हीडिओचं दुकान चक्क विकलं. साहरनपूर ते रांची हा प्रवास आणि रांचीमध्ये तब्बल पस्तीस दिवसांचा मुक्काम यांचा खर्च करण्यासाठी त्याला आपलं दुकान विकावं लागलं…
मला ठाऊक आहे की, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी स्वतः किमान दहा ठिकाणी नीट चौकशी करून नंतरच हे सांगतोय.
काय म्हणाल तुम्ही या रवींद्रकुमार सैनीला…
जिद्दी? की मूर्ख?
तो स्वतःला काय म्हणत असेल?
‘मैं जो कहता हूँ वो करके दिखाता हूँ।’ असा अभिमान वाटत असेल? की…
आपण केलेल्या गोष्टीबद्दल नंतर पश्चात्ताप झाला असेल?
त्याला काय वाटत असेल हे मला ठाऊक नाही पण मला मात्र त्याची कीव आली. बिच्चारा… आपल्याच एका खोट्या जिद्दीचा गेलेला बळी.
असे अनेक रवींदकुमार आपल्याला आढळतात. तुमच्याही ओळखीपाळखीत असा एखादा माणूस असेलच. कोणत्या तरी एखाद्या नादापायी चांगलं सुरळीत चाललेलं आयुष्य कवडीमोल किमतीला उधळून लावणारे अनेकजण आपण पाहतो.

आणखी एक सत्य घटना…

कॉलेजमध्ये शिकणारे काही विद्यार्थी दहा-बाराजणांचा ग्रुप करून मोटारसायकली घेऊन सहलीला गेले. रात्री दारू प्यायले आणि बोलता बोलता पैज लावली गेली.
रेल्वे ट्रकमधून मोटार सायकल चालवायची.
पुढे काय झालं ते मी सांगायलाच हवंय का?
समोरून आलेल्या रेल्वेने उडवल्यामुळे तीनजण जागच्या जागी मेले. दोघेजण पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्यामुळे कायमचे अपंग झाले आणि चारजण सहा-आठ महिने हॉस्पिटलमध्ये राहून कसेबसे बरे होऊन परतले.
या अशा गोष्टींना तुम्ही काय म्हणाल?
जुगाराच्या दारूच्या व्यसनापायी, बायकांच्या नादापायी अनेक संसाराची वाताहत होते हे आपल्याला ठाऊकच आहे. पण जुगार आणि बाई बाटली यांच्या नादापेक्षाही भयानक असे नाद असतातच की…
सुरुवातीला अत्यंत निरूपद्रवी वाटणारे हे नाद पुढे आयुष्याचा ताबा घेतात आणि अनेकदा अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं.

महंमद अली रोडवर एक हातगाडी चालविणाऱ्या माणसाने म्हणे ‘हम आपके है कौन?’ हा चित्रपट तब्बल साडेतीनशे वेळा पाहिला. दररोज तो दुपारी तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बसायचा आणि पिक्चर बघून यायचा. जर कधी हाऊसफुल्ल असला आणि तिकीट मिळालं नाही, तर चक्क ब्लॅकमधे विकत घ्यायचा. वेळ आणि पैशांचा हा अशा प्रकारचा अपव्यय करून त्याने काय साधलं हे त्याचं त्यालाच ठाऊक…!

अशी ही नादिष्ट माणसं. एखाद्या गोष्टीसाठी जिद्दीला पेटतात आणि त्यासाठी काय वाटेल ते करतात. वाटेल ती किंमत मोजतात. कधी पैशांची. कधी आयुष्याची…

बरं यातून नेमका फायदा कुणाचा? त्यांचा स्वतःचा? आजूबाजूच्यांचा? समाजाचा? राष्ट्राचा? की कुणाचाच नाही?
दूरदृष्टीच्या अभावामुळे आपल्या कृतीचे दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा विचार न करता केवळ क्षणिक सुखाकरिता ही माणसं स्वतःचंच नुकसान करतात… आपलं स्वतःचं आणि अनेकदा आपल्याबरोबर इतरांचंही…
अर्थात याच पठडीतले पण वेगळ्या वर्गात मोडणारे आणखीही वेगळ्या प्रकारचे लोक असतात. एखाद्या जिद्दीनं प्रेरित होऊन, एखाद्या ध्यासानं वेडी होऊन आपलं उभं आयुष्य पणाला लावणारा आणखीन एक वेगळा वर्ग असतो.
स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन त्यासाठी उभं आयुष्य पेटवून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.

सतीची चाल कायद्याने बंद व्हावी म्हणून तत्कालीन समाजातील उच्चभ्रूंबरोबर वैर पत्करणारे आणि सरकारदरबारी झगडणारे राजा राममोहन रॉय.

धरण विस्थापितांच्या न्याय्य हक्कासाठी लढता लढता सुखाचं आयुष्य स्वखुशीनं वैराण करणाऱ्या मेधा पाटकर.
कुष्टरोग्यांना समाजात मानाने जगता यावं म्हणून आयुष्यभर सेवेचं व्रत घेतलेले सेवाव्रती बाबा आमटे.
विजेच्या दिव्याचा शोध लावण्याचा ध्यासापायी एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्षं प्रयोगशाळेत अथक प्रयोग करणारे एडिसन.

अभिजात संगीताच्या उपासनेसाठी बालवयातचे घराचा त्याग केलेले, असंख्य हालअपेष्टांतून स्वरशिल्प उभे करणारे पंडित भीमसेन जोशी. शिवचरित्र सातासमुद्रापार नेणारे बाबासाहेब पुरंदरे.

अशी अनेक नावं सांगता येतील…
हे देखील छांदीष्टच. पण यांचे छंद मात्र वेगळे…
यांच्या छंदाला केवळ ‘मी आणि माझं क्षणिक सुख’ एवढंच कुंपण नसतं. इथं समाजाच्या मांगल्याचा विचार केलेला असतो. केवळ आपल्याच नव्हे तर समाजाच्या कल्याणाचा विचार त्यात सामाविष्ट असतो. म्हणूनच यांचे छंद हे केवळ छंद उरत नाहीत. हे छंद एक व्रत होतं. या व्रतातून त्यांना स्वतःला तर आनंद मिळतोच मिळतो पण तोच आनंद इतरांपर्यंतही पोहोचतो. त्यातून समाजाचा अभ्युदय होतो. आज आपलं जग जे सुंदर दिसतंय ते या अशा छादिष्टांमुळे…
यांच्या छंदाला व्यसन असं लेबल लावता येणार नाही.

छंद आणि व्यसन यात मोठा फरक असतो तो त्यातून मिळणाऱ्या आनंदाच्या प्रतीचा आणि नंतर होणाऱ्या परिणामांचा…
व्यसनातून मिळणारं सुख हे केवळ त्या व्यसनी व्यक्तीपुरतं मर्यादित असतं. छंदातून स्वतःबरोबर समाजालाही आनंद देता येतो.

व्यसनाचं सुख हे केवळ क्षणभंगुर असतं. नशा उतरली, जिद्द पूर्ण झाली की ते सुख संपलं. छंदांतून मिळणारा आनंद हा दीर्घकाल टिकणारा असतो.

व्यसनामुळे केवळ स्वतःचंच नव्हे तर आजूबाजूच्यांचंही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नुकसान होतं. त्यांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास होतो. व्यसनांचे दूरगामी परिणाम वाईटच असतात. छंदांचे दूरगामी परिणाम नेहमी चांगलेच असतात.
व्यसनामुळे आयुष्याची राख होते. आयुष्य जळून जातं. तर चांगल्या छंदांमुळे आयुष्य उजळून निघतं.

‘जळणं’ आणि ‘उजळणं’ यात जो फरक असतो, तोच फरक व्यसन आणि छंद यामध्ये असतो. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा छंद जडवून घेताना किंवा कोणत्याही गोष्टीच्या नादाला लागताना हा छंद आहे की हे व्यसन आहे याची शहानिशा करून घ्यायला हवी. आजच्या छंदापायी उद्याच्या आयुष्यात पश्चात्ताप तर करावा लागणार नाही ना याचा विचार करूनच जिद्दीनं छंद जोपासावा असं मला वाटतं…

आणि हो छंद जोपासणाऱ्यांना आपल्या छंदाचा कधीही पश्चात्ताप करावा लागत नाही. नादिष्ट अन् व्यसनी माणसांना मात्र भावनेच्या भरात क्षणिक जिद्द पूर्ण करण्यासाठी केलेल्या आपल्या कृतीचा पुढे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो.
कुणास ठाऊक? त्या रवींद्रकुमार सैनीला दुकान विकल्याबद्दल कदाचित आता पश्चात्तापही होतही असेल.

महाभारतकालीन अप्रसिद्ध पराक्रमी योद्धा बार्बरिक

विशेष – भालचंद्र ठोंबरे

महाभारतात कौरव-पांडवांदरम्यान झालेल्या महायुद्धात विविध प्रकारच्या भयंकर विध्वंसक अस्त्र-शस्त्रांचा वापर दोन्ही बाजूंकडून करण्यात आला. अठरा दिवस चालू असलेल्या, या युद्धात १८ औक्षणीय सैन्याचा मृत्यू झाला. मात्र कौरव, पांडवांच्या सर्व सैन्याचा नाश करून, हे युद्ध काही क्षणात संपविण्याची क्षमता त्यावेळी एका योद्ध्याकडे होती. त्या योध्याचे नाव होते बार्बरिक.

बार्बरिक हा भीमाचा नातू व घटोत्कच व राजकन्या मौर्वी यांचा मुलगा. त्याने माता दुर्गाची भक्ती करून तिला प्रसन्न केले होते. माता दुर्गाने त्याला तीन बाण दिले होते. म्हणून त्याला ‘तीन बाणधारी’ असेही म्हणतात. हे बाण लक्षाचा वेध घेऊन, ते बार्बरिककडे परत येत असत. तसेच अग्नीने त्याला धनुष्य दिले होते. कौरव, पांडवांमध्ये होणार असलेल्या युद्धाची माहिती कळताच, बार्बरिकही युद्धात सहभागी होण्यासाठी आपल्या घोड्यावर स्वार होऊन निघाला. हरणाऱ्या पक्षाकडून लढण्याची त्याची प्रतिज्ञा होती. युद्धासाठी निघताना आईने त्याला त्याच्या वचनाची परत आठवण करून दिली.

भगवान श्रीकृष्णाला हे कळताच, ते ब्राह्मण रूपात बार्बरिकला वाटेत भेटले. केवळ तीन बाणांच्या साहाय्याने युद्धात भाग घेण्याची इच्छा ठेवणाऱ्या बार्बरिकवर अविश्वास दाखवित त्यांनी त्याचा उपहास केला. तेव्हा युद्ध संपविण्यास केवळ एकच बाण पुरेसा असल्याचे बार्बरिकने आत्मविश्वासपूर्णरीत्या सांगितले. तेव्हा परीक्षा म्हणून श्रीकृष्णाने शेजारीच असलेल्या झाडाच्या सर्व पानांना एकाच बाणाने छेदन करण्यास बार्बरिकला सांगितले. बार्बरिकने भात्यातून एक तीर काढून, धनुष्याला लावून वेध घेवून सोडला. बाण सर्व पानांना छिद्र करून श्रीकृष्णाच्या पायाशी फिरू लागला. ते पाहून बार्बरिक श्रीकृष्णाला म्हणाला की, “ब्राह्मणदेवता आपला पाय दूर करा. मी केवळ पानालाच छेदन करण्याची आज्ञा केली आहे.”

श्रीकृष्णाने पाय दूर करताच, बाण त्याच्या पायाखाली असलेल्या पानाला छेदून बार्बरिककडे परत गेला. बार्बरिकचे हे कौशल्य पाहून, त्यांनी ‘तू कोणाच्या बाजूने युद्धात भाग घेणार आहेस’ असे विचारले. ज्याची बाजू कमजोर असेल किंवा ज्याची हारण्याची शक्यता निर्माण होईल, त्याच्याकडून लढण्याची आपली प्रतिज्ञा असल्याचे बार्बरिकने सांगितले.
बार्बरिकचे कौशल्य व त्याची प्रतिज्ञा ऐकून श्रीकृष्ण विचारात पडले. कारण कौरवांची बाजू अधर्माची असून, ते हारणार हे निश्चित होते. अशा वेळेस बार्बरिकची उपस्थिती अडथळ्याची ठरू शकते, हे लक्षात घेऊन, त्यांनी बार्बरिककडे दान देण्याची विनंती केली. माझ्या क्षमतेत असेल तर जरूर देईन, असे वचन देत, बार्बरिकने ती मान्य केली. कृष्णाने त्याला त्याचे मस्तक देण्याची विनंती केली.

ब्राह्मण अशा रीतीचे दान मागत नाही, हे ज्ञात असल्याने आश्चर्यचकित झालेल्या, पण वचनबद्ध असलेल्या बार्बरिकने ती मान्य करीत, ब्राह्मणाला आपले मूळ रूप दाखविण्याची विनंती केली. कृष्ण आपल्या मूळ रूपात प्रगट झाले. बार्बरिकने श्रीकृष्णाला नमन करीत, विराट रूप दाखविण्याची विनंती केली, तसेच महायुद्ध शेवटपर्यंत पाहण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने त्याला विराट रूप दाखविले, बार्बरिकने शिश दान केले, कृष्णाने त्यावर अमृत सिंचन करून, ते युद्धभूमीजवळ असणाऱ्या टेकडीवर त्याचे कटलेले शीर स्थापित केले. अशा प्रकारे महायुद्ध एक क्षणात संपविण्याची क्षमता असलेला हा अप्रसिद्ध पराक्रमी योद्धा महायुद्धाचा केवळ एक प्रेक्षक झाला. भगवान श्रीकृष्ण बार्बरिकच्या बलिदानाने खूप प्रसन्न झाले, त्यांनी बार्बरिकला कलियुगात शाम नावाने ख्यातनाम होण्याचा वर दिला. बार्बरिकचे शीर राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू नगर या गावी पुरण्यात आले. याच ठिकाणी त्याचे मंदिरही खाटू शाम नावाने प्रसिद्ध आहे.

हिमालयीन सौंदर्य – मोनाल

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

एक प्राचीन पर्वत शृंखला अध्यात्म आणि शास्त्र यांचा संगम असणारा, सौंदर्याने परिपूर्ण असा हा आपला हिमालय. हिमालयात अनेक विविध प्रकारचे पक्षी, स्थलांतरित पक्षी, प्राणी, कीटक अनेक वनस्पती आणि खनिजे दिसतात. तपकिरी ठिपकेदार लहान कबूतर, रेड व्हेटेड बुलबुल, मैना, चिमण्या, बुलबुल, पॅराडाईज फ्लाय कॅचर, गोल्डन ओरिओल्स, पर्पल सनबर्डस, घुबड, बार्ण स्वैलो, ब्लॅक थ्रोटेड टी, निळ्या गळ्याचा बार्बेट, ब्ल्यू व्हिसलिंग थ्रश, ग्रे हिमालयान ट्रीपी, हुपो, हुदहुद असे अनेक पक्षी दिसून येतात.

खरंतर सगळेच पक्षी खूप सुंदर असतात. त्यांच्या त्यांच्या परीने प्रत्येकात सौंदर्य ओतंप्रोत भरलेल असतं तरीही सर्वात सुंदर असा पक्षी म्हणजे “हिमालयान मोनाल”. या सुंदर चमचमत्या पक्ष्यामुळे हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्यात अजून भर पडलेली आहे. मोरासारखा सौंदर्याने परिपूर्ण, फक्त मोरासारखा पिसारा नसलेला, तसेच रेशमी सौंदर्य घेऊन आलेला चमकदार पंखांचा ज्या पंखांमध्ये रंगांची सरमिसळ असणारा, डोळ्यांना विविध छटायुक्त रंगांचा आभास निर्माण करणारा, असा हा मोनाल. अतिशय शांत आणि सुंदर. हिमालयीन मोनालचे वैज्ञानिक नाव “लेडी मेरी इम्पे” आहे. ज्याचे नाव बंगालचे ब्रिटिश सरन्यायाधीश सर एलीजा इम्पे यांच्या पत्नीच्या नावावरून ठेवण्यात आले. हा थोडा मोरासारखा दिसत असल्यामुळेच याला “मोनाल” असे म्हणतात. हिमालयातील मोनालला नेपाळमध्ये “डॉंफे” म्हणतात.

हा उत्तराखंडचा “राज्यपक्षी” आहे. हा नेपाळचा सुद्धा “राष्ट्रीय पक्षी” आहे. भारताशिवाय अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान येथे सुद्धा आढळतो. हे तितर पक्ष्याच्या परिवारातील पक्षी आहेत. मोरापेक्षा हा थोडासा लहान आहे. जेमतेम २४० ग्रॅम वजनाचा. या पक्ष्याला थंड हवामान आवडते. मोनालला जंगलात रहायला आवडते. जेव्हा उष्णता असते तेव्हा हे पक्षी गवताळ प्रदेशात फिरताना आढळतात. कारण तेथे थंडावा असतो.

मादी आणि नर हे पूर्णतः दिसायला वेगळे असतात. नर हा पूर्णपणे मोरासारखा तर मादी पूर्णपणे तपकिरी रंगाची असते. डोक्यावर तुरा, राखाडी चोच, काळे डोळे आणि त्याच्याभोवती निळसर कातडीचा पानासारखा आकार, हिरवट चेहरा, मानेवर लालसर तांबूस पंख, त्याच्याखाली पिवळसर पंख, मग पाठीवर हिरव्या पंखापुढे निळसर आकाशी छटा असणारे पंख. यांच्या डोक्यावरील तुरा मोरांसारखाच असतो. तो पानांसारख्या आकाराचा असून निळा-आकाशी असा जलनिळसर छटेचा असतो आणि सतत मानेच्या हालचालीमुळे हलत असतो. गळा आणि छातीकडच्या काळपट भागात काळपट पंख.

पूर्ण शरीर काळपट आणि तांब्यासारखे शेपूट, पिवळसर पाय असा एकूण हा सौंदर्यवंत नर दिसत असतो. त्याच्या शरीराची लांबी ६० ते ७२ सेंटिमीटर असते. वजन एक ते दीड किलो असते. मादी पूर्णपणे तपकिरी काळी आणि पांढरी या रंगाच्या मिश्रणाची असते. राखाडी चोच, काळा डोळा, त्याभोवती निळसर पानाच्या आकाराची त्वचा, डोक्यावर टोकेरी पिसांचा हलकासा मुकुट जो आडवा असतो, बाकी चेहऱ्यावर तपकिरी रंगाची पिसं, गळ्याकडे पांढरी पिस आणि त्याखाली तपकिरी काळी पांढरी टोकेरी पिसं. पूर्ण शरीरावरील पिस गोलाकार दिसत असली तरी एक विशिष्ट प्रकारचा टोकदारपणा त्याला असतो आणि त्यावर तपकिरी काळ्या रंगाची लयदार पोतरचना असते. शेपटीमध्ये लांबट गोल आकाराची मोठी पिसे ज्यावर तपकिरी काळया रंगाच्या नागमोडी रेषा असतात आणि पांढरट किनार असते. पाय पिवळसरच असतात.

हे पक्षी दिवसातला जास्तीत जास्त वेळ चालण्यांमध्येच घालवतात. यांचा आहार सर्व प्रकारचा आणि ऋतुमानानुसार असतो. यांचा आवाज हा शिट्टी सारखा असतो. हे कधी एकटे तर कधी जोडीने दिसतात. मादीसाठी नर दोन्ही पंख आणि शेपटीचा पिसारा फुलवून उड्या मारत अतिशय सुंदर नृत्य करतो. एप्रिल ते ऑगस्टपर्यंत प्रजनन काळ असतो. हे दोन ते पाच अंडी देतात. यांची पांढरी अंडी असून त्यावर भुरकट तपकिरी डाग असतात. जवळजवळ २७ दिवसांपर्यंत ही अंडी घरट्यात असतात. सहा महिन्यापर्यंत ही पिल्ल त्यांच्या पालकांबरोबर राहतात. हे पक्षी आपल्या परिसराचे संरक्षण करतात.

मी बनवलेल्या हिमालयान मोनालच्या कलाकृतीत मोनाल पक्ष्याचे एक कुटुंब दाखवले आहे. जेव्हा मी हिमालयन मोनालची कलाकृती करत होते तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, कितीही प्रयत्न केले तरी पक्षांच्या रंगांसारखे आपल्याला रंग बनवता येत नाही. आपण निसर्गाची कितीही प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला तरी आपण ती करू शकत नाही. आणि मुळात चमकदार पक्ष्यांचे पंख हे सतत रंगछटा बदलत असतात. जरी कितीही चमकते रंग वापरून चित्र काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या रंगछटा आपल्याला बनवता येतच नाही. फार फार तर आपण त्याच्या आसपास पोहोचू शकतो.

नैसर्गिक असंतुलनामुळे हिमालयातील बर्फवृष्टी होण्यामध्येसुद्धा अनेक बदल होत आहेत. नुकतेच नैनीतालमध्ये सृष्टी शत्रूंनी जंगल जाळलेली आहेत कारण एकच मानवी स्वार्थ. अनेक सणांमध्ये मुकुट सजवण्यासाठी मोनाल पक्ष्यांच्या पंखांचा वापर केला जात आहे. तो जास्त उडत नाही म्हणून त्याची खूप शिकार केली जाते. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. त्यामुळे या सर्व पक्ष्यांची संख्या सुद्धा खूप कमी झाली होती. आता हाच पक्षी राष्ट्रीय पक्षी झाल्यापासून त्याचे संरक्षण होत असल्यामुळे याची संख्या वाढत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सगळीकडे वृक्षतोड होते. पावसाळ्याच्या दरम्यानच आपली घरटी सर्व पक्षी झाडांवर बांधतात आणि नेमकं त्याच वेळेस सगळीकडे वृक्षतोड होत असते. कारण त्या वाढलेल्या वृक्षांचा त्रास मानवाला खूपच होत असतो. हो की नाही? या वाढलेल्या वृक्षांमुळे त्यांना वाहतुकीमध्ये त्रास होतो, इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होतो, रस्त्यांवरून जाता येताना लोकांना त्रास होतो. मग आता ही झाडं तर कापलीच पाहिजेत; परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा निवारा-घर-घरटी आपण उद्ध्वस्त करत आहोत याची त्यांना किंचितही जाणीव होत नाही. मग या पक्ष्यांनी कीटकांनी जायचं कुठे? त्यांचं घरकुल शोधायचं कुठे? तुम्हाला शहरात पक्षी हवे आहेत पण त्यांना अन्न आणि निवारा हे दोन्ही तुम्हाला द्यायचं नाही. मग पक्षी काय आकाशात उडतच राहणार का? तुम्हाला काय अधिकार आहे हो दुसऱ्याच घरकुल उद्ध्वस्त करण्याचा? स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या मानवाने एवढी तरी स्वतःची बुद्धी भ्रष्ट करू नये.

पावसाळ्यात होणारी वृक्षतोड ही कुठेतरी थांबलीच पाहिजे. आपले वास्तव्य वाढवण्यासाठी आपण जंगलात प्रवेश करत आहोत. तुम्हाला दुसऱ्यांचे सुखी संसार, दुसऱ्यांच सुखी आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा काय अधिकार काय आहे तुम्हाला आणि ही नियमावली कोण काढत आहे? आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आता या वृक्षांवर टाकलेल्या लाईटच्या माळा काढण्याचे औदार्य कोणी दाखवेल का? एक गोष्ट अजूनही लक्षात येत नाही माझ्या की, मानव एवढा सृष्टी सौंदर्य शत्रू का झाला? चंद्रावर मंगळावर पोहोचणाऱ्या आणि अनेक शोध लावणाऱ्या या विद्वान मानवाला सृष्टीचेच नियम फक्त समजत नाहीत. जर ते समजून घेतले तर या सृष्टीचे सौंदर्य आणि संवर्धन मानव नक्कीच योग्यरीत्या करू शकतो.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Crime : पतपेढीकडून ग्राहकांची फसवणूक

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

आधुनिकरण जसजसं होत गेलं, तसतसं काळाबरोबर काही गोष्टी बदलतही गेल्या. काही वर्षांपूर्वी नेमक्या बँका अस्तित्वात होत्या. पण आता बघाल, तिथे वेगवेगळ्या नवीन बँका आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बँका गरजू लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. या बँकांसोबत अस्तित्वात आली, ती पतसंस्था. काही लोकांनी एकत्र येऊन, या पतसंस्था चालवायला घेतल्या आहेत. या पतसंस्था रजिस्टर केलेल्या असतात. गरजू लोकांना ते कर्ज देतात आणि त्यावर व्याजही घेतात.

रमेशला पैशांची गरज होती म्हणून त्याने आपल्या ओळखीतच असलेल्या पतसंस्थेकडे कागदपत्रे दाखवून, घरावर मॉर्गेज लोन करून घेतलं. त्याला दहा लाखांचं लोन मिळालं आणि महिन्याला एक विशिष्ट रक्कम व्याज म्हणून आकारली गेली. त्यात काही रक्कम मुद्दल व काही व्याज अशा प्रकारची ती रक्कम आकारली गेलेली होती. रमेश आपले हप्ते पतपेढीला वेळच्या वेळी भरत होता.

कर्जाचे हप्ते भरत असल्यामुळे, पतसंस्थेकडून त्याला टॉप-अप लोनची ऑफर आली. ती १५ लाखांची होती. पतसंस्थेतल्या अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारे विनंती करून, त्याला टॉप-अप लोन घ्यायला भाग पाडलं आणि ते घेतल्यानंतर त्या १५ लाखांमधील चार लाख बँकेने घेऊन, त्याच्या हातात फक्त ११ लाख रुपये दिले आणि कालांतराने लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्याचे चार हप्ते थकीत राहिले. तसं त्याने जाऊन पतसंस्थेला कळवलं आणि व्यवस्थित झाल्यानंतर मी व्यवस्थित हप्ते भरेल, असंही त्याने पतसंस्थेला लिहून दिलं. लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर, त्याने आपली व्याजाची रक्कम भरायला सुरुवात केली, तरीही त्याला पतसंस्थेकडून नोटीस आली की, तुम्ही व्याजाचे पैसे भरत नाही. त्यामुळे त्याने परत पतसंस्थेकडे जाऊन चौकशी केली. असता असे निदर्शनात आले की, त्याने जी रक्कम भरली होती, त्याची नोंद पतसंस्थेमध्ये केली जात नव्हती. त्यांनी कसून चौकशी केली, तर त्याला सांगण्यात आलं की, “तुमची ही रक्कम कापलेली आहे.” त्यांना अनेक कारणे देण्यात आली आणि त्यातली थोडीच रक्कम व्याज म्हणून त्यांनी घेतली होती.

ही गोष्ट झाल्यानंतर त्याला घर सील करण्याची नोटीस गेली. त्यावेळी त्याने पुन्हा पतसंस्थेकडे जाऊन काही रक्कम भरतो, असे सांगून काही दिवसांनी चार लाख रुपये भरले. रमेश हा पतसंस्थेकडे रक्कम भरत होता. त्याच्याकडे रेकॉर्ड असायचं, पण पतसंस्था मात्र स्वतःकडे रेकॉर्ड ठेवत नव्हती. काही दिवसांनी पतसंस्थेकडून ‘१३८’अंतर्गत कोर्टाकडून रमेशला नोटीस आली, चेक बाऊन्सबद्दल! आता हे चेक नेमके कोणते? तर ज्यावेळी रमेशला पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कन्व्हिन्स करून, टॉप-अप लोन घेण्यास भाग पाडले होते, त्यावेळी पतसंस्थेच्या नियमानुसार दोन चेक कर्जदात्याला बँकेला द्यावे लागतात, ते चेक रमेशने त्यावेळी दिलेले होते. ते चेक रमेशला न सांगता, पतसंस्थेने बँकेत वटवण्यासाठी टाकले होते. जे टॉप-अप लोन घेण्यासाठी सिक्युरिटी चेक म्हणून ठेवलेले होते. पहिले १० लाख आणि नंतरचे १५ लाख. त्या १५ लाखांतलेही १५ लाख बँकेने घेतले. म्हणजे एकूण २५ लाखांचं कर्ज! त्यातूनही रमेशच्या हातामध्ये २१ लाखच मिळालेले होते.

त्याची एकूण रक्कम पतसंस्थेने कोर्टामध्ये ४५ लाख व्याजासकट करून दिलेली होती. म्हणजे पतसंस्थेकडून त्याने २५ लाख घेतले होते, त्यातील त्याच्या हातात २१ लाखच मिळाले होते आणि ते आज त्याला ४५ लाखांपर्यंत पतसंस्था घेऊन गेली होती. त्याने पतसंस्थेकडे जे व्याज भरलेलं होते, त्याची नोंद रमेशकडे होती. पण पतसंस्थेच्या रेकॉर्डमध्ये अधिकाऱ्याने ती ठेवली नव्हती. त्याचा भुर्दंड मात्र रमेशला भरावा लागणार होता. पतसंस्था आपल्या ग्राहकांना नोंदी न ठेवता, कशा प्रकारे फसवतात हे या प्रकरणामधून दिसून येते. त्या फसवणुकीमुळे आज रमेशच्या घराला सील लावण्याची पाळी आलेली आहे. त्याच्यावर कोर्टात पतसंस्थेने ‘१३८’अंतर्गत केस दाखल केली आहे.

त्याचा फक्त एवढाच गुन्हा होता की, लॉकडाऊनमध्ये त्याचे हप्ते थकले होते. पुन्हा त्याने ते सुरू केलेले होते आणि थकीत हप्त्यांबद्दल त्याने पतसंस्थेला तसे पत्रही दिले होते. पण रमेशने व्याज भरल्याच्या नोंदी पथसंस्थेने ठेवल्या नव्हत्या. ज्यामुळे एक ग्राहक म्हणून त्याची आर्थिकसोबतच मानसिक फसवणूकसुद्धा झाली होती.

(सत्यघटनेवर आधारित)

रात्रीस खेळ चाले…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

तुला निशा म्हणावे की रजनी…
तुझ्या नावातच नशा आहे रात्रीची…
सांजवेळी गुलाबी आसमंताच बोट धरून तू अलगद उतरते… मग सांज हलकेच तुझा हात सोडते तुझ्याही नकळत… अन् सर्वदूर तुझं साम्राज्य पसरतं… काळंभोर!
अंधाराची काळी शाल पांघरून, जणू तू सगळ्या जगाला कवेत घेतेस, थकले भागले जीव तुझ्या कुशीत झोपेच्या अधीन होतात!

तुझं सजणं म्हणजे रोजचा नशीला उत्सवच म्हणायचा, चंद्राच्या साक्षीने तुझ्या तारुण्याला उधाण येतं… चांदण्याची साडी नेसून तुझं नटणं थटणं…
पौर्णिमेला तुझं प्रकाशमान रूप… म्हणजे… टिपूर चांदण्यात इष्काचा उत्सव मनवणं… अप्रतिम! रातराणीच्या सुगंधात तुझं नहाणं… त्यात तुझं बहरून जाणं… मोगऱ्यालाही तुझ्या मिठीचा मोह आवरत नाही… तुझ्या आवेगाने मोहरून जातो तो, फुलत जातो अलवार… पाकळी पाकळी उमलत जाते सुगंध उधळत… पहाटेपर्यंत… गंधाळून टाकतो आसमंत… रातराणी अन् मोगऱ्याचा सुगंधी प्रणय दरवळत राहतो… चांदण्याच्या लख्ख प्रकाशात!

निशा…
तू म्हणजे प्रणयाची सम्राज्ञी…
लख लख चांदण्या म्हणजे तुझं चमचमणारं ऐश्वर्य… अशी चांदरात लेवून तुझं मिरवणं!!
क्षितिजावर… पैलतीरी सूर्यास्त होता-होता ऐलतीरावर लयीत होणारी सागराची गाज… आवेशाने तुला मिठीत घेण्यासाठी उंच लाटांचा जल्लोष! किनाऱ्यापासून दूर झाडांवर काजव्यांची आरास बघणं… आकाशातून जणू चांदणचुरा उधळला आहे… सुंदर… निशा, फक्त तुझ्यामुळेच शक्य होतं!
मुसळधार पावसात सरी अंगावर झेलत तुझं चिंब भिजणं… रातकीड्यांच्या गाण्यांची साथ… मधेच विजांचं चमकणं… त्या उजेडात लखकन तुझं रूप क्षणभराकरता नजरेस पडतं!

रजनी…
कधी प्रेमळ वाटतं तुझं हे रूप… एकदम रोमँटिक!! तर कधी उदासही करून जातं… तुझ्या काळ्याशार कायेला मोत्याच्या लडीनी सजवणं… असा हा झिम्माड पाऊस… कधी इष्काचा बहर असतो! कधी शांततेचा कहर असतो! गुलाबी थंडीतलं तुझं आगमन किती सुखावणारं… मऊशार उबदार दुलईत गुरफटून स्वप्नात रमणे तुझ्यामुळेच रजनी… पहाटेच तुझं मोहक रूप पाहून दवबिंदू सुद्धा सावरून बसतं… डोलणाऱ्या पानांवर… अन् हिऱ्यासारखं चमकतं!!
प्राजक्ताच्या फुलांचा सडा खुलून दिसतो, तुझ्या पार्श्वभूमीवर केशरी देठासह… निशिगंधाचीही मान ताठ होते तुला भेटून… चाफासुद्धा खेटून बसतो एकमेकांना… गुच्छागुच्छाने…

अशा सुवासाने गंधाळलेल्या सृष्टीमध्ये तुझा मुक्त संचार, वातावरणातील धुंदी आणखीनच वाढवतो! दिवाळीच्या अवसेला देखील पणत्यांच्या प्रकाशात तुझं लखलखणं डोळे दीपावणारं. नयनरम्य नेत्रसुख! कधी-कधी सूर्यसुद्धा वेळेत उगवणं विसरतो, हा रात्रीचा खेळ बघण्यात… पहाटेला तोही एखाद्या ढगाआड लपून, तुझं हे देखणं रूप नजरेत साठवू बघतो… मग हळुवार केशरी रंग अवकाश भरून टाकतो अन् ही नटखट सुंदरी निशा… सृष्टीला सूर्याच्या स्वाधीन करून निसटते… पुन्हा… सूर्यास्तानंतर सृष्टीला कुशीत घेण्यास अवतरण्यासाठी!!!