Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीखड्डे बुजवण्यासाठी दगडाच्या पावडरचा सर्रास वापर

खड्डे बुजवण्यासाठी दगडाच्या पावडरचा सर्रास वापर

बोईसर (वार्ताहर) : बोईसर-तारापूर शहरातून जाणाऱ्या मुकट पंप ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे; परंतु एमआयडीसीकडून खड्डे बुजवताना कपची, खडी, ग्रिट पावडरचा वापर करून डागडुजी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे रेडिमिक्स डांबराच्या साहाय्याने बुजवण्यासाठी मुहूर्त सापडणार कधी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अर्थकारणामुळे कंत्राटदाराला तारण्याचे काम संबधित एमआयडीसी प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

बोईसर-तारापूर एमआयडीसी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांच्या जीवावर उठले आहेत. त्याची दखल एमआयडीसी प्रशासन कशाप्रकारे घेत आहे, याचे जिवंत उदाहरण सध्या पाहावयास मिळत आहे. खड्डे बुजवण्यासाठी कपची, खडी, ग्रिट पावडरचा वापर केला जात असल्याने वाहनचालकांमध्ये संताप आहे. पावसानंतर एमआयडीसीसह शहरातील सर्वच प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काँक्रिट आणि डांबरीकरणाच्या रस्त्याला गावरस्त्याचे स्वरूप आले आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोजता येणार नाहीत, इतके चार ते पाच फूट लांब व सव्वा फुटापर्यंत खोलीचे खड्डे पडले होते. त्यात काही खड्डे चक्क मोठ-मोठे दगड टाकून हे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत. रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.

तारापूर एमआयडीसीतून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ कडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या रस्त्याचे भरभक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. तथापि, शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे चक्क कचरा टाकून बुजवण्यात आल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी घसरून पडत आहेत. मात्र, त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याचेच चित्र आहे. अद्यापही शहरातील बहुतांश रस्त्यांवरील खड्डे कायम असून या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याचाही वाहनचालकांना त्रास होत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कपची, खडी, ग्रिट पावडर टाकण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे या खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ अशीच होणार आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाकडून या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी केलेला खर्च पाण्यात जाणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसानंतरही केवळ थातुरमातूर खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात आहे. मुरूम टाकून खड्डा बुजवणे, खड्ड्यात खडी टाकणे असे जुजबी उपाय एमआयडीसी बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांकडून करण्यात येतात. मात्र अशा पद्धतीने बुजवलेल्या खड्ड्यांतून रस्ता काढताना वाहनचालकांचे हाल होत असून रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने दुचाकीस्वार बेजार होत आहेत. त्यामुळे संबधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
डांबर व खडी टाकून खड्डे बुजवा

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शहरात दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनाचे छोटे-मोठे अपघात होतच असतात. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली असून ग्रिट पावडरऐवजी खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व मार्गांची दोन वर्षांत अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. लवकरच टेंडर काढून डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. – संदीप बडगे, उपअभियंता, एमआयडीसी तारापूर, बांधकाम विभाग

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -