Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीएमएमआरडीए प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी रणशिंग फुंकले

एमएमआरडीए प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी रणशिंग फुंकले

येत्या पंधरा दिवसात असंख्य शेतकरी हरकती नोंदवणार; वेळ आल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ – अतुल म्हात्रे

  • देवा पेरवी

पेण : पेण तालुक्यासह १२१ गावांमध्ये नव्याने एमएमआरडीए चा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यापूर्वी नैना प्रकल्प घोषित झालेल्या या गावांमध्ये येऊ घातलेला हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार असुन या प्रकल्पाला पेण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पेण येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व संकल्प ग्राम समृध्दी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

त्या अनुषंगाने या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शउन एमएमआरडीए प्रकल्पाला विरोध करून येत्या पंधरा दिवसांत या प्रकल्पाविरोधात हरकती नोंदविण्याचा एकमुखी ठराव केला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या जमिनी अबाधित ठेवण्यासाठी वेळ आल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी शासनाला दिला आहे. यावेळी सिडकोचे ९५ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, मास्टर ऑफ लंडन अतुल म्हात्रे, आयोजक महेंद्र ठाकूर, इंजिनियर डेव्हलपर शहाजी पाटील यांसह तज्ञ व्यक्ती व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेण तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक प्रकारचे प्रकल्प येत असल्याची घोषणा होऊन गेल्या. मात्र या प्रकल्पांची रीतसर माहिती किंवा संकल्पना काय आहे याचे शेतकऱ्यांना शासनाकडून हवे तसे मार्गदर्शन होत नसल्याने शेतकऱ्यांची कवडीमोलाने जागा घेऊन फसवणूक तर होणार नाही ना? या बुचकळ्यात शेतकरी पडलेले असतानाच शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी संकल्प ग्राम समृध्दी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी एमएमआरडीएचा विकास आराखडा समजुन घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले. आर्कीटेक अतुल म्हात्रे यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यानंतर काही झाले तरी आपली हक्काची जागा ही या प्रकल्पाला द्यायची नाही असा एकमुखी ठराव करून येत्या पंधरा दिवसांत सदर प्रकल्पाविरोधात हरकती नोंदविणार असल्याचा एकमुखी ठराव केला.

यावेळी पुढे बोलताना आर्कीटेक अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांची हस्तांतरित केलेली जमीन तुटपुंज्या दरात घेतली गेली. आता पुन्हा एकदा शासनामार्फत याच कंपन्या हस्तांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. लवकरच प्राथमिक स्वरूपात ग्राम पंचायत हद्दीत हरकती घेण्यासाठी मसुदा तयार करण्यात येत असून या हरकती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या लढ्याची रूपरेषा ठरवून वेळ आल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असे ही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -