Tuesday, April 30, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनवीन हे वर्ष सुखाचे जावो...

नवीन हे वर्ष सुखाचे जावो…

प्रत्येक दिवस नवा असतो. त्या त्या दिवशी प्रत्येक जण नव्याने सुरुवात करतो. रोजच्या नव्या दिवसाप्रमाणे नववर्षाचीही मोठी उत्सुकता असते. २०२२ वर्ष सुरू झाले आहे. नवप्रारंभ करताना गतवर्षातील गोष्टी तिथेच सोडून आणि चांगल्या गोष्टी सोबत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. २०२१मध्ये आपण सर्वांनी कोरोनारूपी महासंकटाचा समर्थपणे सामना केला. नव्या वर्षात पाऊल ठेवले तरीही धोका कायम आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा प्रवेश आणि कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. लसीकरण झालेल्यांना नव्या व्हेरिएंटचा धोका कमी असला तरी आकडेवाढीचा गुणाकार चिंताजनक आहे. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र, सर्वसामान्यांना आता लॉकडाऊन परवडणारा नाही. हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे असह्य होऊन जाते. मागील अनुभव पाहता तिघाडी सरकार पुन्हा लोकांचा रोष ओढवून घेणार नाही, अशी आशा आहे. अन्यथा यावेळी सर्वसामान्य जनता त्यांना माफ करणार नाही.

पुढील अनेक वर्षे कोरोनासोबत जगायचे, हे मान्य असले तरी राज्य सरकार किंवा प्रमुख शहरांमधील महानगर किंवा नगरपालिका कोरोना किंवा तत्सम विषाणू किंवा एखादी साथ रोखण्यासाठी किती प्रभावी उपाययोजना करते, हे महत्त्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताच ठाकरे सरकारने जम्बो कोविड उपचार केंद्रे बंद केली. त्या ठिकाणी सेवेला असलेल्या हजारो कंत्राटी कामगारांना काढून टाकले. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोविड केंद्रे सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, स्टाफ कुठून आणणार? काढून टाकलेले कंत्राटी कामगार विश्वासघातकी ठाकरे सरकारवर कसा विश्वास ठेवणार? मधल्या काळात जम्बो कोविड केंद्रांचा वापर सरकारी रुग्णालयांतील वाढती गर्दी कमी करण्यासाठी केला जाऊ शकला असता. मात्र प्रशासकीय कामांचा पुरेसा अनुभव नसलेल्या सत्ताधाऱ्यांकडून कशी अपेक्षा ठेवणार? कोरोना प्रतिबंधक उपाययोजना असल्या तरी लाट उसळल्यास सरकारच्या बेभरवशी यंत्रणेचेही तीन तेरा वाजतात. त्यामुळे कोरोना किंवा ओमायक्रॉनला रोखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. मुंबईसारख्या शहरात बेफिकीरपणे वागणाऱ्यांची मोठी संख्या आहे. मात्र बेजबाबदार वागणे तुमच्यासह तुमचे कुटुंब तसेच आजूबाजूच्या लोकांना घातक ठरू शकते, हेही लक्षात असू द्या. आरोग्याकडे लक्ष देतानाच आपल्यासमोर ध्वनी आणि आवाज प्रदूषण, कचऱ्याचे साम्राज्य, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी सरकार आणि अनेक संस्था आपापल्या पद्धतीने काम करत असल्या तरी प्रत्येक नागरिकाने शिस्त बाळगली आणि नियमांचे पालन केले तरी जागतिक समस्यांवर मात करू शकू. कोरोनातून सावरत असताना अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळांवर येण्याची आवश्यकता होती. कोरोनासारख्या जागतिक महामारामुळे अनेकांचे रोजगार गेले. उद्योगधंदे बंद पडले. या काळात केंद्र सरकारने प्रत्येक रोजंदार, हंगामी नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकाला अनेक योजनांच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा परिणाम वर्षअखेर दिसून आला. निर्यातदारांची प्रमुख संघटना असलेल्या ‘फियो’ अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निर्यातीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नववर्षात नोकऱ्यांमध्ये वाढ निश्चित आहे. आयटी-आयटीई, शिक्षण, फार्मा-हेल्थकेअर, ई-कॉमर्स, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये साडेतीन लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. कंत्राटी भरतीमध्येही १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. नवीन नवीन क्षेत्रे तयार होतील. कोरोना आणि त्यानंतरचा लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठी कठीण असला तरी कोरोनाने कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. वाईट काळात कुटुंब हे ढालीप्रमाणे आपल्या पाठीमागे ठामपणे उभे असते. प्रत्येकजण धोका पत्करतो. तरीही संकट काळी प्रत्येकाला कुटुंबाची सक्षम साथ मिळाली. या नव्या अनुभवामुळे साहजिकच कुटुंबाचे महत्त्व आणखी वाढण्यास मदत होईल. कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबे मजबुरीने एकत्र आल्याने जुने वाद मिटले. कोरोनाने शिकवले की, कुटुंबासह अधिक वेळ घालवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला कोरोना देऊन गेला. लॉकडाऊनमुळे घरातूनच काम (वर्कफ्रॉम होम) करण्याची संधी अनेकांना मिळाली. अर्थात ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांची संख्या लक्षणीय नसली तरी संबंधितांच्या कामाची व्याप्ती त्यांच्या घरच्यांना झाली. तसेच कुटुंबात राहून काम करण्याचे आव्हान अनेकांनी पेलले. प्रत्येक दिवस हा आशा-आकांक्षांनी भरलेला असतो. तो संपल्यावर पुढील दिवसाची अपेक्षा असते. प्रत्येक नववर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाचा तसाच अनुभव असतो. नवीन वर्षात नेमके काय वाढून ठेवले आहे, त्याचा केवळ अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र, वाट्याला आलेल्या प्रत्येक दिवसाचे सोने करण्याचे तुमच्या हातात आहे. त्यामुळे उद्यावर, भविष्यावर नक्की लक्ष ठेवा. मात्र, मिळालेला दिवस आनंदात घालवा. तसेच तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येकाचा दिवस आनंदी करा. एका मराठी लोकगीत अल्बममधील एका प्रसिद्ध गाण्याचा मुखडा हा वास्तव आणि भविष्याबाबत खूप काही सांगून जातो.

गेला दसरा, आली दिवाळी हसू, नाचू या हो…
नवीन हे वर्ष सुखाचे जावो…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -