Tuesday, May 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजEnvironment : सांगा कसं जगायचं?

Environment : सांगा कसं जगायचं?

विशेष : डॉ. श्वेता चिटणीस

वातावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी आपल्याला तीवरांमधून मिळणाऱ्या निळ्या कार्बनची अतिशय आवश्यकता आहे. वृक्षारोपण करताना तीवरांचे रोपण आवर्जून करणे गरजेचे आहे. तीवरांचे संरक्षण करून आपण हवामान बदलाचा सामना करू शकतो. तीवरांची कत्तल केल्यास त्यावर अवलंबून असणारी जैवविविधता नष्ट होते व पर्यावरणाचा समतोल ढासळतो.

‘सांगा कसं जगायचं’ असे कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता विचारते. सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा! भरगच्च गर्दीने भरलेल्या मुंबईत, घरात साप निघतात. बाथरूममध्ये पाइपमधून साप येतात, एखाद्या सोसायटीच्या आवारात साप येतो. लोक घाबरून त्याला मारहाण करतात. काही जागरूक नागरिक न घाबरता अशा वेळेस एखाद्या सर्पमित्राला बोलावतात. ते येईपर्यंत सापावर फक्त नजर ठेवतात. त्याला कोणतीही दुखापत न करता! सर्पमित्र अलगद साप पकडतात आणि त्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतात; परंतु अनेक वेळा साप विनाकारण मारले जातात. तीच कथा आहे बिबट्याची. भर वस्तीत, शहरात बिबट्या येतो. लोक घाबरून मारहाण करतात. तो प्राणी अर्धमेला होतो किंवा काही वेळा मरतो. लोक घाबरून त्याला मारतात. लोक म्हणतात, ‘असे प्राणी शहरात येतातच कसे? सरकार आमच्यासाठी काही करत नाही.’ आम्ही लाखो रुपये कर्ज काढून आलिशान, अत्याधुनिक सुखसोयी असणारे फ्लॅट विकत घेतो आणि हे असे प्राणी निघाले की, आपण गावात राहतोय की काय असे वाटू लागते. घरात लहान मुले असतात, ऑफिसमध्ये जाताना दिवसभर तणाव राहतो मनावर. बाहेर निघाल्यावर कधी एकदा घरी पोहोचतोय असे होते; परंतु ट्रॅफिक कोंडी, रस्त्यावरचे अगणित खड्डे यातून गाडी सहीसलामत काढली की जीव हुश्श करतो… परंतु पाऊस पडल्यावर ठिकठिकाणी पाणी साचते. गाडी पाण्यात बुडते की काय अशी परिस्थिती! खड्डे चुकवून गाडी चालवायची म्हणजे तारेवरची कसरत! पुन्हा घरात साप येण्याची भीती मनात फणा काढते. खड्ड्यातून गाडी किंवा मोटारसायकल चालवायची म्हणजे भर शहरात बैलगाडीत बसण्याचा अनुभव घेणे होय. सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

प्रत्येक वेळेस आमच्यासाठी सरकार काही करत नाही असे म्हणून स्वस्थ कसे बसायचे? कारण यथा राजा, तथा प्रजा हा न्याय सर्वत्र लागू होतो. प्रजेकडे जागरूकता नाही, समाजभान नाही तर सरकार कशाला लक्ष घालेल. मुळात मुंबईची तुंबई का होते? घरात साप का शिरतात? भर वस्तीत बिबटे का येतात? याची कारणमीमांसा समजून पावले उचलली, तर आपण नक्कीच गाणं म्हणत जगू शकू.

हवामान बदलामुळे अतिवृष्टी किंवा कमी पाऊस, वादळ, अति तीव्र उन्हाळा इत्यादींचा सामना करावा लागतो आहे. भौगोलिक दृष्टीने, मुळात मुंबई म्हणजे बेटांचा समूह आहे. या बेटांवर आपण समुद्रात भर टाकून विकास करतो आहोत. महाराष्ट्राला उत्तम किनारपट्टी लाभलेली आहे आणि त्या किनारपट्टीवर भरपूर खारफुटीची किंवा तीवरांची जंगले आहेत. ही तीवरांची जंगलं म्हणजे एक अत्यंत उपकारक परिसंस्था आहे. या परिसंस्थेची तुलना जमिनीवरील जंगलांशी करता येते. समुद्र आणि जमीन जिथे एकमेकांशी भेटतात, त्या क्षेत्राला समुद्रातील आंतर भरती क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रात तीवरांची झाडं भरपूर वाढतात. त्यांची मुळे जमिनीच्या खाली नसून जमिनीच्या वर आलेली दिसतात. दाट चिखल व मातीमुळे या झाडाच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा घेण्यासाठी जमिनीतून वर यावे लागते. अशी ही वर आलेली मुळे आणि झाड समुद्रातील लाटांना रोखणारी एक भिंतच असते. या तीवरांच्या भिंतीमुळे नदीचे किंवा खाडीचे किनारे यांची धूप होणे थांबते. वादळामुळे मोठ्या लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण हे खारफुटीची झाडं करतात. तसेच पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि इतर शहरी नाल्यातले पाणी यातील धोकादायक रासायनिक घटक शोषून घेऊन उत्तम प्रकारचे पाणी समुद्रात जाईल याचीसुद्धा काळजी घेतात. पावसामुळे शहरात जेव्हा पाणी साठतं, तेव्हा तीवरांची झाडं आणि तीवर असलेली जमीन हे पाणी एखाद्या स्पंजप्रमाणे शोषून घेतात. यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होत नाही. शिवरायांच्या जंगलांमध्ये अनेक मासे, खेकडे, कोलंबी, अनेक मृदू काय प्राणी, इत्यादी प्रजननासाठी आश्रयास येतात. अनेक प्रकारचे बगळे, पाणकावळे आणि इतर भरपूर पक्षी तीवरांवर प्रजननासाठी व खाद्य मिळवण्यासाठी अवलंबून असतात. सायबेरिया, अलास्का इथून हजारो किलोमीटर प्रवास करून अनेक स्थलांतरित पक्षी भारतात येतात, तेव्हा ते या तिवरांच्या आश्रयास येतात. तीवर असलेल्या खाड्यांमध्ये आजूबाजूला राहणारे लोक मासेमारीसाठी येतात. त्यांचेही जीवन समुद्रातून या खाड्यांमध्ये येणारे मासे खेकडे आणि कोलंबी व इतर जीवांवर अवलंबून असते.

तीवरांची जंगलं इतर झाडांसारखी वातावरणातला कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजन हवेत सोडतात. तीवर ज्या जमिनीत वाढतात त्या जमिनीत कार्बनचा प्रचंड साठा असतो. अशा प्रकारे साठवलेल्या कार्बनला “निळा कार्बन” असं म्हणतात. त्यामुळे या परिसंस्थेला निळा कार्बन निर्माण करणारी परिसंस्था म्हणून ओळखण्यात येते. सामान्य कार्बनपेक्षा निळ्या कार्बनचे मूल्यांकन भरपूर जास्त होतं व त्याला कार्बन क्रेडिटसुद्धा जास्त मिळतात. खारफुटीची झाडे, समुद्रातील भरपूर क्षारता असलेल्या पाण्यात आणि पावसाच्या किंवा नदी-नाल्यातल्या गोड पाण्यात अशा दोन्ही प्रकारच्या बदलणाऱ्या परिस्थितीत वाढतात. ही जंगले वाढल्यामुळे आपोआपच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पशू-पक्षी, प्राणी व इतर जैवविविधतेला रक्षण मिळतं. मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना रोजगार मिळतो; परंतु जगभर ही वने नष्ट होत चालली आहेत. अनेक लोकांना अजूनही असं वाटतं की, ही नापीक आणि पडीक जमीन आहे आणि त्यामुळे कित्येक मैल दूरवर पसरलेल्या या तिवरांची कत्तल होऊन त्या जमिनीवर घरे बांधण्यात येतात, रस्ते बांधण्यात येतात आणि इतर दळणवळणासाठी या जागेचा वापर होतो. या झाडांवर अवलंबून असलेले साप, बेडूक, कोळी व इतर कीटक यांचे अधिवास आपण नष्ट केले, तर ते नक्कीच आपल्या घरात शिरतात. जर आपण असेच कांदळवन नष्ट करत राहिलो, तर थोड्याशा पावसातही शहरात पाणी साठते. जीवितहानी वाढते. रस्त्यांवर ट्राफिक कोंडी वाढते आणि घराघरांत पाणी शिरते. खूप मोठ्या प्रमाणावर तीवरांची कत्तल केल्यास त्यांवर अवलंबून असणारी जैवविविधता नष्ट होते. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल ढासळतो.

हे सर्व तातडीने थांबवायचं असल्यास तीवरांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ज्या भागात कांदळवने नष्ट होत आहेत त्या भागात त्यांचे पुन्हा रोपण करावे लागेल. एकदा तीवरांची झाडं लावल्यावर ती योग्य प्रकारे वाढत आहेत की नाही याची सुद्धा देखरेख ठेवावी लागेल. कारण अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तीवरांची आपल्याला अत्यंत गरज आहे. परिसराचा आणि वातावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी आपल्याला तीवरांमधून मिळणाऱ्या निळ्या कार्बनची अतिशय आवश्यकता आहे. वृक्षारोपण करताना तीवरांचे रोपण आवर्जून करणे गरजेचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण तीवरांचा संरक्षण करू शकतो आणि त्यांची वृक्षतोड थांबवू शकतो. अजूनही आपण हवामान बदलाचा सामना करू शकतो. प्राण्याची बिळे आणि पक्ष्यांची घरटी नष्ट करून आपण आपले घर बांधायचे की नाही, हे आपणच ठरवायचे आहे.

पुन्हा मंगेश पाडगावकर म्हणतात तसे “पेला अर्धा भरला आहे असंसुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंसुद्धा म्हणता येतं, पेला भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा! सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -