Wednesday, June 26, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअटक मटक बालनाटक

अटक मटक बालनाटक

  • नंदकुमार पाटील : कर्टन प्लीज

पूर्वी शाळेला सुट्टी पडली की, आमच्या बच्चे मंडळींना गावचे वेध लागत होते. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. पालकवर्ग स्वतःच सुशिक्षित आहेत म्हणताना मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त एक तरी छंद किंवा आवड जपावी, असे त्यांना वाटते. सध्या तरी मुलांमध्ये, पालक वर्गात नृत्य, गायन, अभिनय यांचे प्रचंड आकर्षण आहे. मुलांना चित्रपटात, मालिकांत, नाटकांत संधी मिळावी म्हणून पालक धडपड करत असतात. त्यासाठी प्रचंड फीही ते देण्याची तयारी दाखवतात. शिबीर, कार्यशाळा, प्रशिक्षण यांचे आयोजन करणारे आयोजकसुद्धा त्यासाठी भरपूर आमिष दाखवत असतात. पालकांनी त्यांच्या खोट्या आश्वासनाला, भुलथापांना बळी पडू नये. काही महिने उलटल्यानंतर आपली फसगत झाल्याचे पालकांच्या लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. हे आपले पहिले अपयश गुणी मुलगा आणि संयमशील पालकांवर इतके परिणाम करणारे ठरू शकते की, ते पुन्हा या क्षेत्रात येऊ पाहत नाहीत. नवीन कला जाणून घेण्यापूर्वी प्रत्येक पालकांनी जागृत असायला हवे. केवळ मुलगा सांगतो म्हणून प्रवेश घेणे प्रथम टाळले पाहिजे.

मुलांचा कल कोणत्या कलेत जास्त आहे, याचा विचार पालकांनी प्रथम करायला हवा. पन्नास टक्के पालक मुलांना कोणत्या कलेची आवड आहे याचा विचार करत नाहीत. माझ्या बालपणी किंवा युवा अवस्थेत मला ते कलागुण जपता आले नाहीत. ती इच्छा मुलाने पूर्ण करावी, असा त्यांचा हट्ट असतो. हे प्रमाण मुलांच्या आईमध्ये अधिक असते. आयोजकांचे पालकांबरोबर दोन-चार भेटी झाल्या की, त्यांना या भेटीत पालकांच्या आशा अपेक्षा काय आहेत. हे कळून चुकलेले असते. ते मुलांच्या विकासाच्या दृष्टीने पालकांना पैसे मिळवून देणाऱ्या अनेक गोष्टी सुचवतात. मुख्य भूमिका देतो सांगणे, फोटो सेशन, निर्मितीत हातभार, शॉर्ट फिल्म आधी कितीतरी गोष्टी सांगता येतील. एकाच वेळी दहा लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक खर्च काढण्याइतके बोलबच्चन आयोजक करीत असतात. कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा तुमच्याकडून भरमसाट पैसे उकळत जातात तेव्हा तुमच्या मुलांमध्ये काहीतरी तफावत आहे, असा अर्थ लावायला काही हरकत नाही. सर्व गुण संपन्न कलाकाराला त्यांच्या कामाचे मानधन दिले जाते. नावाजलेल्या किंवा कलेशी प्रामाणिक असलेल्या संस्थेकडून असा गैरव्यवहार होत नाही हे लक्षात असू द्या.

नाट्य शिबिराला शिबिरार्थी मिळवायचे म्हणजे पूर्वी पेपरला जाहिरात करावी लागत होती. मोक्याच्या ठिकाणी पोस्टर लावले जात होते. आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जाहिरात करणे वाढलेले आहे. समाज माध्यमात त्याचा प्रचार व्हायला फारसा वेळ लागत नाही. मुलांच्या, पालकांच्या साऱ्या अपेक्षा त्या जाहिरातीत असल्यामुळे पालक वर्ग संपर्क साधतो. बरेचसे आयोजक पालकांनी शिबिराला मुलाला पाठवावे यासाठी विनामूल्य, सवलतीच्या दरात शिबिराचे आयोजन असल्याचं सांगून शिबिरार्थींची संख्या वाढवत असतात. त्यामुळे येथे सुद्धा पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. ज्या जाहिरातीत आयोजकाचे नाव न देता फक्त मोबाइल नंबर देतात त्यांच्याशी संपर्क न करणे बरे. मध्यंतरी आयोजक आपल्या ओळखीचा फायदा गैर मार्गाने करतात म्हणताना विक्रम गोखले, निर्मिती सावंत, सत्यदेव दुबे यांनी जाहिराती थांबवल्या होत्या. बऱ्याच वेळा आयोजक मार्गदर्शक म्हणून नावाजलेल्या कलाकारांची नावे देत असतात. ते पालकांनी तपासून घ्यायला हवे. जे ठरवले आहे त्याची पूर्तता आयोजकांकडून होणार आहे की नाही हे प्रथम त्यांनी विचारायला हवे. शक्य झाले तर फी भरताना दिलेल्या पावतीवर तसे नमूद करून घ्यायला हवे. एकदा का मुलांसाठी तुम्ही पैसे खर्च करण्यासाठी तयारी दाखवता म्हणताना ही बातमी फसव्या जगात वाऱ्यासारखी पसरते त्यामुळे शिबीर झाल्यानंतर सुद्धा संपर्क साधणाऱ्या आयोजकांची संख्या ही कमी नसते. खात्री करा नंतरच योग्य तो निर्णय घ्या. पुन्हा एकदा तुमच्या मुलाला काम देण्यासाठी कोणीही पैसे मागत नाही, हे लक्षात असू द्या.

नाटकाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आताची व्यावसायिक नाटके पूर्णपणे बदललेली आहेत. तसेच बाल नाटकाच्या बाबतीत बोलता येणार नाही. त्याला कारण म्हणजे बाल नाटकाची निर्मिती करायची म्हणजे त्याला वर्षभर प्रतिसाद मिळेलच याची खात्री देता येत नाही. ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाला फक्त झी वाहिनीचे सहकार्य लाभले नाही, तर त्याची निर्मितीसुद्धा प्रेक्षक समाधान व्यक्त करतील अशी आहे. त्यासाठी दिग्गज मंडळी या नाटकासाठी एकत्र आली आहेत. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे यांनी बालरंगभूमीला दिलेले योगदान लक्षात घेता, त्यांची बालनाट्ये विसरता येणे कठीण आहे. फक्त मनोरंजन हा त्यांच्या नाटकाचा मुख्य उद्देश न राहता प्रबोधनही झाले पाहिजे, हा विचार त्यांच्या निर्मितीत होता. ‘दुर्गा झाली गौरी’ हे चंद्रशाळेची निर्मिती. सुलभा देशपांडे यांनी त्यात पुढाकार घेतला होता. ती बाल रंगभूमीवरची सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरली. प्रत्येक वर्षी एक – दोन नवीन बालनाटक येत असली तरी कायम स्मरणात राहील, असा प्रयत्न कुठल्या ही नाटकाच्या बाबतीत झालेला नाही. नाटकाचे शीर्षक वाचल्यानंतर ती लहान मुलाना दाखवायची की नाही असा प्रश्न पडतो. बरेचसे निर्माते नाटक नव्याने लिहून घेत नाहीत. शीर्षक बदलून तेच नाटक रंगमंचावर आणत असतात. त्यावर छोट्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या छोट्या मुलांसाठी असलेल्या मालिकांचा जास्त प्रभाव जाणवतो. बऱ्याच वेळा शिबीर घ्यायचे आणि त्याच शिबिरार्थींना घेऊन व्यावसायिक नाटकाची निर्मिती करणे अलीकडे वाढलेले आहे. हा प्रयत्न अनेक आयोजकांकडून होत असल्यामुळे प्रेक्षक संभ्रमात पडतील इतकी नाटके मराठी रंगभूमीवर सुट्टीच्या दिवशी येत असतात. यात ही दोन प्रकारचे प्रेक्षक असतात. एक दर्जेदार कलाकृतीला प्राधान्य देतो. लेखक, दिग्दर्शक, संस्था, कलाकार कोण? याचा विचार हे प्रेक्षक करत असतात. तर दुसरा प्रेक्षकवर्ग हा एका तिकिटावर दोन तिकिटे फ्री किंवा एकाच तिकिटात तीन बालनाटके किंवा देण्यात येणाऱ्या भेटवस्तू यात हे प्रेक्षक गुरफटलेले असतात. पालकांनी या मोहाला दुजोरा देऊ नये. याचा अर्थ सर्वच नाटके फसवी असतात, असे नाही. संस्कारक्षम नाटके जास्तीत जास्त बाल प्रेक्षकांनी पाहावी असा सुद्धा आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. थोडक्यात काय तर पालकांनी जागृती दाखवली तर अटक मटक मस्त, झकास, धमाल बाल नाटके पाहिल्याने बच्चे मंडळींना आनंद होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -