३५ क्रीडापटूंची अर्जुनसाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीने ११ खेलरत्न पुरस्कारांसह ३५ अर्जुन पुरस्कारांसाठी क्रीडापटूंची शिफारस केली. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमुळे यंदा क्रीडा पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे यंदा पुरस्कारांना उशीर झाला आहे.

देशात १९६१मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरु खेलरत्नसाठी एकाच वेळी इतक्या खेळाडूंची शिफारस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी ५ खेळाडूंना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती.

खेलरत्न हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या देशातील विविध भागातील खेळाडूंना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (आयओए) आणि स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियाकडून (साइ) खेळाडूंच्या नावाची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात. ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराची सुरुवात १९९१ मध्ये आली. हा पुरस्कार आधी राजीव गांधींच्या नावाने ओळखला जायचा. या वर्षी त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार ठेवण्यात आलं आहे. त्या आधी अर्जुन पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जात होता.

महापालिका, नगर परिषदांच्या सदस्यसंख्येत १७ टक्क्यांनी वाढ

मुंबई – राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकासयोजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निर्धारित आहे. कोवीड-१९च्या प्रार्दुभावामुळे २०२१च्या जनगणनेस आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरून महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महानगरपालिकांमध्ये ३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ७६ व अधिकत्तम संख्या ९६पेक्षा अधिक नसेल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व अधिकत्तम संख्या १२६पेक्षा अधिक नसेल. १२ लाखांपेक्षा अधिक व १४ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व अधिकत्तम संख्या १५६पेक्षा अधिक नसेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकत्तम संख्या १६८पेक्षा अधिक नसेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकत्तम संख्या १८५पेक्षा अधिक नसेल.

येत्या जानेवारीपर्यंत मुंबईत लसीकरण होणार पूर्ण

मुंबई : गेले नऊ महिने मुंबईत लसीकरण मोहीम सुरू असून ९७ टक्के नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. येत्या दिवाळी पर्यंत मुंबईमधील १०० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण होईल. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात १०० टक्के नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ३९ लाख २६ हजार ९६८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ८७ लाख ६० लाख ६० लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५१ लाख ६६ हजार ९०८ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत कोव्हीशिल्डचे १ कोटी २५ लाख ३४ हजार २६४, कोवॅक्सिंनचे १३ लाख ३९ हजार ३०२, स्फुटनिक व्हीचे ५३ हजार ४०२ डोस देण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

नीरजसह ११ खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्योऑलिम्पिकमधील भालाफेकमध्ये सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह एकूण ११ क्रीडापटूंची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (२०२१) शिफारस करण्यात आली आहे. एकाच वेळी ११ खेळाडूंची शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नीरजसह इतर टोक्योतील ४ पदकविजेत्या खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस झाली आहे तर टोक्यो पॅरालिम्पिकमधील अनेक विजेत्यांपैकी ५ खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी तयार करण्यात आलेल्या समितीने ११ खेलरत्नांव्यतिरिक्त ३५ अर्जुन पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस केली.नीरज व्यतिरिक्त टोक्योऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये चमकलेल्या इतर काही खेळाडू, महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचीही देशाच्या सर्वोच्च नागरी क्रीडा सन्मानासाठी शिफारस झाली आहे.

खेलरत्न पुरस्कार शिफारस केलेल्यांमध्ये नीरज चोप्रा व्यतिरिक्त मिताली राज, सुनील छेत्री, कुस्तीपटू रवी दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकी संघाचा गोलकीपर पी.आर. श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, भालाफेकपटू सुमित अंतिल, नेमबाज अवनी लेखरा, बॅडमिंटनपटू एम. कृष्णा नागर आणि नेमबाज एम. नारवाल यांचा समावेश आहे. याचबरोबर शिखर धवनसह ३५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेतील बांगलादेशची वाट बिकट

अबुधाबी (वृत्तसंस्था) : फॉर्मात असलेल्या इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट आणि ३५ चेंडू राखून विजय मिळवत आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर-१२ फेरीमध्ये सलग दुसरा नोंदवला. दुसरीकडे, सलग दुसऱ्या पराभवामुळे बांगलादेशचा पुढील प्रवास बिकट झाला आहे.

बांगलादेशचे १२५ धावांचे आव्हान इंग्लंडने २ विकेटच्या बदल्यात १४.१ षटकांत पार केले. त्यात सलामीवीर जेसन रॉयचे मोठे योगदान राहिले. त्याने ३८ चेंडूंत ६१ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रॉयने वैयक्तिक खेळ उंचावताना जोस बटलरसह (१८ चेंडूंत १९ धावा) सलामीसाठी ३९ धावा जोडल्या. त्यानंतर डॅविन मालनसह (२५ चेंडूंत नाबाद २८ धावा) दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडताना विजयाचे सोपस्कार पार पाडले.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणऱ्या बांगलादेशला २० षटकांत ९ बाद १२४ धावांमध्ये रोखण्यात इंग्लंडला यश आले. त्यांच्याकडून मुशफिकुर रहिमने सर्वाधिक २९ धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने तीन विकेट घेत प्रभाव पाडला. त्याला ऑफस्पिनर मोईन अली तसेच लियाम लिव्हिंगस्टोनची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली.

बांगलादेशला तिसऱ्या षटकात दोन धक्के बसले. मोइन अलीच्या सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद झाले. लिटन दास आणि मोहम्मद नइम बाद झाल्याने संघावर दडपण आलं. लिटनने ८ चेंडूंत ९ तर मोहम्मद नइमने ७ चेंडूंत धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला शाकीब अल हसनही तग धरू शकला नाही. ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर अदिल राशीदने त्याचा झेल घेतला.

संघाची अवस्था बिकट असताना मुशफिकुर आणि महमुद्दुल्लाह यांनी डाव सावरला. मात्र दोघांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. मुशफिकुर रहिम २९ धावांवर असताना लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतर लगेचच होसैन ५ धावा करून तंबूत परतला. महमुद्दुल्ला १९, नुरुल हसन १६, महेदी हसन ११, मुस्तफिझुर रहमान ० धावा करून बाद झाले.

शासनाकडून दिवाळी सुट्टीचा घोळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगेवगळे कालावधी जाहीर झाले असून त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र गोंधळात पडले आहेत.

दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर,पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुट्टीची सूचना देण्यात आली आहे. या सुट्टीमुळेच ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत.

मात्र, राजेंद्र पवार, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीने बुधवारी काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मूळगावी जाण्यासाठी केलेले नियोजनही बिघडणार आहे.

शिक्षक भारती संघटनेने शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पत्राद्वारे दिवाळी सुट्टीचा कालावधी ऐनवेळी न बदलता पूर्ववत ठेवावा, अशी मागणी केली आहे. शिक्षण विभागातील अधिकारी १ ते २० नोव्हेंबर असा सुट्टीचा कालावधी जाहीर करतात आणि ऐनवेळी मंत्रालयातून सुट्टी कालावधीत बदल केला जातो. हा काय प्रकार आहे? या प्रकरणाने पुन्हा एकदा शिक्षण विभागातील सावळागोंधळ समोर आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केल्यानुसार राज्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मूळगावी/परगावी जाण्याचे आरक्षण केले आहे. ऐनवेळी सुट्टी कालावधीत बदल केल्यास सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागेल. शिक्षक भारती संघटनेने दिवाळीची सुट्टी पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.

उल्हासनगरच्या नामांकित गोल मैदानाची दुरवस्था

सोनू शिंदे

उल्हासनगर : उल्हासनगरमधील नामांकित गोल मैदानाची दुरवस्था झाल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना दिवाळीत खेळ खेळायचा कुठे? असा प्रश्न करत क्रीडा सभापती गीता साधनानी आणि समाजसेवक मनोज साधनानी यांनी थेट आयुक्त राजा दयानिधी यांना लक्ष्य केले आहे.

उल्हासनगर कॅम्प दोन परिसरात हे गोलमैदान आहे. ह्या गोलमैदानच्या छोटासा भाग हा मैदानी खेळ खेळण्यासाठी होता. मात्र हे मैदान रस्त्यापासून २ फूट खड्ड्यात असल्यामुळे मैदानात पावसाचे पाणी भरते. त्यामुळे चिखल होतो. या चिखलामुळे मैदानात मोठमोठे खड्डे पडतात. ह्या खड्ड्यांमध्ये डेब्रिज भरून हे खड्डे भरले जातात, यामुळे मैदानाची अवस्था आणखीच बिकट होते.

डेब्रिजच्या कचऱ्यात क्रिकेट खेळायचे कसे, असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे. सभापती साधनानी यांनी गोल मैदानाचा कायापालट करण्यासाठी आयुक्तांकडे मागणी केली होती. त्याला आयुक्त राजा दयानिधी यांनी मान्यता दिल्यानंतर २ कोटी ८५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र हे काम शेवटच्या टप्प्यात असताना आयुक्तांच्या एका सहीसाठी निविदा प्रक्रिया रखडली असल्याचे समाजसेवक मनोज साधनानी यांनी सांगितले.

परिसरात हे एकमेव मैदान असल्याने मैदानाचे तत्काळ काम सुरू करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असेही साधनानी म्हणाले. या कामात स्टेजचे सुंदरीकरण, क्रिकेट पिच, मिनी स्टेडियम, हाय मास्क लाईट्स, जॉगिंग ट्रक, प्रवेशद्वार सुंदरीकरण या कामाचा समावेश असल्याचे साधनानी यांनी सांगितले.

पेगॅसस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलच्या एनएसओ कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून भारतात अनेकांवर हेरगिरी केल्याच्या आरोपांवरील याचिकांची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा निर्णय घेतला. आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे.

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. हीच समिती या प्रकरणाचे सत्य समोर आणेल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ पेगॅससप्रकरणी ३ वेगळ्या खटल्यांची सुनावणी करत आहे. या सुनावणीत न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारची हेरगिरी करण्यास परवानगी देता येणार नाही, असेही स्पष्ट केले.

नवी मुंबईत वृक्ष छाटणीची अत्याधुनिक वाहने ठरणार बहुपयोगी

नवी मुंबई (प्रतिनिधी) : मनपा वाहन विभागाने उद्यान विभागाच्या ताफ्यात अडीच कोटी खर्च करून २३ मीटरपर्यंत वाढणाऱ्या वृक्षांची छाटणी योग्य प्रकारे करता येईल, अशी चार वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचा दुसरा मोठा फायदा म्हणजे दुर्दैवाने एखादी आगीसारखी घटना घडली, तर आगीवर नियंत्रणही आणता येऊ शकते. तसेच आगीच्या तडाक्यात सापडलेल्या सहाव्या माळ्यापर्यंत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना वाचविण्यात यश देखील येऊ शकते.

नवी मुंबई महानगरपालिका पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वृक्षांच्या झालेल्या वाढीमुळे उपलब्ध असणाऱ्या वाहनाद्वारे छाटणी करण्यास प्रतिबंध येत होते. त्यामुळे वृक्षांची वाढ जोरदारपणे होत होती; परंतु वादलासारख्या परिस्थितीमध्ये उंच वाढलेले वृक्ष कोलमडून वनराईचा ऱ्हास होत होता.

आधुनिक शहराचा मान मिळालेल्या नवी मुंबई मनपाच्या उद्यान विभागात पावसाळापूर्व वृक्ष छाटणीसाठी तीन वाहने होती. या वाहनांची क्षमता १३ मीटरपर्यंत वाढणाऱ्या वृक्षांची छाटणीसाठी करता येत होती; परंतु त्यापेक्षा वाढलेली वृक्ष छाटणी करण्यास अनंत अडचणीला तोंड द्यावे लागत होते. याचा दुष्परिणाम मागील वर्षी झालेल्या निसर्ग वादळात आला होता. वृक्षांची वाढ अनियमित झाली. त्यामुळे ३ जून २०२० रोजी आलेल्या वादळामुळे शेकडो वृक्ष उन्मळून पडले. यामुळे वनराईचा फार मोठा ऱ्हास पर्यावरणप्रेमींना पाहायला मिळाला होता.

या समस्यांचा विचार करत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहन खरेदी करण्यास परवानगी दिली. त्यानंतर वाहन विभागाचे उपायुक्त मनोज महाले यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत चार अत्याधुनिक वाहने खरेदी केली. या नव्या वाहनांद्वारे २३ मीटरपर्यंत धोकादायक वाढलेल्या वृक्षांची छाटणी करता येणार आहे. त्यामुळे हे वाहनाद्वारे अरुंद जागेतही नेऊन अनियमित वाढ झालेल्या वृक्षांची छाटणी अगदी सहजरीत्या करता येणार आहे.

आधुनिक शहरात मनपाची स्थापना होऊन तीन दशके झाली. या प्रकारची वाहने आधीच खरेदी केली असती, तर निसर्ग वादळात वृक्षांची हानी झाली नसती. – दीपक काळे, पर्यावरण प्रेमी, दिघा

जिल्ह्यात कुपोषण व बालमृत्यूंमध्ये वाढ

पारस सहाणे

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात कुपोषण त्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे प्रमाण अधिकच आहे. आता पुन्हा एकदा जव्हार तालुक्यात वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या दोन गर्भवतींच्या मृत्यूने जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा गलथान आणि बेजबाबदार कारभार पुन्हा चर्चेचा आणि जिल्हावासीयांच्या संतापाचा विषय बनला आहे.

या भागातील कुपोषण, माता व बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबवल्या जातात. तथापि, असे असूनही जव्हार तालुक्यात दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका प्रकारात बाळाचा त्याच्या आईच्या पोटात मृत्यू झाल्यानंतर या मातेला वाचवण्याच्या प्रयत्नांना डॉक्टरांना अपयश आले, तर दुसरी गरोदर माता विषारी सापाच्या सर्पदंशाने मृत्यू पावली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यातील एकूण आरोग्य विभागचा कारभार किती भोंगळ आणि बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे, याची चर्चा जिल्हावासीय करत आहेत.

दोन घटनांपैकी एका घटनेत, जव्हार तालुक्यातील कायरी येथील रेखा पोटिंदा (२६) या महिलेच्या पोटात बाळाच्या हालचाली थांबल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला प्रथम साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलेला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवून नंतर तातडीने नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतरही गर्भवती महिलेच्या पोटातील बाळ मृत पावल्याचे आढळून आले. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला अॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिन कमी असण्याचा) आजार होता. तसेच, प्रसूतीपूर्वी रक्तस्राव झाल्यानेही महिलेची प्रकृती गंभीर बनल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तद्नंतर या महिलेचा व बालकाचा मृतदेह मूळगावी आणण्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहन मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली होती. अखेर खासगी शववाहिनीतून मृतदेह मूळगावी आणण्यात आला. याप्रकरणी स्थानिक रुग्णकल्याण निधीमधून वाहनाचे भाडे अदा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात पिंपळशेत (पागीपाडा) येथील २१ वर्षीय माया सुरेश चौधरी या गरोदर महिलेला विषारी साप चावला होता. तिच्यावर वेळीच उपचार होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन्ही प्रकरणांचा तपास होणार

या दोन्ही गर्भवतींचे मत्यू जव्हार तालुक्यात झाले असून गरोदर महिलांच्या मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास करून याबाबत अहवाल सादर करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.