Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपाटाच्या पाण्याची चव लय भारी!

पाटाच्या पाण्याची चव लय भारी!

  • रवींद्र तांबे

आज जरी आपण सर्वजण नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत असलो तरी पाटाच्या पाण्याची चवच काही न्यारी असते. आजही खेडोपाडी पाटाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. या पाण्याला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. मी वयाच्या २७ वर्षांपर्यंत पाटाचेच पाणी पीत होतो. मात्र कधी पाण्यामुळे आजारी पडलो नाही. फक्त मे महिन्याच्या अखेरीस आगरातून पाणी आणावे लागत असे. पाऊस पडला की, पुन्हा पाटाचे पाणी सुरू व्हायचे. मात्र कधी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेलो नाही. इतका समंजसपणा मी असताना वाडीतील लोकांचा होता. सध्या मात्र एक दिवस जरी नळाला पाणी आले नाही तरी दुसऱ्या दिवशी गावातील महिला रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जातात. असे अनेक गावात घडलेल्या घटना वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. हे गावाच्या विकासातील मोठा अडथळा आहे. यातून आपण काय साधणार? याचा विचार सुजाण गावातील नागरिकांनी करायला हवा. तेव्हा असे प्रकार गावात होऊ नयेत म्हणून गावाच्या विकासासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यातूनच गावाच्या विकासाला गती मिळेल.

आता मात्र माझ्या आयनल गावी प्रत्येक घरात नळ आहेत. मी मागील आठवड्यात गावी गेलो होतो. तेव्हा घरातील पाणी न पिता पाटाचे पाणी प्यायलो. तेसुद्धा पोटभर. पाण्याचा पाट पूर्वीसारखा स्वच्छ असून पाण्याची चवही पूर्वीसारखीच होती. पाणी प्यायल्यानंतर लहानपणीचे जीवन आठवले. त्यावेळी पाट भरून पाणी यायचे, माझे वडील त्यासाठी खूप मेहनत घ्यायचे. पाटात गवत व झाडाची पाने पडल्यास ती काढून पाटाच्या बाहेर टाकत असत. त्यामुळे पाट स्वच्छ दिसत असे. पाटावर गेल्यामुळे दिवसभर पाणी असायचे. तसेच आज ओसाड दिसणारी जमीन तेव्हा पाटाच्या पाण्यावर गावकरी शेती करीत असल्याने सर्वत्र हिरवेगार दिसत असे.

अलीकडच्या काळात मात्र कामाधंद्याच्या निमित्ताने शहरात गेल्याने एखाद दुसरी माणसे गावी पाहायला मिळतात. तीसुद्धा पेन्शन, मनीआॅर्डर आणि मोलमजुरीवर पोट असणारी. त्यात ग्रामपंचायतीद्वारे एक किंवा दोन दिवस आड करून येणाऱ्या पाण्यावर जीवन जगणारी. त्यामुळे त्यांना पाटाच्या पाण्याची चव कशी काय कळणार? पूर्वी ग्रामपंचायतीला महिना दोनशे रुपये आणि सध्या दीडशे रुपये दिले काय प्रश्न मिटला. पाटावर जातो कोण? अशी परिस्थिती पाहायला मिळते. मात्र असे असले तरी बागायतीसाठी पाटाचे पाणी आणले जाते. आता आपण पाटाच्या पाण्याविषयी अधिक माहिती करून घेऊ. कोकण विभागामध्ये ज्या ठिकाणी वस्तीच्या जवळ नदी किंवा व्हाळ आहेत, तेथे वाडीतील मंडळी एकत्र येऊन वाहते, पाणी अडविण्यासाठी मातीचे बंधारे बांधतात. यामध्ये प्रथम पाणी अडविण्यासाठी पाण्यातील दगड एका बाजूला करावे लागतात. जेणेकरून पाटाने पाणी गेले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बंधारा बांधला जातो. त्यासाठी दगड सारखे करून झाल्यावर बाजूची माती भर घालण्यासाठी खोदली जाते. त्यानंतर झाडाच्या फांद्या तोडल्या जातात. म्हणजे दगड, माती आणि झाडाचा पाला याचा वापर करून पाणी अडविण्यात येते. सध्या पाणी अडविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून (शासकीय अनुदान) सिमेंटचा किंवा केटी बंधारा बांधला जातो.

महत्त्वाची बाब म्हणजे, बंधारा बांधून पाणी अडविण्यासाठी झाडाचे टाळ एका लायनीत लावले जातात. त्यावर टोपलीतून माती आणून ओतली जाते. नंतर ती माती व्यवस्थित सारखी करण्यात येते. त्यावर दगड ठेवण्यात येतात. असा तात्पुरता बंधारा बांधून पाणी अडविले जाते. जेणेकरून पाठाने पाणी येईल. या दृष्टीने बांध घातला जातो. पाटाने पाणी यायला लागले की, नंतर पाटातील गाळ काढून बाहेर फेकून दिला जातो. तसेच पाणी बाजूने जाऊ नये म्हणून पाटातील माती किंवा आजूबाजूची माती घेऊन दोन्ही बाजूने लिफन केली जाते. ज्या ठिकाणी बाग असेल त्या ठिकाणी खावठा ठेवला जातो तसेच पाणी बाजूला जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. नंतर ते पाणी पाटाने वस्तीत आणले जाते. जांभ्या दगडाला मध्येच पाटासारखे कोरून पाणी एकसारखे धो-धो वाहत असते. पिण्यासाठी पाणी भरणे, धुणीभांडी आणि पुरुष मंडळींची दुपारची आंघोळसुद्धा तेथेच केली जात असे. हे खरे ग्रामीण भागाचे मुख्य आकर्षण असते. वाहते पाणी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसे. बाराही महिने या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात असे.

अलीकडच्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक धरणांचे काम केले आहे. तरीपण पाण्यासाठी अंगमेहनत घ्यावी लागते. मी असताना पाटाच्या पाण्यावर भातशेती, कुळीद, उडीद व भुईमूग केला जात असे. त्याचप्रमाणे नारळ सुपारीचे उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी व्हायचे. सध्या आंबे व काजूच्या पिकाकडे अधिक लक्ष दिले जात असले तरी माकडे खूप नुकसान करीत असल्याने स्थानिक लोक जेरीस आले आहेत. याकडेही शासनाने लक्ष द्यायला हवे. त्यात स्थानिक ग्रामस्थांची एकी महत्त्वाची असते.

माझ्या वाडीत पाटाने पाणी येते, तसे कोकणात अनेक वाड्यांमध्ये पाटाचे पाणी येत असते. सध्या मात्र वाडीतील लोक कामानिमित्ताने शहराकडे गेल्याने काही ठिकाणी पाट हुरून गेल्याचे दिसते. गावातील ज्या नारळ पोपळीच्या बागा दिसतात, त्या पाटाच्या पाण्यामुळे डोलताना दिसतात. म्हणून पाटाच्या पाण्याची चव चाखायला कोकणात गेलेच पाहिजे. तेव्हा तुम्हीपण म्हणाल, ‘पाटाच्या पाण्याची चव लय भारी! हीच खरी कोकणची ओळख आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -