Saturday, August 15, 2026

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर दूध विक्रेते, दूध संकलन केंद्रे आणि डेअऱ्यांची अचानक तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत पारोळा आणि चाळीसगाव तालुक्यात प्रशासनाने धडक कारवाई केली. (Jalgaon FDA Raid)

६० हजार रुपयांचा दंड वसूल

या कारवाईत सात अनधिकृत दूध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुधाचे नऊ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार असून, अहवालानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. पारोळा येथे तीन, तर चाळीसगाव तालुक्यात चार अनधिकृत दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. (Jalgaon FDA Raid)

परवानगीशिवाय किंवा आवश्यक नियमांचे पालन न करता दूध विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चाळीसगाव परिसरातील तपासणीदरम्यान दुधाचे सात नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. दूध भेसळयुक्त असल्याचे किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार दूध मिळावे, यासाठी प्रशासनाकडून ही तपासणी मोहीम राबवली जात आहे. (Jalgaon FDA Raid)

प्रशासनाचा मोर्चा आता जळगाव शहराकडे

दरम्यान, जामनेर येथेही अन्न व औषध प्रशासनाने दूध विक्री केंद्रांची तपासणी करून दुधाचे दोन नमुने ताब्यात घेतले आहेत. ग्रामीण भागातील कारवाईनंतर आता प्रशासनाचा मोर्चा जळगाव शहराकडे वळणार आहे. सोमवारपासून शहरातील दूध डेअऱ्या, विक्री केंद्रे आणि संबंधित आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. दूध विक्री करताना आवश्यक नियमांचे पालन केले जाते का, तसेच दुधाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याची तपासणी प्रशासनाकडून केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जळगावातील दूध विक्रेत्यांमध्ये आता चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >