Saturday, August 15, 2026

आला श्रावण...

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे

श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास कथा-कीर्तनाच्या माध्यमातून मन संस्कारित करत असतो. आत्मशुद्धीला कारक ठरणारी अनेक व्रतवैकल्यं या काळात आपसुक पार पडतात आणि उपवासाच्या निमित्ताने उदरशुद्धिकरणाचंही काम होतं. अशा प्रकारे अंतर्बाह्य शूचिर्भूतता देणाऱ्या या महिन्याकडे, त्यातील कर्मकांडाकडे आधुनिकतेच्या कवाडांमधून पाहिल्यासही खूप काही सापडतं.

श्रावण... वर्षभराच्या कालखंडाला एखाद्या व्यक्तीच्या आयुर्मानाची उपमा दिली तर श्रावण म्हणजे त्याच्या पौंगंडावस्थेची स्थिती. तसाच लाजरा, खोडसाळ, लडिवाळ आणि आनंदी भाव... ऊन-पावसाची ती लपाछपी... अपूर्व तेजाने लखलखणारा आसमंत, तो सुगंधी फुलोरा आणि तो स्वप्नांचा मनोरा... खरंच श्रावण असाच असतो. अशा प्रसन्न वातावरणात, मनाच्या उल्हसित अवस्थेत जागृत होणाऱ्या श्रद्धाभावाला, उचंबळून येणाऱ्या निसर्गभक्तीला याच काळात पारमार्थिक आनंदाचा परिसस्पर्श मिळतो आणि पवित्र भावाने भारलेला हा महिनाभराचा काळ म्हणजे श्रद्धा, भक्ती, आराधना, पूजा, होमहवन याबरोबरच सण-समारंभानी गजबजून जाणारं उत्साही पर्व ठरतं. श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास स्त्रियांचे सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी-गणपतीही खुणावत असतात. नंतर नागपंचमीपासून नवरात्र, दिवाळी या सगळ्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सणांची सुरुवात होते. आपल्या कृषिप्रधान देशात आजही शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या, पिकाची नासधूस करणाऱ्या उंदीर-घुशींचा नायनाट करणाऱ्या सर्पदेवतेची पूजा केली जाते. पंचमीनंतर येणारी राखीपौर्णिमा म्हणजे स्त्रियांच्या माहेरचा जिव्हाळा सासरघरी येण्याचा दिवस. या दिवशी सकाळपासून घरादारात चकरा सुरू होतात. भावाची आतुरतेने वाट पाहिली जाते. भावाला साखरभात खायला घालायचा असतोच पण आईकडून डब्यात येणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्यांचीही वाट पाहिली जाते! एका नाजूक रेशमाच्या धाग्याने सगळे बंध बांधून ठेवलेले असतात. या सणाबरोबरच श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार, मंगळागौर, सत्यनारायण हे खास श्रावणाचे मानकरी असतातच. खरं सांगायचं, तर श्रावणातील प्रत्येक दिवसच सण होऊन जातो. अशा आनंदी वातावरणामुळेच असेल कदाचित पण, श्रावणात मनाच्या सांदी कोपऱ्यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या बहुतेक सगळ्या सणांमध्ये आणि अंगीकारल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांमध्ये येणाऱ्या संकटांमधून निर्भीड आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळवण्याची प्रेरणा मिळते. संसारातील सुख-दु:खांचा सारीपाट मांडला असताना मन मोकळं करून आपल्या सख्यांना समजून घेण्याचे हक्काचे क्षण हा महिना देऊन जातो. पुराणातील सावित्री, सीता, द्रौपदी, अहिल्या आणि तारामती या सगळ्यांचा वारसा जपण्याची ही परंपरा... ‌‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको‌’ असं म्हणत स्वत:ला खंबीर बनवण्याचा हा एक निखळ मार्ग. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या परंपरा पाळत आलो आहोत.

साप-नाग हे सरपटणारे जीव आपल्या संस्कृतीतील महत्त्वपूर्ण हिस्सा आहेत. त्यांच्याविषयीच्या अनेक कथा पारंपरिक कथांमधून आपण ऐकतो. संपत्तीचं रक्षणकर्ता, घराचा राखणदार, घराण्याचा मूळ पुरुष आदी स्वरूपात नागाचा उल्लेखही जुन्याजाणत्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. निसर्गातील उपयुक्त घटकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा, आत्मियता व्यक्त करण्याचा भावच या प्रथेतून दिसतो. म्हणूनच या सणांनिमित्त सांगितलेल्या कर्मकांडाकडे आणि कालबाह्य प्रथांकडे दुर्लक्ष करून योग्य निष्कर्ष काढता यायला हवा. आपल्या परंपरेत वर्षभर उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची किंवा प्राण्यांची पूजा करण्यासाठी संधी राखून ठेवण्यात आली आहे. दिव्याची अमावस्या, बैलपोळा, होळी. याच पद्धतीने नागपंचमीचा सण हा नागाच्या पूजेचा दिवस असतो. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र. त्या दिवशी नागाला दूध पाजायचे आणि पूजा करायची. रात्री मुली आणि स्त्रिया खेळ खेळतात. झिम्मा, फुगड्या, झोपाळा, कोंबडा, पगा असे एरव्ही न खेळले जाणारे खेळ त्या दिवशी खेळतात. या खेळांपेक्षा त्या खेळांची गाणी मजेदार असतात. पूर्वी सासूरवाशिणींना मनातल्या काही गोष्टी बोलता येत नसत. या खेळाच्या आणि गाण्याच्या निमित्ताने त्यांना मनातील खदखद व्यक्त करता येत असे. कदाचित हे तेव्हाचं तणावमुक्तीचं साधन असेल. नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या सणांना आजही तितकंच महत्त्व दिलं जातं. पुराणांशी आणि परंपरेशी घट्ट नातं बांधून घेणाऱ्या स्त्रियांना बळ प्राप्त करून देणारं हे विश्व. काळानुरूप सणवार साजरे करण्याच्या पद्धती बदलत असल्या तरी त्यांचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. पावसाच्या सरींबरोबर मनाच्या कोंदणातील भाव व्यक्त करण्याचा आजी आणि माय-मावशांनी दिलेला वारसा आपण आजही जतन करून ठेवला आहे. या महिन्याला पावसाची खूप सुंदर साथ असते. या हलक्या सरींबरोबर मन उल्हसित झालं नाही तरच नवल... स्त्रियांच्या भावविश्वात पावसाचं स्थान अनन्यसाधारण आहे. पावसाच्या सरींबरोबर गाण्यांच्या सप्तसुरांमधून मन मोकळं करण्याची हातोटी असल्यामुळे पाऊस, स्त्रियांचे सणावार आणि गाणी हे समीकरण श्रावणात पक्क झालं आहे. नागपंचमी, मंगळागौरीला रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पगा यासारखे खेळ खेळताना पारंपरिक गाण्यांची आठवण होणं तितकंच स्वाभाविक. पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर पडण्याची संधी मिळत नसे. आजच्या स्त्रिया नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या आहेत. पण घरातील व्याप सांभाळून ऑफिसमधील कामांचा ढीग संपवताना स्वत:साठी वेळ काढणं आजच्या स्त्रीलाही शक्य होत नाही. म्हणजे एकूणच काय तर मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी संधी, निमित्त हवं असतं.

ही संधी मिळवून देणाऱ्या या हक्काच्या सणांचं रूप आज काहीसं बदलत आहे. पूर्वी मंगळागौरीची गाणी स्वत: स्त्रिया म्हणायच्या, आता कॅसेट किंवा सीडीची मदत घेतली जाते. काही ठिकाणी कार्यक्रम करणाऱ्या, आपले पारंपरिक खेळ दाखवणाऱ्या महिलांच्या गटांना पाचारण केलं जातं. अलीकडे चित्रपटांमधील गाण्यांवर नाचण्याची प्रथाही रूढ झाली आहे. आजची आधुनिक स्त्री पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आली असून भारतीय परंपरांकडे पाठ फिरवते असं म्हटलं जातं. वास्तवात परिस्थिती उलट आहे. भारतीय परंपरा नाकारणाऱ्या किंवा त्याकडे पाठ फिरवणाऱ्या महिलांचा गट फारच छोटा आहे. आपण सामान्य स्त्रियांचा विचार करतो तेव्हा या परंपरा आणि सणावारांना महत्त्व देणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं जाणवतं. मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रिया तर या परंपरा जिवंत ठेवणाऱ्या मुख्य आधारस्तंभ आहेत. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये श्रावणमासातील सर्व व्रतवैकल्यं पाळणं काहीसं अशक्य होऊ लागलं असलं तरी विशिष्ट सणवार अगदी उत्साहाने साजरे केले जातात. परंपरा म्हणून किंवा चेंज आणि फॅशन म्हणूनही हे सणवार साजरे केले जातात. एकूणच, स्त्री कितीही आधुनिक झाली तरी भावविश्वावर कोरलेले नाजूक भावबंध आजही तिला महत्त्वाचे वाटतात. मानवी नातेसंबंधातील दुरावे सांधण्याचं काम हे सण-समारंभ नेहमीच करत आले आहेत. सणांमुळे दुरावे कमी होण्यास मदत होते. एरवी तंटणाऱ्या नणंदा-भावजया या सणांच्या निमित्ताने एकत्र येतात. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर जात आहोत. सणांच्या निमित्ताने निसर्गाशी तुटलेला संवाद साधला जातो. मंगळागौर आणि हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारी फुलं आणि पत्री बाजारातून आणत असलो तरी त्यांच्या सुगंधाने दरवळलेलं मन पुन्हा पुन्हा बागेकडे धाव घेतं. आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांना रोज या ना त्या कारणामुळेे धावपळ करावी लागते. पण काळाबरोबर बदलत गेल्यामुळे आपल्या परंपरांचा विसर पडतो असं नाही. आजच्या आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांनी आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला असला तरी परंपरांकडे पाठ फिरवलेली नाही. परंपरांचं जतन करताना आवश्यक तिथे काही बदल केले जातात. पण मूळ भावना, संवेदना संपत नाहीत. मन, निसर्ग आणि संस्कृती यांच्या समीकरणातून निर्माण झालेल्या या परंपरा दीर्घकाळ टिकून राहतील इतक्या परिपक्व आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे निश्चित होऊन आपण सर्वांनीच त्यांची कास धरायला हवी. श्रावणमासातील हर्ष मनात उतरवून घ्यायला हवा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा