Tuesday, May 7, 2024

रंग

  • स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील

उग्र आणि सौम्य स्वभावांचा अंदाज घेताना देवदर्शनाच्या वेळी तरी सात्त्विकताच अनुभवास येईल असे वाटलेले. पण एका मंदिरात जणू मंदिराची मालकीण असल्याच्या आवेशात वावरणाऱ्या त्या काकूंच्या रागाचा पारा पाहून प्रत्येक भाविक देवाला कसाबसा नमस्कार करून बाहेर येत होता. काकूंचे वटारलेले डोळे आणि ‘चला निघा निघा…’चा सूर बघून जो तो देवाला पटापट नमस्कार करून भराभरा मंदिरातून बाहेर येत होता.

‘काकूंचं मंदिर असलं म्हणून काय झालं? त्यांनी भाविकांसोबत नीट वागायला हवं’ जो तो बडबडत होता. साधा देवाला नमस्कार करायलाही देत नाही. म्हणून जो तो नाराज होता. बरं मंदिरात पाच मिनिटं बसावं भाविकांनी तरी काकूंचा त्याला विरोधच. शिवाय तोंडाची बडबड चालू राहायची ती वेगळी. पुन्हा त्या मंदिरात कुणाला यावंसं वाटलं तरी दहा वेळा विचार करावा लागेल, असं काकूचं वागणं बघून देवाला दुरूनच दंडवत घालावा वाटेल असंच काहीसं वातावरण.

काकू असं का वागत असावी? उलट देवाच्या दरबारात असं काही बाही बोलणं, भाविकांशी परखड वागणं जरा विचित्रच. काकूचं वागणं नेहमीचंच म्हणून रोज फारशी गर्दी नसायची मंदिरात. पण सणासुदीला भाविक गर्दी करायचे आणि काकूंच्या रागाचा पारा चढायचा. काकू मंदिराची मालकीण असावी, असं वाटलं… पण चौकशी केल्यावर कळलं काकूच्या शेजारच्यांचं ते मंदिर आहे. काकू फक्त देखभाल करतात. देवाला भाविकांना भेटू देत नाहीत की भाविकांनाही देवाला भेटू देत नाहीत, अशी स्थिती. जो तो घाबरून मंदिरात कसाबसा प्रवेश करतो आणि आल्यापावली परततो.

तर काल-परवाच हॉस्पिटलमध्ये प्रवेश करतानाच एका सिस्टरच्या रागाचा पारा चढलेला पाहिला तोही पेशंटच्या नातेवाइकांवर. आयसीयू रूममध्ये कुणालाच प्रवेश नाही. टायमिंगच्या वेळी भेटण्यासाठी नातेवाइकांची गर्दी पण तितक्यातच कुणा एका पेशंटची तब्येत अत्यंत खालावली म्हणून सिस्टर बाहेर येऊन त्रागा करू लागलेली. मोठमोठ्याने ओरडत बाजूला व्हा, निघा इथून, सारे घरी निघून जा, कुणालाही पेशंटना भेटता येणार नाही म्हणून आरडाओरड करू लागलेली. सारे पेशंटचे नातेवाईक काही न बोलता गुपचूप राहिलेले. पण तिचा आरडाओरडा काही थांबेना. हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा करण्याची ही कोणती पद्धत? बरं एकदा का युनिफॉर्म घातला की, ती भूमिका पार पाडायची हे कर्तव्य असते, हे मान्य पण आरडाओरडा करून स्वत:चं महत्त्व अशा पद्धतीने वाढवण्यात कोणतं माहात्म्य दिसून येते, हे मात्र त्यावेळी कळले नाही.

तर एका कार्यक्रमावेळी काऊंटरवर एका स्पर्धेसाठी प्रवेश फी घेणाऱ्या व्यक्तीचा रागाचा पाराही असाच वाढलेला पाहण्यात आलेला. या व्यक्तीने आलेल्या स्पर्धकांना असं काही रांगेत उभं करून ठेवलेलं की कार्यक्रम सुरू होत आला तरी सुट्ट्या पैशांवर ती व्यक्ती अडून राहिलेली. प्रमुख पाहुणेही कार्यक्रमाला वेळेवर का आले नाहीत हे पाहण्यासाठी शेवटी संयोजक बाहेर आले आणि पाहिलं तर सारे स्पर्धक एका मागे एक रांगेत उभे काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीच्या सुट्ट्या पैशांसाठीच्या रागाचा पारा चढलेला आणि प्रमुख पाहुणे म्हटले तर सगळ्यात शेवटी स्पर्धकांच्याच रांगेत उभे करून ठेवलेले. हे पाहून मग संयोजकांच्याच रागाचा पार चढला आणि काऊंटरवर बसलेली व्यक्ती जागच्या जागी आली. अनेकदा अशी स्थिती अनुभवास मिळते. मंदिरातील देवाला भेटण्यासाठीही किती प्रयास करावे लागतात. अनेकांशी सामना करावा लागतो. अशा वेळी तुम्ही किती गोड बोला अथवा किंवा नम्रता अंगी बाळगा माणूस शेवटी आपला रंग दाखवतोच.

priyani.patil@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -