Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीWorld Cup : वेध फुटबॉल विश्वचषकाचे

World Cup : वेध फुटबॉल विश्वचषकाचे

जगातला सर्वात मोठा फुटबॉल महासंग्राम विश्वचषकाच्या (World Cup) निमित्ताने कतारमध्ये २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत रंगत असून ३२ संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. ९२ वर्षांच्या इतिहासात विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच मध्यपूर्वेतल्या देशात रंगणार आहे. फुटबॉल हा जगातला सर्वात लोकप्रिय खेळ.

फुटबॉलच्या मैदानात खेळाडूंच्या क्षमतेचा अक्षरश: कस लागतो. मैदानातली ती ९० मिनिटं थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारी असतात. फुटबॉलबाबतचं चाहत्यांचं वेड आणि झपाटलेपण पाहून थक्क व्हायला होतं. जगातले अनेक देश फुटबॉल खेळतात आणि विश्वचषकानिमित्त पात्र ठरणारे देश एका छताखाली येतात. फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे सर्व क्रीडास्पर्धांचा मेरूमणी. जगभरातले तमाम क्रीडाप्रेमी फुटबॉल विश्वचषकाची आतुरतेने वाट बघत असतात. चार वर्षं कधी सरतात आणि विश्वचषक कधी सुरू होतो, असंच फुटबॉलप्रेमींना वाटत असतं. चाहत्यांना फुटबॉलचा हा थरार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार असून २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. मध्यपूर्वेतल्या एखाद्या देशाने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे कतार एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेची जबाबदारी कशी पेलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय अनेक कारणांमुळे या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचं आवाहनही केलं जात आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचं आव्हान कतारपुढे आहे.

फुटबॉलचा विश्वचषक ही जगातली सर्वात मोठी एकल क्रीडा स्पर्धा. यंदाच्या विश्वचषकात ३२ देशांचे संघ सहभागी होत आहेत. जगभरातले लाखो चाहते या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मैदानात येऊन सामने बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या काही लाखांच्या घरात जाणार असून जवळपास तीन अब्ज लोक घरात बसून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय जगभरातले एक अब्जांहून अधिक लोक अंतिम सामना बघतील, असंही सांगितलं जात आहे. प्रेक्षकसंख्येच्या बाबतीतही यंदाच्या विश्वचषकात नवे विक्रम नोंदवले जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ३२ संघांची विभागणी आठ गटांमध्ये करण्यात आली आहे. ३२ पैकी १६ संघ पुढच्या फेरीत जातील. म्हणजेच प्रत्येक गटातून दोन संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे प्राथमिक फेरीमध्ये तीव्र चुरस अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेचे संघ आणि गट ठरल्यानंतर नेहमीच ‘ग्रूप ऑफ डेथ’बद्दल चर्चा सुरू होते. अव्वल संघ एकाच गटात आल्यास त्याला गटाला ‘ग्रूप ऑफ डेथ’ म्हटलं जातं.

यंदाच्या स्पर्धेत कोणत्याही एका गटाला ‘ग्रूप ऑफ डेथ’ म्हणणं थोडं अवघडच आहे. कारण यंदा प्रत्येक गटातल्या संघांना पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. यंदा ‘बी’ गट सर्वात आव्हानात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. या गटाचं सरासरी जागतिक रँकिंग सर्वाधिक आहे. इंग्लंड, इराण, अमेरिका आणि वेल्स हे संघ ‘बी’ गटात आहेत. असम असलं तरी ‘ई’ गटाकडे क्रीडाप्रेमींचं जास्त लक्ष असेल. कारण या गटात स्पेन आणि जर्मनीसारखे दादा संघ आहेत. या देशांनी याआधी फुटबॉल विश्वचषकावर नाव कोरलं आहे. याच गटात कोस्टारिका आणि जपानसारखे कोणत्याही संघाला धक्का देण्याची क्षमता असणारे संघ आहेत. ‘जी’ गटातही तुल्यबळ लढती अनुभवायला मिळणार आहेत. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा ब्राझीलचा संघ या गटात आहे. सोबत सर्बिया आणि स्वीत्झर्लंडसारखे जागतिक क्रमवारीत पहिल्या २५ मध्ये असणारे संघही आहेत. याच गटात कॅमेरूनही आहे. आफ्रिका खंडातल्या या देशाच्या संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण नुकत्याच झालेल्या आफ्रिकन कप स्पर्धेत त्यांनी तिसरं स्थान पटकावलं होतं. कॅमेरूनकडून तगड्या प्रतिकाराची अपेक्षा आहे. ‘सी’ गटात लिओनल मेस्सीचा अर्जेंटिना आहे. याच गटात सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड आहेत. कतार, इक्वेडोर, सेनेगल आणि नेदरलँड्ससारखे संघ असणारा ‘अ’ गट तुलनेने सोपा वाटत असला तरी या गटातल्या संघांसाठीही पुढची वाट सोपी नसेल. त्यामुळे या स्पर्धेतल्या ‘ग्रूप ऑफ डेथ’ची निवड करणं तसं कठीणच आहे.

फुटबॉल किंवा कोणत्याही खेळाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वसाधारणपणे सर्वोत्तम संघ पुढच्या फेरीत जाणं अपेक्षित असतं. दुय्यम किंवा नवे संघ पुढची फेरी गाठण्याची शक्यता तशी कमीच असते. त्यामुळे क्रीडाप्रेमी काही ठोकताळे बांधत असतात. यंदाच्या स्पर्धेतही अव्वल संघ पुढे जातील, अशी अपेक्षा असली तरी फुटबॉल विश्वचषकासारख्या क्रीडास्पर्धेत काही उलटफेर पाहायला मिळू शकतात. एखादा दुय्यम संघ दादा संघाला पराभूत करून स्पर्धेबाहेर करू शकतो. हा अर्थातच त्या संघाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरतो. निर्धारित ९० मिनिटांमध्ये कोणता संघ कशी कामगिरी करणार यावर प्रत्येकाचं भवितव्य ठरत असतं. काही धक्कादायक निकालही लागण्याची शक्यता असते. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात डोकावल्यास अनेकदा असं घडल्याचं दिसून येतं. प्राथमिक फेऱ्यांमध्ये असेच काही धक्कादायक निकाल लागतात आणि संपूर्ण स्पर्धेला वेगळं वळण मिळतं. गेल्या वेळचे विश्वविजेतेही प्राथमिक फेरीतच स्पर्धेबाहेर जाऊ शकतात. २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेत २०१४ च्या विश्वविजेत्या जर्मनीला प्राथमिक फेरीतच स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं. जर्मनीला मेक्सिको आणि दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा काय घडणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचू लागली आहे. चाहत्यांच्या अंगात फुटबॉलचा ज्वर भिनायला सुरुवात झाली आहे.

प्राथमिक फेऱ्यानंतरच्या सुपर १६ किंवा ‘क्लॅशेस ऑफ १६’मध्ये काही अनपेक्षित निकाल लागू शकतात, असा अंदाज फुटबॉलचे समीक्षक आणि क्रीडापंडित व्यक्त करत आहेत. यंदा अर्जेटिनाला डेन्मार्कच्या तगड्या आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं. डेन्मार्कने २०२० च्या युरो चषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून सर्वांना धक्का दिला होता. डेन्मार्क हे फुटबॉलविश्वातलं फार मोठं नाव नसलं तरी सांघिक कामगिरीच्या बळावर मोठी मजल मारू शकतात. २०१८ च्या विश्वचषकात क्रोएशियाच्या संघाने सगळ्यांची मनं जिंकली होती. यंदाही सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे असेल. ‘क्लॅश ऑफ १६’मध्ये जर्मनी आणि क्रोएशियामध्ये लढत होऊ शकते. मात्र सध्या हे दोन्ही संघ पुनर्बांधणी प्रक्रियेतून जात आहेत. या दोन संघांनी मागील चार वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे खेळाडू गमावले आहेत. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता आहे. ब्राझील आणि उरूग्वे या संघांमधला सामनाही डोळ्यांचं पारणं फेडू शकतो. बलाढ्य ब्राझीलकडून विजयाची अपेक्षा असली तरी उरूग्वेला कमी लेखणं महागात पडू शकतं. ‘क्लॅशेस ऑफ १६’नंतर जर्मनी, अर्जेंटिना, इंग्लंड, नेदरलँड, ब्राझील, पोर्तुगाल, बेल्जियम आणि फ्रान्स हे संघ अखेरच्या आठ संघांमध्ये स्थान पटकावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर स्पर्धेची चुरस वाढत जाईल. उपउपांत्य फेरीची रंगत चांगलीच वाढेल. या आठपैकी चार संघ उपांत्य फेरीत स्थान पटकावतील. उपांत्य फेरीतले दोन विजयी संघ अंतिम फेरी खेळतील.

फुटबॉलमधल्या बड्या सिताऱ्यांसाठी यंदाचा विश्वचषक अखेरचा ठरू शकतो. फुटबॉलमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू लिओनल मेस्सीसाठी हा विश्वचषक अखेरचा ठरू शकतो. त्यामुळे विजेतेपदावर नाव कोरून ही स्पर्धा संस्मरणीय करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अर्जेटिनाकडे या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे मेस्सी मैदानावर काय करामत करणार, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल. पोर्तुगालच्या क्रिस्तियानो रोनाल्डोचाही हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. त्यामुळे तोही सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. जर्मनीच्या थॉमस म्युलरसाठीही हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. म्युलर विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. मात्र शेवट गोड करण्यासाठी तोही प्रयत्नशील असेल. यासोबतच रॉबर्ट लेवांडोस्की, इडिन्सन कॅव्हानी, लुईस स्युरेझ, ल्युका मॉड्रिक, मॅन्युअल न्यूअर, अँजल डी मारिया आणि करिम बेंझेमा या स्टार फुटबॉलपटूंसाठीही हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. यासोबतच काही नवे चेहरे यंदाच्या विश्वचषकात ठसा उमटवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. प्रत्येक फेरीगणीक स्पर्धेतली चुरस आणि रंगत वाढत जाणार असून ही स्पर्धा म्हणजे क्रीडा चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. फुटबॉलच्या चाहत्यांना ‘न भूतो न भविष्यती’ असा अनुभव मिळू शकतो. काही धक्के बसू शकतात तर काही अनपेक्षित निकालही लागू शकतात. पुढील महिनाभर तरी अवघं क्रीडाविश्व फुटबॉलमय होऊन जाणार हे नक्की!

-श्रीशा वागळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -