Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीडहाणूच्या महालक्ष्मी यात्रेस आजपासून प्रारंभ

डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेस आजपासून प्रारंभ

बाजारपेठा सज्ज, प्रशासनाकडून जय्यत तयारी

पालघर (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट संपल्यानंतर दोन वर्षापासून बंद असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेला शनिवार १६ एप्रिलपासून सुरुवात होत असून ही यात्रा सतत पंधरा दिवस चालणार आहे.

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात, राजस्थान, मुंबई, पुणे येथील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. सुरतमधील भाविकांचीही या देवीवर विशेष श्रध्दा आहे.

महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राज घराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी – चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो, ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरू आहे.

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे बारसी, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होतात. यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो. या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय आपली कुलस्वामीनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटुंबातील आहेत. या चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -