Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : भारत जोडो नव्हे, ‘तोडो’ यात्रा

अग्रलेख : भारत जोडो नव्हे, ‘तोडो’ यात्रा

जेव्हा सारे काही सुरळीत असते, अचानक अंगात आल्याप्रमाणे काहीतरी बरळून समाजातील वातावरण गढूळ करण्याचे काम काही वाचाळवीर अधूनमधून करीत असतात. असे अकलेचे तारे तोडणारे वीर जवळजवळ सर्वच पक्षांमध्ये असतात. त्यांच्या बरळण्याने एकसंध असलेले समाजमन गढूळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना वेळीच चाप लावणे ही काळाची गरज आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. अशा बेधुंद वटवट वीरांमध्ये सध्या वरचे स्थान कोणी पटकावले असेल, तर ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, असे येथे ठामपणे नमूद करावेसे वाटते. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. ही दक्षिणेतील राज्यांमधून आता आपल्या महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहेत व राज्यात यात्रा येऊन चार दिवस झाले आहेत. यात्रा वाशिम येथे पोहोचताच राहुल गांधी यांच्या अंगात काय संचारले काय ठाऊक. त्यांनी तेथील सभेत महाराष्ट्रातील जनतेसाठी पूजनीय असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि एकच गहजब झाला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहिले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची. ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले. सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण त्यांनी कोणताही माफीनामा लिहिला नाही. सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एक प्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ‘मी तुमचा नोकर राहू इच्छितो’, असे सावरकर यांनी पत्रात म्हटल्याचेही राहुल गांधी यांनी अधोरेखित केले.

यानंतर राहुल गांधींच्या या बेताल वक्तव्यावर सर्वच स्तरांतून आणि प्रमुख पक्षांकडून जोरदार टीका झाली. पण त्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत सावरकरांच्या पत्राचे पुरावे सादर करत राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासह सावरकरांच्या जन्मभूमीत तीव्र पडसाद उमटले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन आणि निदर्शने करण्यात येत आहेत. जागोजागी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवरही सडकून टीका केली जात आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद सावरकरांच्या जन्मभूमीतही उटले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शनिवारी ‘भगूर बंद’ ठेवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यामुळे सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये सर्व व्यवहार, बाजारपेठा आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर सावरकर यांच्या पुतळ्यावर दुधाने अभिषेक करण्यात आला. राहुल यांच्याविरोधात ठाणे, पुणेसह राज्यात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राहुल यांची यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना हे कायद्याचे राज्य असल्याचे दाखवून द्या, अशी मागणी खा. राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार ‘भारत जोडो यात्रे’बाबत काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. हे सर्व पाहता राहुल गांधी यांना कोणीतरी जाणूनबुजून काहीतरी लिहून देते आणि ते सावरकरांविषयी काहीही बोलतात असे दिसते.

राहुल यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाबाबत किती ठाऊक असेल किंवा त्यांनी काही वाचले असेल, चर्चा केली असे किंवा सावरकरांच्या एकूण असीम त्यागाबद्दल त्यांना काही ठाऊक असेल असे बिलकुल वाटत नाही. राहुल गांधी हे फक्त लििहलेले वाचतात असे दिसते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील एकमेव असे नेते आहेत की, त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी उपहासाचा कारावास भोगला. काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विचारांना सतत काळिमा लावण्याचा प्रयत्न होतो. राहुल गांधी यांच्यासारखे काँग्रेसचे नेते रोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटेनाटे बोलून त्यांची प्रतिमा मलीन करताहेत.विशेषत: स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या किंवा अन्य सर्व नेत्यांविषयी सर्वांनाच प्रचंड आदर आहे. पण अंदमानच्या काळकोठडीत ११ वर्षे वीर सावरकर यांच्याप्रमाणे अनन्वित अत्याचार सहन करणारा, एकही नेता नाही. त्यांनी केलेल्या त्यागालाही तोड नाही. भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाचीही बदनामी करण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही. ते एका कडवट देशभक्ताचे खोटे आरोप लावून बदनामी करत आहेत. हा प्रकार वेळीच थांबला किंवा स्वत:हून थांबविला गेला पाहिजे. अन्यथा भारत जोडो नव्हे तर ‘तोडो’ यात्रा ठरेल आणि या सगळ्यांचे खापर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवरही फुटेल हे निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -