Wednesday, May 8, 2024
Homeअध्यात्म‘वि’ज्ञानेश्वर

‘वि’ज्ञानेश्वर

  • प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेचा अर्थ उलगडून दाखवणारी कलाकृती आहे. मूळ भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान ‘बावनकशी सोनं’. त्यात ते समजावून देणारे साक्षात ‘ज्ञानेश्वर’! म्हणून ही ज्ञानेश्वरी म्हणजे ‘मणिकांचन योग’ अर्थात सुवर्णात जडवलेलं रत्नच होय. यातील अठरावा अध्याय हा सर्व अध्यायांचं जणू सार होय. यात ‘ज्ञानी पुरुषा’चं वर्णन येतं. ते सांगणाऱ्यागीतेतील श्लोकाचा अर्थ आहे, ‘ज्याची बुद्धी कोठेही आसक्त होत नाही व जो जितेंद्रिय व नि:स्पृह आहे असा माणूस ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो.’ अशा ज्ञानमय अवस्थेचे वर्णन करताना माऊली अप्रतिम व सहजसोपे दाखले देतात.

उदयतांचि दिनकरू।
प्रकाशुचि आते आंधारू।
कां दीपसंगें कापुरू। दीपुचि होय।।
ओवी क्र. ९८५

सूर्य उगवताच जसा अंधाराचाच प्रकाश होतो किंवा दिव्याच्या ज्योतीस कापूर लागताच तो दिवा होतो. अतिशय अर्थपूर्ण असे हे दाखले आहेत. अंधार व उजेड आपल्याला वेगळे वाटतात. आपण त्यांच्याकडे भेदभावाने पाहतो, वस्तुत: दोन्ही एकच आहेत. सूर्य हा तेजाचा गोळा, त्याच्या उगवण्याने अंधाराचा प्रकाश होतो, त्याचप्रमाणे जो अज्ञानी जीव आहे, त्याला ज्ञानसूर्याचा प्रकाश मिळताच तो ज्ञानी होतो. त्याचप्रमाणे कापूर हा साधा पदार्थ. पण दीपतत्त्वाने तोही दिवा होतो, त्याप्रमाणे साधा मनुष्य, तो अंतरीच्या दिव्याने प्रकाशित होतो. म्हणजे इथे मूळ वस्तू/मनुष्य बदलत नाही, फक्त अवस्था बदलते. अंधारापासून प्रकाशाकडे अशी ही वाट.

पुढे मिठाचा दाखला येतो –
तया लवणाचि कणिका।
मिळत खेंवो उदका।
उदकचि होऊनि देखा। टाके जेविं।।
ओवी क्र. ९८६

मीठ पाण्यात मिसळतं नि ते पाणीमय होतं, पाण्यात संपूर्ण विरघळून जातं. अद्वैताची ही परिसीमाच आहे. पुन्हा यात विज्ञानातील एक सिद्धान्त आहे की, मूळ वस्तू एकच असते, तिचं फक्त अवस्थांतर होतं. जसं इथे मीठ हे घनरूपातून पाणी या द्रवरूपात जातं, त्याप्रमाणे अज्ञानी ते ज्ञानी असं अवस्थांतर ज्ञानदेव या दृष्टान्तातून स्पष्ट करतात. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीत विज्ञान व वाङ्मय यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.

पुन्हा या दाखल्यातील ‘लवणाची कणिका’ यात विलक्षण नाद, अर्थ व सूक्ष्मता आहे. ‘मिठाचा कण’ ही झाली गद्य, व्यवहारी भाषा. ज्ञानदेवांमधील कवीला ती ‘लवणाची कणिका’ दिसते. ज्ञानदेवांच्या अशा प्रतिभा व प्रतिमेला वंदन!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -