Sunday, May 24, 2026

Raigad Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात; ७०० फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून ८ तरुणांचा मृत्यू

Raigad Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात; ७०० फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून ८ तरुणांचा मृत्यू

रायगड : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात रविवारी पहाटे भीषण अपघात (Accident) घडला. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ जिप (Scorpio Jeep) अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत वाहनातील सर्व ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, मृत सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, २०१८ मध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला ज्या ठिकाणी भीषण अपघात झाला होता, त्याच परिसरात हा अपघात घडल्याने पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे सुमारे २:४५ वाजता घडला. आसगाव येथील आठ तरुण स्कॉर्पिओ जिपमधून प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार, खोल दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे अपघात अधिक भीषण होता. वाहन दरीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने वाहनापर्यंत पोहोचणे आणि परिस्थितीचा अंदाज घेणे सुरुवातीला कठीण झाले.

बचावकार्यात (Rescue Operation) अनेक पथकांचा सहभाग

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दरीची खोली ५०० ते ७०० फूट असल्याने बचाव आणि शोधमोहीम राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड-पोलादपूर, आपदा मित्र तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि मदत पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. बचाव पथकाने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली असून, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या दुर्घटनेची माहिती समोर येताच आसगाव गावासह संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. एका गावातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंबेनळी घाटातील धोकादायक वळणे, खोल दऱ्या आणि वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >