Tuesday, April 30, 2024
Homeमहत्वाची बातमीपवारांच्या घरावर हल्ला : ११ जण होते दारूच्या नशेत

पवारांच्या घरावर हल्ला : ११ जण होते दारूच्या नशेत

आरोपींच्या ब्लड टेस्टमधून धक्कादायक बाब उघड

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात शांततेत आंदोलन सुरू असताना अचानक कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोड येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता तपासाला वेग आला असून तपासातून रोज नव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पवारांच्या घरावर चाल करून जाणारे काही आंदोलक हे दारूच्या नशेत होते, असा संशय व्यक्त होत होता. त्यावरून रक्ताचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळून आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या अानुषंगाने शुक्रवारी महत्त्वाची माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळले आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. ८ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्याच्या आदल्या दिवशी ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला २० ते २५ जण उपस्थित होते, असेही तपासातून पुढे आले आहे.

अॅड. जयश्री पाटील नॉट रिचेबल; तपासासाठी पथके रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडले असून आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांना ९ तारखेला न्यायालयात हजर केल्यापासून जयश्री पाटील यांनी पोलिसांचे संरक्षण सोडले आहे. सदावर्तेना कोर्टात हजर केल्यावर त्या उपस्थित होत्या. मात्र तेव्हा त्या पोलीस संरक्षणाशिवाय आल्या होत्या. दरम्यान पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा कट गुणवंत सदावर्ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आंदोलनाच्या आदल्या दिवशी शिजला. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा सल्ला गुणवर्तेंच्या पत्नी जयश्री यांनी दिला, अशी माहिती मुंबई पोलिसांतर्फे गिरगाव न्यायालयात देण्यात आली. जयश्री पाटील यांना वॉण्टेड दाखवण्यात आले असून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -