Sunday, May 24, 2026

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले आहे. तसेच निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी संभाजी नगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी (दि. २५) एसआयटीमार्फत चौकशी होणार असून, या चौकशीत काय माहिती समोर येते, यावर पुढील कारवाई अवलंबून राहणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीत हिंदू महिलांचे लैंगिक शोषण व धर्मांतर केल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांचे पथक कंपनीत तपासासाठी पाठवण्यात आले होते. पथकाने प्रत्यक्ष तपास करून माहिती संकलित केली. त्यानंतर पहिला गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला, तर इतर नऊ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पहिल्या गुन्ह्यात नोकरी करणाऱ्या निदा खान हिला पोलिसांनी तब्बल ४० दिवसांनंतर अटक केली होती. ती सातत्याने पोलिसांना चकमा देत होती. या प्रकरणात तिला मदत करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. निदा खानला त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पथकांनी संयुक्तरीत्या केली होती. सध्या निदा खान नाशिक न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी पोलिसांनी मतीन पटेल यांना सोमवारी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. चौकशीनंतर आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आठ आरोपींची चौकशी

या सर्व गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकामार्फत तपास सुरू असून, अलीकडेच एसआयटीने पहिल्या गुन्ह्यातील आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. आतापर्यंत आठ आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये दानिश शेख याच्यावर लैंगिक छळ व धर्मांतराच्या वेळी एका महिलेकडून पैसे उकळल्याचा आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने तपास अधिक सखोल करत त्याचे बँक खाते सील केले आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार आतापर्यंत किती रक्कम खंडणी स्वरूपात वसूल करण्यात आली याचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment