Saturday, August 15, 2026

श्रावण मास

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे

बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे ॥’

असा हा वर्षाऋतूत जलधारांचा वर्षाव करत येणारा श्रावणमास हसत-खेळत येतो, असे भासते. भारतीय संस्कृती, समृद्ध परंपरा, व्रते, सण आणि उत्सव यांचे विलोभनीय दर्शन हा श्रावणमास घडवतो. हिंदू संस्कृती ‘निसर्ग देवो भव’ असे मानते. निसर्ग हे ईश्वराचेच एक रूप आहे. पृथ्वी, जल, वायू (वारा), तेज (सूर्य) आणि आकाश ही पंचमहाभुते वेगवेगळ्या देवतांचे प्रतीक मानली जातात. यांच्या कृपेशिवाय आपले जीवन अशक्य आहे. चराचरात ईश्वर व्यापलेला आहे. प्राणी आणि वनस्पती हेदेखील आपले सन्मित्र आहेत. या विचारधारेला अनुसरून श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नागदेवतेची पूजा केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी श्रावण अमावस्येला, तर काही ठिकाणी भाद्रपद अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. ‘बैलपोळा’ म्हणजे बैलांची पूजा करण्याचा दिवस. भारत हा शेतीप्रधान देश आहे. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी बैलांना सजवले जाते, त्यांची पूजा केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्याकडून काम करून घेतले जात नाही. हा त्यांचा विश्रांतीचा दिवस असतो. श्रावणातील रविवारी काही ठिकाणी आदित्य-रेणुका देवीची पूजा केली जाते. सूर्यनारायणाच्या कृपेमुळेच मानवी जीवन संपन्न होते. सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणजे सूर्यदेव. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेने ही पूजा केली जाते.

‘मंगळागौरी’ हा नववधूंसाठी उत्साहाचा आणि मांगल्याचा दिवस असतो. श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरी देवीची पूजा केली जाते. या पूजेत एकवीस प्रकारची पत्री म्हणजे पाने देवीला अर्पण केली जातात. बेल, तुळस, माका, पारिजात, रुई, आघाडा, दुर्वा अशा विविध वनस्पतींचा यामध्ये समावेश असतो. यानिमित्ताने या वनस्पतींचे औषधी उपयोग जाणून घेण्यासही मदत होते. मंगळागौरीच्या दिवशी जागरण केले जाते. त्यावेळी विविध खेळ खेळले जातात. आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवण्याची एक उत्तम संधी मिळते. तसेच एकमेकींविषयी आपलेपणाची भावना निर्माण होते. दर शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. आई आपल्या अपत्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी जिवतीची पूजा करते. शनिवारी मारुतीची उपासना केली जाते. मारुतीच्या उपासनेमुळे शक्ती आणि बळ मिळते. तसेच मनाची सकारात्मकता वाढते. हनुमंताला रुईच्या पानांची माळ घातली जाते. रुईच्या पानाच्या मागील बाजूस असणारा पांढरा थर मधासोबत घेतल्यास शक्ती मिळते, अशी लोकमान्यता आहे. हल्लीच्या भाषेत बोलायचे झाले तर थकवा आल्यावर जसे ‘ओआरएस’ घेतले जाते, तसेच काम रुईचे पान करते, असे मानले जाते. श्रावण सोमवारी शिवाची पूजा केली जाते. शिव ही लयाची देवता असल्यामुळे शिवाला हळद-कुंकू वाहिले जात नाही. शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो आणि बिल्वपत्र वाहिले जाते. त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असतो. काही धर्मद्वेषी संस्था आणि संघटना शिवाला दुधाचा अभिषेक न करता ते गोरगरिबांना वाटावे, असा चुकीचा सल्ला देतात. लग्नसमारंभ अथवा उपाहारगृहांमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीविषयी त्यांच्याकडून कधी आवाज उठवला जात नाही. त्यांचा विरोध केवळ धर्माचरणालाच असतो. शिवाला अर्धप्रदक्षिणा घालण्यामागेही विज्ञान असल्याचे सांगितले जाते. तीर्थ ओलांडून गेल्यास तेथील ऊर्जा सहन न झाल्यामुळे त्रास होऊ शकतो, म्हणून अर्धप्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा! भाऊ-बहिणीचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. बहीण भावाला राखी बांधते. त्याचे कल्याण व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना करते आणि भावाने तिचे रक्षण करावे, अशी विनंती राखीच्या माध्यमातून व्यक्त करते.  सध्या हिंदूंवर ‘लव्ह जिहाद’चे भयानक संकट ओढवले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक युवक-युवतीने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजबांधवांचे रक्षण करण्यासाठी हे प्रशिक्षण आवश्यक आहे.नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. ते समुद्राला म्हणजेच जलदेवतेला नारळ अर्पण करून मासेमारीला प्रारंभ करतात. जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून स्वतःचे रक्षण व्हावे आणि मासेमारीचा व्यवसाय निर्विघ्नपणे सुरू राहावा, यासाठी प्रार्थना केली जाते.

‘श्रीकृष्णजन्म’ हा श्रावण महिन्यातील महत्त्वाचा दिवस आहे. श्रावण कृष्ण अष्टमीला रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण म्हणजे जगद्गुरू. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा अधर्म बळावेल, तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेईन. भक्तांचे रक्षण करीन. आपल्याला या घोर आपत्कालातून तरून जाण्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती करायला हवी.कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. सध्या दहीहंडीला धार्मिक स्वरूप न राहता बाजारी आणि विकृत स्वरूप आले आहे. ते बदलण्याची आवश्यकता आहे.हल्ली ‘बायकांची दहीहंडी’ असा एक प्रकार रूढ होत आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या चुकीच्या संकल्पनेमुळे असे होत आहे. निसर्गानेच स्त्रियांकडे वेगळे दायित्व दिलेले आहे. स्त्री ही सर्जनाचे प्रतीक आहे. साहस, धैर्य आणि शौर्य अंगी असायलाच हवे; पण याचा अर्थ पुरुषांची बरोबरी करणे म्हणजे समानता नव्हे. जे योग्य आहे, तेच आपण केले पाहिजे. स्त्री आणि पुरुष यांच्या शरीररचनेत निसर्गदत्त फरक आहे. त्या फरकाचा मान राखायलाच हवा. आरोग्याच्या आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्त्रियांनी दहीहंडी फोडणे अयोग्य आहे, असा या परंपरेमागील विचार आहे. त्याचा बोध आपण घेऊया.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा