Tuesday, April 30, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअनंत मरणे झेलून घ्यावी...

अनंत मरणे झेलून घ्यावी…

  • नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणजे मराठीतील एक भटका कवी. हा माणूस एका ठिकाणी थांबणारा नव्हता. त्यांच्याच एका कवितेप्रमाणे ‘त्याच्या मनातच एक जिप्सी दडलेला होता.’ सर्वसाधारण माणसाची उपजत प्रवृत्ती एखादे सुरक्षित स्थळ बघून तिथे स्थिरावण्याची असते. पण, या मनस्वी माणसाला सतत नवे प्रदेश शोधण्यात जास्त आनंद वाटायचा. अर्थात हे प्रदेश भौगोलिक नसायचे, तर माणसाच्या मनात जो अनाकलनीय भूप्रदेश असतो, त्यातील ते होते. जिप्सी या कवितेतील एक अनुभव बहुतेक मुलांनी शाळेच्या वर्गात बसलेले असताना घेतलेला असतोच. पाडगावकर म्हणतात-

पण, ठरेचना मन
चार भिंतींच्या जगात,
उडे खिडकीमधून
दूरदूरच्या ढगांत,
झाडे पानांच्या हातांनी
होती मला बोलावीत,
शेपटीच्या झुबक्याने खार होती खुणावीत,
कसे आवरावे मन?
गेलो पळून तिथून,
एक जिप्सी आहे माझ्या
खोल मनांत दडून.

आपल्या कायमच्या अस्थिरतेचे कारण सांगताना ते म्हणतात, स्थिरावणे हा माझा स्वभावच नाही. मला घरापेक्षा रस्ता जास्त प्रिय आहे. मला घराची ऊब, सुरक्षितता आमंत्रित करत नाही, तर प्रवासातील उत्सुकता, गूढता खुणावत राहते.

घर असूनही आता घर उरलेले नाही.
चार भिंतींची, जिप्सीला ओढ राहिली नाही,
कुणी सांगावे, असेल पूर्वज्मींचा हा शाप.
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप!
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून…,
एक जिप्सी आहे, माझ्या खोल मनांत दडून.

खरे तर असा भटका जिप्सी प्रत्येकाच्या मनात निदान असतोच. पाडगावकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची नुसती यादी पाहिली तरी त्यांचा हा वेगवेगळे प्रदेश चोखाळून पाहण्याचा स्वभाव सहज लक्षात येतो. कारण, प्रामुख्याने काव्यलेखन करणाऱ्या या कलाकाराने कविमनाला ज्या प्रकारचे लिखाण फारसे भावत नाही, तेही मोठ्या हौसेने पूर्ण केले आहे.

एखाद्या नाजूक हाताच्या बोटांनी सुंदर फुलपाखरू, त्याला अपाय न होऊ देता पकडावे, तसे पाडगावकर अत्यंत उत्कट प्रेमभावना शब्दांत लीलया पकडत असत. मात्र अशी किमया साधलेला हा माणूस चक्क बालगोपाळांसाठी विनोदी कविता, कथा, कादंबऱ्या, वात्रटिका लिहितो. ते २०१० मध्ये संगमनेरला झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते, तर त्यांची साहित्यसेवा बघून मराठी रसिकांनी त्यांना त्याच साली दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले होते. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांचे, पवित्र बायबलच्या दुसऱ्या भागातील काही पुस्तकांचेही भाषांतर केले. याशिवाय त्यांच्या नावावर संत कबीर, संत सूरदास आणि संत मीराबाईंच्या कवितांचे अनुवादही जमा आहेत. त्यांनी मुलांसाठी कथारूपरूप महाभारत भाग-१ आणि भाग-२ लिहिले आहेत.

नाजूक प्रेमभावना चपखल शब्दांत विणून सुंदर कविता लिहिणारा हा माणूस चक्क ‘सलाम’सारखी तीव्र उपरोधाने भरलेली राजकीय आशयाची कविता लिहून जातो हे त्यांच्यातील वैचारिक जिप्सीचा पुरावाच म्हणावे लागेल. सलाम या कवितासंग्रहाला तर साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. त्यांच्या निबंधाचा एक संग्रहही प्रकाशित आहे हे अनेकांना माहीत नसेल. ‘स्नेहगाथा’ हे तर त्यांचे इतर साहित्यिक मित्रांच्या सहवासातील किश्श्यांचेच पुस्तक आहे.

या कवीने मराठी वाचकाला जीवनाकडे अतिशय सकारात्मकपणे पाहणे शिकवले. हाच अप्रतिम दृष्टिकोन त्यांच्या एका भावगीतात अधिक स्पष्टपणे दिसतो. यशवंत देवांनी ‘खमाज’ रागाचा उपयोग करत अरुण दातेंच्या हळव्या आवाजात गाऊन घेतलेले हे गाणे मराठी श्रोत्यांसाठी अजरामर झाले आहे. त्या मनोहारी भावगीताचे शब्द होते –

“या जन्मावर, या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे.”

पाडगावकरांना केवळ मानवी जीवनाचे विविध रंग, पैलू साद घालत नव्हते, तर सर्व सजीव सृष्टीच्याच ते प्रेमात होते. म्हणून ओल्या जमिनीतून तरारून वर येणाऱ्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्याच्याही ते मोहात पडतात. फुले बघून या कवीला कुणाचे तरी हळवे ओठ आठवतात –

चंचल वारा, या जलधारा,
भिजली काळी माती,
हिरवे हिरवे प्राण तशी ही,
रुजून आली पाती,
फुले लाजरी बघून कुणाचे,
हळवे ओठ स्मरावे.

या कवीचे सगळे भावविश्व मोठे रंगीत आहे. ‘श्रावणात घन निळा बरसला’मध्ये त्यांना पाचूचे हिरवे माहेर दिसते, तर त्यांच्या स्वप्नाचे पक्षी रंगाच्या रानात हरवतात, त्यांचे पाणी नुसते निळे नसते, तर रेशमी निळे असते. पावसाळ्यात सायंकाळी सूर्य उशिरा ढगांच्या आडून निरोप घेतो, तेव्हा त्याचे पाडगावकरांना ते ऊन हळदीचे वाटते.

तसेच सायंकाळच्या रंगीबेरंगी क्षितिजाचे वर्णन ते कसे करतात पाहा. काळ्याभोर आकाशात दिसणाऱ्या तारकांच्या रांगा त्यांना स्वयंप्रकाशी वेलीच वाटतात. या कवीला सहाही ऋतूत असेच सुंदर

विभ्रम होत राहतात –
रंगाचा उघडूनिया पंखा,
सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती,
नक्षत्रांच्या वेली,
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे…

लहान मुलांच्या बोबड्या बोलात त्यांना केवळ जीवनाच्या चिरंतनतेचा साक्षात्कार होतो. इतकेच नाही, तर त्या चिमण्या ओठांतून येणाऱ्या अबोध हाकेत त्यांना आपल्या प्रियेच्या प्रेमामुळे स्वत:च्या वंशवेलीवर उमललेले फूल दिसत असते! मग तिच्यासाठी तिच्या विरहात कितीही झुरावे लागले तरी

त्यांना आनंदच वाटतो.
बाळाच्या चिमण्या ओठांतून,
हाक बोबडी येते,
वेलीवरती प्रेम प्रियेचे,
जन्म फुलांनी घेते,
नदीच्या काठी सजणासाठी,
गाणे गात झुरावे…

उत्कट प्रेमभावनेचे सहज व्यक्तीकरण हे तर पाडगावकरांचे खास वैशिष्ट्य! पृथ्वीतलावरील सगळे जीवन मुळात मातीतून निर्माण होते. त्यामुळे जीवनाविषयी प्रचंड प्रेम असलेला हा कवी भूमीचे चुंबनच घेऊ इच्छितो.

भारतीय अध्यात्मातील पुनरावृत्ती जीवनचक्राची संकल्पना त्यांच्या अंतर्मनात इतकी खोल रुजलेली आहे की, हा कवी म्हणतो, इथल्या एका जगण्यासाठी हजारदा मरावे लागले तरी ते बेहतर आहे! पाडगावकर इथे आपल्याला अगदी अलगद अध्यात्माजवळ आणतात.

पुराणातील एका संदर्भानुसार विश्वाचा अंत करणाऱ्या प्रलयकाळात भगवान कृष्णाने बालमुकुंदाचे रूप धारण केले होते. प्रलयानंतर विश्वाची पुनर्निर्मिती करण्यासाठी त्याने त्यावेळी सर्व जीवसृष्टीचे अंश गिळून आपल्या पोटात साठवले होते. प्रलयाचा जलप्रपात सुरू असताना तो एका झाडाच्या पानावर पहडून तरंगत राहिला होता. हा संदर्भ सूचित करून पाडगावकर भारतीय तत्त्वज्ञानातील विश्वाचे चिरंतनत्व ध्वनित करतात. म्हणून ते शेवटच्या ओळीत म्हणतात, ‘इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे –
ह्या ओठांनी चुंबन घेईन, हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी,
इथल्या पिंपळपानावरती, अवघे विश्व तरावे…
जीवनाकडे या नव्या दृष्टीने पाहायला शिकवणाऱ्या अशा या तत्त्वज्ञाला कधीमधी भेटायलाच हवे ना? म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -